गोवा खबर:आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय युवा शाखेच्या अध्यक्ष सेसिल रॉड्रिग्स यांनी त्यांच्या सोशल मीडिया पेजवर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये ताळगाव-सांताक्रूझ खड्डेमय रस्त्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल ताळगावच्या आमदार जेनिफर मॉन्सेरात यांच्यावर खडसून टीका केली आहे.
रॉड्रिग्स यांच्या म्हणण्यानुसार ताळगावातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत आमदार व सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचित केल्यानंतरही आजतागायत खराब रस्त्याचा प्रश्न सुटलेला नाही. ताळगावातील रहिवाशांना अद्याप खराब रस्त्यांपासून स्वातंत्र्य मिळालेले नाही.
रॉड्रिग्स यांनी यापूर्वी १७ जून २०२१ रोजी ताळगाव-सांताक्रूझ रस्त्याची दयनीय अवस्था उघडकीस आणली होती. त्या म्हणाल्या, “राज्य विधानसभा निवडणुकीच्या काळात या खड्डेमय रस्ता दुरुस्त करण्यात आला होता, परंतु कंत्राटदारांच्या निकृष्ट कामामुळे पावसानंतर पुन्हा या रस्त्यावर खड्डे पडले आहेत”.
ताळगाव-सांताक्रूझ रस्त्यावरील खड्ड्यांमुळे ताळगाव आणि सांताक्रूझ या दोन्ही भागांतील प्रवाशांचे हाल होत आहेत. साबांखाच्या अधिकाऱ्यांनी या खराब रस्त्याची दखल घ्यावी आणि कंत्राटदारांना जबाबदार धरावे. शिवाय साबांखाच्या अधिकाऱ्यांनी ताळगाव-सांताक्रूझ रस्ता त्याच कंत्राटदारांना दुरुस्त करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी रॉड्रिग्स यांनी केली.
दरम्यान, रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत रॉड्रिग्स यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनी यावर लवकरात लवकर काम करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.