गोवा खबर

आपल्याला एकात्मतेने काम करण्याची गरज: खवंटे

Published

on

Spread the love

गोवा खबर:हवामान बदल, पाणीटंचाई, कचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन इत्यादी आव्हानांना तोंड देण्यासाठी आपण एकत्र बसून दूरदृष्टीने आणि सामाजिक एकजुटीने काम केले पाहिजे असे माहिती तंत्रज्ञान आणि पर्यटन मंत्री श्री रोहन खवंटे यांनी भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त म्हापसा येथे राष्ट्रीय तिरंगा फडकाविल्यानंतर सांगितले.

  खवंटे यांनी आपला देश आणि राज्य आपल्यासाठी काय करू शकतो हे आपण फक्त विचारू नये तर आपण कसे योगदान देऊ शकतो हे पाहिले पाहिजे असे सांगितले. ते म्हणाले की ‘आझादी का अमृत महोत्सव’, ‘हर घर तिरंगा’ आणि ‘फाळणी भयावह स्मरण दिन’ हे तरुणांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी आणि त्यांना दिशा देण्याचे काही उपक्रम आहेत. कारण तरुण हेच देशाचे भविष्य आहे असे ते म्हणाले.

रोजगार वाढीसाठी गोवा सरकारने उचललेल्या पावलांवर लक्ष केंद्रित करून श्री खवंटे यांनी तंत्रज्ञान लवकरच आर्थिक चालक बनत आहे आणि त्यामुळे उद्योगाला चालना देण्यासाठी राज्याने अनेक पुढाकार घेतले आहेत असे सांगितले. जर आपल्याला रोजगार निर्माण करायचा असेल तर आपल्याला आपल्या कार्यशक्तीला कुशल बनविण्याची गरज आहे आणि त्यासाठी आपल्याकडे एक आरोग्यपूर्ण शिक्षण प्रणाली असली पाहिजे असे ते म्हणाले. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सादर केल्याबद्दल कौतुक करताना ते म्हणाले की  शिक्षण प्रणालीमध्ये सुधारणा करून विद्यार्थ्यांना व्यापकता मिळेल असेही ते म्हणाले. मातृभाषा आणि संस्कृतीला प्रोत्साहन आणि संरक्षण दिल्यास भारताच्या पुढील वाटचालीत मदत होईल  असेही ते म्हणाले.

 राज्याच्या स्टार्ट-अप धोरणामुळे नोकऱ्या कशा निर्माण झाल्या आहेत याविषयी बोलताना श्री. खवंटे यांनी राज्यात अनेक नवीन स्टार्ट अप्सना प्रमाणित केले असून त्यांना आर्थिक मदत देण्यात आली आहे.

ते पुढे म्हणाले की सरकार अॅनिमेशन यासारख्या उद्योगांचे स्वागत करण्यासाठी पावले उचलत आहे त्यामुळे राज्याला महसूल मिळेल आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

जीडीपीमध्ये पर्यटनाचा मोठा वाटा असल्याचे सांगून श्री. खवंटे म्हणाले की  राज्य सरकारने इज ऑफ डुईंग बिजीनेसचा शुभारंभ केला आणि ऑनलाइन सेवा सुरू केल्या असून त्यामुळे कागदी काम कमी झाले आहे. ते पुढे म्हणाले की, राज्यात इको-टूरिझमला चालना देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

यावेळी स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार करण्यात आला. त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये आणि आपल्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या या स्वातंत्र्य सैनिकांचे आपण सदैव ऋणी राहावे असे श्री.खवंटे म्हणाले.

यावेळी मत्स्यध्योग मंत्री श्री नीळकंठ हळर्णकर,  म्हापसा नगरपालिकेचे सदस्य, सरकारी अधिकारी आदी उपस्थित होते.

Trending

Exit mobile version