गोवा खबर:कोविड सारख्या भयावह काळात आर्थिकदृष्ट्या वंचित घटकातील लोकांना राशन पुरवठा करण्याऐवजी भाजप सरकारने 242 टन तूर डाळ आणि 10 टन साखर नासाडी होऊ दिली. याप्रकारामुळे भाजप सरकार किती असंवेदनशील आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, अशी टीका आम आदमी पक्षाने केली.
कोविड सारख्या गंभीर परिस्थितीत आम आदमी पक्षाने घरोघरी जाऊन राशन किट वाटप केले. आजतागयत आप च्या या मोहिमेची सर्वत्र कौतुक केली जाते. या राशन किटमध्ये तूर डाळ, साखर, मीठ, मैदा आणि इतर डाळींचा समावेश होता.
इतक्या मोठ्या प्रमाणात शिधा वाया जाऊ देण्यापेक्षा भाजपने हे शिधा गेल्या वर्षीच वितरित करण्यासाठी ‘आप’कडे द्यायला हवे होते. गरजेच्या वेळी गोमंतकीयांना मदत करण्याऐवजी ते सडू देणे पसंत केले, असे आप प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर म्हणाले.
या प्रकरणाच्या दक्षता चौकशीचे स्वागत करत पक्षाचे उपाध्यक्ष अॅड. सुरेल तिळवे म्हणाले की, “भाजप सरकारने केवळ 242 टन तूर डाळ सडू दिली नाही तर या खराब झालेल्या राशनचा लिलाव करण्याचा प्रयत्न केला”.
कोविड काळात गोमंतकीयांना मदत करण्यासाठी हा साठा विशेषत: वाटप करण्यात आला होता. भाजपने त्याचे वाटप केले नाही, तर खराब झालेल्या राशनचा लिलाव करून हे सर्व झाकण्याचा प्रयत्न केला. कमी दर्जाचे आणि आरोग्यदायी नसलेले राशन बेईमान घाऊक विक्रेत्यांद्वारे मिसळून विकले जाऊ शकते, असा तिळवे यांनी आरोप केला.