गोवा खबर

आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवासाठी पुढे या: मुख्यमंत्री

Published

on

Spread the love
 दिवाडी बेटावर भाजपाच्या निवासी मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन
गोवा खबर:देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढे यावे. केंद्र आणि राज्यातील डबल इंजिन सरकार लोकांसाठी राबवत असलेल्या विविध सामाजिक योजना आणि उपक्रम तळागाळापर्यंत पोहोचवावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. 
दिवाडी बेटावर आयोजित तीन दिवसीय कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, भाजपचे राष्ट्रीय महासचिव तथा गोव्याचे प्रभारी सी टी रवी, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट – तानवडे, राज्य सचिव तथा शिबिराचे समन्वयक गोरख मांद्रेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, पक्षाच्या केवळ मंत्री, आमदार, पदाधिकारी नव्हे तर प्रत्येक कार्यकर्त्याने सरकारी योजना, उपक्रम लोकांपर्यंत पोहोचावेत यासाठी हे शिबिर आयोजित केले आहे. सर्व कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय नेत्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा. केंद्राच्या आणि राज्याच्या सामाजिक योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा, असे आवाहन त्यांनी केले.
सरकारने राज्यातील प्रत्येक घटकांसाठी अनेक योजना आणि उपक्रम राबविले आहेत. राज्यात शेतकरी, मच्छीमार, अनुसूचित जाती व जमाती आदींसाठी योजना आहेत. याची संपूर्ण माहिती घ्या. आणि लोकांना सांगा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
स्वयंपूर्ण गोवा हे भाजपचे लक्ष्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोवा घडवण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा. या शिबिरात मिळणाऱ्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन त्याचा पक्ष वाढीसाठी उपयोग करावा, असे आवाहनही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.
सी टी रवी म्हणाले, भाजपा हा राष्ट्रहिताचा विचार करणारा पक्ष आहे. अनेक राजकीय पक्ष केवळ सत्ता मिळवण्यासाठी काम करतात पण भाजपा हा सत्तेसाठी काम करत नाही. तर सत्ता हे लक्ष्य पूर्ण करण्याचे साधन आहे. राजकारणात राष्ट्रीय विचारधारा निर्माण होणे आवश्यक आहे. भाजपने वाजपेयी यांच्या कार्यकाळात अनेक विकासकामे केली. विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा देशाचा चौफेर विकास करत असल्याचे रवी म्हणाले.
सदानंद शेट – तानावडे यांनी प्रास्ताविक भाषण केले. गोरख मांद्रेकर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले.
दरम्यान, दीप प्रज्वलन करून या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भाजपचे सर्व पदाधिकारी, नेते, सर्व समित्या आणि मोर्चाचे पदाधिकारी, आमदार आणि मंत्री उपस्थित होते.
तीन दिवस चालणाऱ्या या शिबिरात एकूण १३ मार्गदर्शन सत्रे होणार असून समारोप सोहळ्याला पक्षाचे राष्ट्रीय नेते बी एल संतोष उपस्थित राहणार आहेत. तसेच अनेक राष्ट्रीय नेते राज्यातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

Trending

Exit mobile version