गोवा खबर:कोविड अजून असल्याने कोविड प्रतिबंधक मार्गदर्शक तत्वाचे पालन करावे लागणार आहे,असे स्पष्ट करत गोव्यात इतक्यात तरी मास्क बंदी होणार नसल्याचे कोविड नियंत्रण तज्ञ समितीच्या आज झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.
कोविडची लाट चार महिन्यांच्या फरकाने येत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे राज्यात आताच मास्कबंदी करता येणार नाही. मास्कबंदीचा निर्णय जून-जुलैमध्ये आढावा घेऊन घेतला जाईल. असा तज्ञ समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे,अशी माहिती गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी दिली आहे.
कोविड रुग्ण संख्या नियंत्रणात आल्या नंतर महाराष्ट्रासह काही राज्यात मास्क न वापरण्यास मुभा देण्यात आली होती.त्यानंतर गोव्यात मास्क बंदी केव्हा असा प्रश्न मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना विचारला जात होता.यासंदर्भात जिल्हाधिकारी योग्य वेळी आदेश काढतील असे मुख्यमंत्र्यांनी त्या त्यावेळी सांगितले होते.
कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा अनेक राज्यात मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास 500 रुपये दंड आकारण्यात येत आहे.
यापार्श्वभूमीवर कोविड नियंत्रण तज्ञ समितीच्या आज पार पडलेल्या बैठकीत सध्या तरी मास्क बंदीचा धोका न पत्करण्यावर एकमताने निर्णय घेण्यात आला.कोविड प्रतिबंधक लसीकरणा बरोबर कोविड रुग्णावर योग्य वेळी इलाज करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचा आढावा देखील यावेळी घेण्यात आला..