गोवा खबर

कर्नाटकाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करा:गोवा फॉरवर्ड

Published

on

Spread the love
विजय सरदेसाई यांचे मुख्य सचिवांना पत्र : बंधारे बांधण्याचे कारस्थान हाणून पाडा
पणजी:म्हादईच्या खोऱ्यात कर्नाटक सरकार लहान बंधारे बांधून आता पाणी वळविण्याचा डाव खेळत आहे. कर्नाटकचे हे कारस्थान गोव्यासाठी मारक असून कर्नाटकचा हा डाव हाणून पाडा. त्यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करा अशी मागणी करणारे पत्र गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी मुख्य सचिवांना पाठविले आहे.
गोवा सरकारने या विरोधात त्वरित पाऊले उचलून हे प्रयत्न हाणून पाडावेत अशी मागणी  सरदेसाई यांनी केली आहे.
पर्यावरण कार्यकर्ते राजेंद्र केरकर यांनी कर्नाटकचा डाव उघड पाडला होता. याची दखल घेताना सरदेसाई यांनी मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात सरकारने म्हादईच्या खोऱ्यात जाऊन त्वरित तपासणी करावी आणि कर्नाटकचे हे कारस्थान सर्वोच्च न्यायालय आणि म्हादई पाणी तंटा लवाद यांच्यासमोर नेऊन कर्नाटक न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करत असल्याचे पटवून द्यावे अशी मागणी केली आहे.
दरम्यान सरदेसाई यांनी एका व्हिडिओ संदेशातून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना आवाहन करताना, जर म्हादई तुमची खरीच आई असल्यास तिचा गळा घोटण्या पासून कर्नाटकला परावृत्त करा अशी मागणी केली आहे.
2023 मध्ये कर्नाटक राज्यात निवडणूक असल्याने त्यांना म्हादई बाबत हवे करू देण्याची मोकळीक देऊ नका. म्हादई कर्नाटकला विकून टाकू नका असे आवाहन सरदेसाई यांनी केले आहे.

Trending

Exit mobile version