गोवा खबर

गोव्यात काँग्रेस छोडो अभियान सुरु,8 बंडखोर काँग्रेस आमदारांचा गट भाजपा मध्ये विलीन

Published

on

Spread the love
 गोवा खबर:काँग्रेसच्या 11 पैकी 8 आमदारांच्या गटाने वेगळे होत मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांच्या उपस्थिती मध्ये भाजपमध्ये प्रवेश करत गोव्यात काँग्रेस छोडो मोहिम सुरु करत राहुल गांधी यांच्या भारत जोडो मोहिमेला धक्का दिला आहे.
बुधवारी सकाळी विधानसभे मधील विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांच्या कार्यालयात काँग्रेस विधीमंडळ गटाची बैठक पार पडली.त्यात आपला गट भाजपा मध्ये विलीन करण्याचा निर्णय 8 बंडखोर आमदारांच्या गटाने घेतला त्यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या दालनात काँग्रेसच्या बंडखोर आमदारांनी चर्चा केली. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या काँग्रेस आमदारांच्या गटामध्ये माजी मुख्यमंत्री आणि मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्यासह अन्य 7 आमदारांचा समावेश आहे. यात प्रामुख्याने मायकल लोबो, डिलायला लोबो, आलेक्स सिक्वेरा, संकल्प आमोणकर, केदार नाईक, राजेश फळदेसाई आणि रुडॉल्फ फर्नांडिस यांचा समावेश आहे.
“काँग्रेसने देशव्यापी भारत जोडो  यात्रा सुरू केली आहे. परंतु, काँग्रेस सोडो यात्रेला गोव्यातून सुरुवात झाली असून, त्याचे अनुकरण देशाच्या इतर भागातही होणार आहे, असे मत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी 8 बंडखोर आमदारांना भाजपा मध्ये प्रवेश दिल्या नंतर बोलताना व्यक्त केले.
पक्षात प्रवेश करणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार का, असा प्रश्न विचारला असता सावंत म्हणाले, मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर आणि दक्षिण गोव्यातील दोन्ही जागा भाजप गोव्यात जिंकेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. पंतप्रधान मोदी 400 हून अधिक जागा जिंकतील, असेही ते म्हणाले.
काँग्रेसच्या 8 आमदारांचा गट भाजपा मध्ये विलीन झाल्यामुळे विधानसभे मधील पक्षीय संख्याबळ बदलले आहे.
28 भाजप आमदारांसह एनडीएचे संख्याबळ 33 आहे( 2 मगोचे आमदार आणि 3 समर्थक अपक्ष) काँग्रेसकडे 3 आमदार शिल्लक आहेत तर गोवा फॉरवर्ड 1, आम आदमी पार्टी 2 आणि रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षचा 1आमदार असे नवीन संख्याबळ बनले आहे.
काँग्रेसमधील अंतर्गत गोंधळाला आम्ही कंटाळलो होतो. त्या पक्षात आपल्याच नेत्यांचे पाय खेचण्याचे प्रयत्न सुरु होते. त्यामुळे आम्ही भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी सांगितले.
मोठ्या संख्येने  काँग्रेसचे आमदार भाजपात प्रवेश करतायेत या स्थितीवर बोलताना मी प्रशिक्षित पायलट आहे. भरकटलेले विमान स्थिर कसे करावे याचे प्रशिक्षण मी घेतले आहे. अशा शब्दात कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांनी आजच्या राजकीय घटनेवर प्रतिक्रिया दिली.
सासष्टी तालुका गोव्याच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच काँग्रेसमुक्त करण्यासाठी भाजपने ‘मिशन लोटस’ पुढे आणले होते. मात्र कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव बळी न पडल्याने सासष्टी तालुका काँग्रेसमुक्त होण्यापासून वाचला. असे जरी असले तरी पहिल्यांदाच या एकेकाळच्या काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या तालुक्यात काँग्रेस आमदारांची संख्या एकवर आली आहे.
काँग्रेसचे गोवा प्रदेश प्रभारी दिनेश गुंडूराव यांनी  भाजप आणि बंडखोर काँग्रेस आमदारांवर तिखट शब्दात टिका  केली आहे. “गोव्यातील बंडखोर काँग्रेस आमदारांवर टिका करताना दिनेश गुंडूराव म्हणाले, गोव्यातील जनतेने या आमदारांना काँग्रेसचे उमेदवार म्हणून मतदान केले. या आमदारांनी मंदीर, चर्च, दर्गा याठिकाणी भाजपमध्ये प्रवेश करणार नाही अशी शपथ घेतली. नेहमीच काँग्रेस सोबत राहू अशी संविधानाची शपथ देखील या आमदारांनी घेतली होती. पण, दिगंबर कामत, मायकल लोबो यांनी धोका अन् निर्लज्जपणाचा कळस गाठला आहे.”
“गोव्यात लोकशाही मुल्ये संपविण्याचे काम जोरात सुरू आहे. आमदारांनी मोठ्या प्रमाणावर पैसे दिले जाताहेत, भाजप विरोधक संपविण्यासाठी प्रयत्नशील आहे. भाजपकडून सत्ता आणि पैशाचा दुरूपयोग केला जात आहे.” असा आरोप दिनेश गुंडूराव यांनी केला आहे.
दरम्यान,आपण जोपर्यंत विधानसभेत असेल तोपर्यंत विरोधकांची भूमिका समर्थपणे पार पाडू, अशी प्रतिक्रिया गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी व्यक्त केली.
विरोधी पक्षनेता नसतानाही ही भूमिका कशी निभावता येते, हे मी मागच्या अधिवेशनात दाखवून दिले आहे. त्यामुळे गोव्यातील जनतेने घाबरू नये, त्यांचा आवाज प्रखरपणे विधानसभेत मी मांडणार याची खात्री त्यांनी बाळगावी, असे सरदेसाई म्हणाले.
ते म्हणाले, हे एक दिवस असे होणार याची सर्वानाच अपेक्षा होती. कारण ज्या दिवशी मुख्यमंत्री सावंत यांचा शपथविधी झाला त्या दिवसापसूनच काँग्रेस आमदार फोडण्यासाठी प्रयत्न सुरू झाले होते.
मात्र काँग्रेसच्या या आमदारांनी लोकांच्या लोकशाहीवरील भावार्थाला तडा दिला आहे. याच आमदारांनी आपण काँग्रेस पक्षाशी प्रतारणा करणार नाही अशी शपथ सर्व धर्मांच्या देवासमोर घेतली होती याची आठवण सरदेसाईंनी करुन दिली. पितृपक्ष चालू असताना हे आमदार भाजपात गेले आहेत. त्यामुळे त्यांना देवांचाही पाठिंबा नसेल, असे सरदेसाई म्हणाले.
हे आमदार स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष सोडून गेले आहेत. त्यासाठी त्यांनी पैसेही घेतले आहेत असा आरोप सरदेसाईंनी केली आहे. त्यामुळे सरकारी कामे करून घेण्यासाठी सामान्य लोकांना आता अधिक पैसे खर्च करावे लागणार आहे. सरकारात भ्रष्टाचार आणखीनच वाढणार अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.

Trending

Exit mobile version