गोवा खबर:मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपत्तींमुळे होणाऱ्या घटनांना प्रभावीपणे तोंड देण्यासाठी आणि त्या कमी करण्यासाठी पावले उचलण्याची गरज व्यक्त केली. मुख्यमंत्री डॉ. सावंत सचिवालयात मान्सूनच्या तयारीबाबत राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पूर्वतयारी बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. विशेषत: बुडण्यामुळे उद्भवणाऱ्या आपत्ती हा चिंतेचा विषय बनला आहे आणि त्यामुळे पावसाळ्यात कोणतीही घटना घडू नये यासाठी आपत्ती व्यवस्थापनाच्या सदस्यांनी फलदायी सूचना मांडल्या पाहिजेत असे ते म्हणाले.
या बैठकीला महसूल मंत्री श्री अतानासिओ मोन्सेरात, प्रभारी मुख्य सचिव श्री पी एस रेड्डी, आयएएस यावेळी उपस्थित होते.
यामध्ये बुडून मृत्यूमुखी पडलेल्या तरुणांच्या मृत्यूच्या घटना समोर येत आहेत, त्यामुळे त्यांच्या मौल्यवान जीवाचे रक्षण करण्यास जनजागृती करण्यासाठी संबंधित खात्याने उपाययोजना राबविण्यासाठी पावले उचलण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
चक्रीवादळ, पूर, भूस्खलन, आगीच्या घटना अशा आपत्तींमुळे जीव व मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी ‘आपदा मित्रा’ने केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा करून मुख्यमंत्र्यांनी ‘आपदा मित्रा’ला प्रोत्साहन देण्याची गरज व्यक्त केली आणि त्याचबरोबर अधिक “आपदा मित्रांची” आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत नोंदणी करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. त्यांना आवश्यक प्रशिक्षण तालुकास्तरावर देण्यात यावे असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दक्षिण-पश्चिम मान्सूनला तोंड देण्यासाठी आणि धोका निर्माण करणाऱ्या कोणत्याही आव्हानांना आणि प्रसंगांना तोंड देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
कृषी विभाग आणि पशुसंवर्धन क्षेत्रांना आपत्ती व्यवस्थापनाच्या कक्षेत आणण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले जेणेकरून या क्षेत्रांमध्ये होणाऱ्या नुकसानीची आपत्ती व्यवस्थापनांतर्गत भरपाई करता येईल. अग्निशमन आणि आपत्कालीन सेवांना पावसाळ्याशी संबंधित नुकसान आणि आपत्तींचा सामना करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व उपकरणे सज्ज ठेवण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
मुख्यमंत्र्यांनी पावसाळा सुरू होण्यापूर्वी भूस्खलन प्रवण क्षेत्रांची पाहणी करून ते रोखण्यासाठी पावले उचलण्याचे निर्देश पीडब्ल्यूडी, डब्ल्यूआरडी आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
या बैठकीत नियंत्रण कक्षांची उभारणी, पूर्वसूचना यंत्रणा, नाल्यांची गाळ उपसणे, महामार्ग व इतर रस्त्यांजवळील धोकादायक झाडांची छाटणी, रस्त्यालगतची कामे बंद करणे, पूरस्थिती निवारणाच्या उपाययोजना, यंत्रणा तपासणी, दळणवळण यंत्रणा, आवश्यक मदत सामग्रीची आगाऊ खरेदी अशा विविध उपाययोजनांवरही या बैठकीत चर्चा करण्यात आली.
बैठकीला सरकारचे सचिव, दक्षिण गोवा आणि उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी, खाते प्रमुख आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सुरवातीस महसूल सचिव श्री रमेश वर्मा, आयएएस, यांनी स्वागत केले आणि दक्षिण-पश्चिम मान्सून २०२२ ची तयारी आणि राज्यातील आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित इतर समस्यांबद्दल तपशीलवार सादरीकरण केले.