गोवा खबर:मुख्यमंत्री तथा आदिवासी कल्याण मंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आदिवासी समाजातील सदस्यांना वन हक्क कायद्यांतर्गत जमिनीचे रहिवासी हक्क देण्याचे आश्वासन दिले. आदिवासी कल्याण खात्यातर्फे पणजी येथील इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा येथे आयोजित ‘प्रेरणा दिन’ कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.
यावेळी सांवर्डे मतदारसंघाचे आमदार श्री गणेश गावकर, कुठ्ठाळी मतदारसंघाचे आमदार श्री आंतोनियो वाज, आदिवासी कल्याण खात्याचे सचिव श्री रवी धवन, आयएएस, एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री वासुदेव एम. गावकर, आदिवासी कल्याण संचालक श्रीमती. त्रिवेणी वेळीप, युनायटेड ट्रायबल असोसिएशन अलायन्स (UTAA) चे अध्यक्ष श्री प्रकाश वेळीप व इतर उपस्थित होते.
पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी सरकारने आदिवासी भागात राहणाऱ्यांना सनद जारी केल्या आहेत आणि अशाचप्रकारे आणखी सनद जारी केल्या जातील पण त्यासाठी सरकारला लोकांचे आणि पंचायतींचे सहकार्य आवश्यक आहे असे ते म्हणाले.
डॉ. सावंत यांनी सांगे येथे आदिवासी संशोधन केंद्र आणि फर्मागुडी येथे आदिवासी संग्रहालय लवकरच उभारण्यात येणार असल्याची माहिती दिली. त्यासाठी केंद्राने आधीच निधी दिला आहे. आदिवासी भवन उभारणीबाबतचे प्रश्नही लवकरच सोडविले जातील असेही ते म्हणाले.
चांगले काम करणाऱ्या समाजातील सदस्यांना हात द्या आणि समाजातील इतरांना जीवनात पुढे येण्यासाठी प्रोत्साहन द्या असे आवाहनही डॉ.सावंत यांनी केले.
सरकारी सुविधा आणि योजना आदिवासी समाजाच्या घराघरात पोहोचण्यासाठी सरकार आदिवासी भागात जनजागृती शिबिरे घेण्यास इच्छुक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी आदिवासी समाजातील सदस्यांना विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल आदिवासी प्रज्ञावंत पुरस्कार प्रदान करण्यात आले.
गोव्यातील आदिवासी चळवळीसाठी बलिदान दिलेल्या दिलीप वेळीप आणि मंगेश गावकर यांच्या स्मरणार्थ ‘प्रेरणा दिन’ साजरा केला जातो.