गोवा खबर:देशातील तरुणांना मुर्ख बनवण्यासाठी खोटी आश्वासने दिल्याबद्दल आम आदमी पक्षाने भाजपचा निषेध करत युवकांसमोरील सर्वात गंभीर बरोजगारीची समस्या सोडविण्यास भाजप अपयशी ठरला आहे,आरोप केला आहे.
पक्षाच्या युवा शाखेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, सिद्धेश भगत यांनी सांगितले, की मोदी सरकारने नुकत्याच केलेल्या दोन घोषणा, म्हणजेच १८ महिन्यांत केंद्र सरकारच्या १० लाख रिक्त जागा भरणे आणि संरक्षण दळात अग्निपथ योजनेअंतर्गत अल्प वेळेसाठी भरतीच्या घोषणेतून देशातील तरुणांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक आणि विश्वासघात झालेला आहे.
मोदीजींना अचानक बेरोजगार तरुणांची आठवण झाली म्हणून १० लाख नोकऱ्यांचे आश्वासन दिले, कारण २०२४ च्या निवडणुका जवळ येत आहेत. मागील निवडणुकीपूर्वी वर्षभरात २ कोटी नोकऱ्या निर्माण करण्याचे आश्वासन देणारा पक्ष, अशी पोकळ आश्वासने देऊन आपल्या त्या निराशाजनक अपयशापासून, लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही तरुणांना चेतावणी देऊ इच्छितो, की हा देखील आणखी एक निवडणूक जुमला आहे, कारण सरकारने वचन दिलेली ही रिक्त पदे भरण्यासाठी, १८ महिन्यांची अंतिम मुदत, लोकसभा निवडणुकीच्या अगदी आधी संपते आहे. प्रमोद सावंत यांच्या नोकऱ्यांच्या खोट्या आश्वासनांवर विश्वास ठेवण्याचे परिणाम, गोव्यातील तरुणांनी आधीच भोगले आहेत. त्यामुळे आता आगामी पंचायत आणि लोकसभा निवडणुकीत या पक्षाला धडा शिकवणे आवश्यक हवा”, असे भगत म्हणाले.
निदर्शने शांततापूर्ण आणि अहिंसक असावी असे आवाहन करताना भगत पुढे म्हणाले की, अग्निपथ योजनेने सशस्त्र दलांद्वारे देशसेवा करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांच्या आकांक्षा नष्ट केल्या आहेत.
“अनेक तरुण देशाच्या सुरक्षेसाठी आपले जीवन अर्पण करण्याचा जाणीवपूर्वक व महत्त्वाचा निर्णय घेतात आणि आवश्यक असल्यास आपले आयुष्य पणाला लावतात. त्या बदल्यात कृतज्ञ राष्ट्र या वचनबद्धतेसाठी सैनिक आणि त्याच्या कुटुंबाला नोकरीची सुरक्षा आणि आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करते. अग्निपथ योजनेतील असे सर्व भत्ते आणि सुरक्षा काढून टाकून, भाजपने आपल्या सैनिकांप्रतीची बांधिलकी कमी केली आहे. पेन्शन, कॅन्टीन किंवा इतर कोणतेही फायदे अग्निवीरांना मिळणार नाहीत आणि ४ वर्षांच्या सेवेत प्राण गमावल्यास, अग्निवीरांना ‘शहीद’ दर्जाचा मानही मिळणार नाही. अगदी ११ लाख रुपयांचे तथाकथित एक्झिट पॅकेजही प्रत्येक महिन्याला त्याच्या स्वतःच्या पगारातून ३०% रक्कम कापून, हा निधी अंशतः दिला जाईल. हे बाकी काही नसून निव्वळ फसवणूक आणि आमच्या सैनिकांच्या देशभक्तीची आणि समर्पणाची चेष्टा आहे,” असा आरोप भगत यांनी केला आहे.
गोवा युनिटचे एसटी विंगचे अध्यक्ष अनिल गावकर म्हणाले की, अग्निपथ योजनेद्वारे भाजप संरक्षण दलांशी खेळ करत असून देशाची सुरक्षा धोक्यात आणत आहे.
“जर मोदी सरकारला पगार आणि पेन्शनचा भार कमी करायचा असेल, तर त्यांनी पंजाबच्या आप सरकारचा आदर्श घ्यावा आणि खासदार आणि आमदारांचे बहुविध पेन्शन आणि फायदे काढून टाकावे. हे राजकारणी एका दिवसासाठी खासदार/आमदार असले, तरी आयुष्यभर पेन्शन आणि भत्ते उपभोगतात. स्वार्थी आणि भ्रष्ट भाजप सरकारला आपल्या प्राणांचे बलिदान देऊन देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या शूर सैनिकांना लाभ नाकारायचा आहे”, असेही गावकर म्हणाले.
भाजपचे राष्ट्रीय सचिव कैलाश विजयवर्गीय यांनी भाजप कार्यालयासाठी सुरक्षा रक्षक नेमताना, अग्निवीराला प्रथम प्राधान्य देऊ या धक्कादायक विधानाचा संदर्भ देत, गावकर यांनी अग्निवीरांचा दर्जा, सुरक्षा रक्षकापर्यंत कमी केल्याबद्दल भाजपवर टीका केली.
“विजयवर्गीय यांनी अनावधानाने अग्निपथची वस्तुस्थिती सांगितली आहे आणि यातून भाजप नेत्यांचा पर्दाफाश होतो, जे व्यापक टीकेला तोंड देण्यासाठी या योजनेच्या फायद्यांबद्दल मीडियामध्ये मोठे दावे करत होते. अद्याप देखील या योजनेचे कौतुक करणाऱ्या भाजप नेत्यांनी यातून मार्ग दाखवत, स्वतःच्या मुलांची आणि कुटुंबातील सदस्यांची अग्निवीर म्हणून नोंद करावी. अन्यथा त्यांनी हे मान्य करावे, की ते खोटे बोलत असून भारतातील तरुणांना मूर्ख बनवत आहेत”, असा आरोप गावकर यांनी केला.