गोवा खबर:गोव्यामध्ये आयोजित 57 व्या इफ्फी (IFFI), अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समारोपानिमित्त आयोजित दिमाखदार सोहळ्यात आज गोव्यातील चित्रपट निर्माते आदित्य सुहास जांभळे यांचा, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांचा उल्लेखनीय सर्जनशील प्रवास, चित्रपट क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी आणि भारतीय सिनेमाच्या बदलत्या परिप्रेक्ष्यात त्यांनी दिलेले योगदान यासाठी त्यांना सन्मानित करण्यात आले.
तीन वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते असलेल्या आदित्य सुहास जांभळे यांनी, भारतीय चित्रपटसृष्टीसाठी दिलेल्या असाधारण योगदानासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार, आयफा (IIFA) पुरस्कार आणि झी सिने पुरस्कार, यासारख्या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. रंगभूमीपासून राष्ट्रीय चित्रपट उद्योगापर्यंतचा त्यांचा उल्लेखनीय प्रवास कथाकथनाच्या कलेप्रति असलेली त्यांची गाढ बांधिलकी दर्शवतो, त्यांची असामान्य प्रतिभा, चिकाटी आणि सर्जनशील उत्कृष्टतेने त्याला पाठबळ दिले आहे.
आपल्या कलाकृतींच्या माध्यमातून त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण विश्वात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे, त्यांनी कलाकारांच्या अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली असून देशाच्या चित्रपट उद्योगाच्या सांस्कृतिक जडणघडणीला बळकटी दिली.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये आदित्य सुहास जांभळे यांची प्रभावी कामगिरी दिसून येते, यामध्ये फीचर (कथा-चित्रपट) आणि नॉन-फीचर (बिगर-कथा चित्रपट) अशा दोन्ही श्रेणींमधील चित्रपटांचा समावेश आहे. त्यांच्या ‘आर्टिकल 370’ या हिंदी चित्रपटाने 2024 च्या 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म’चा पुरस्कार जिंकला. यापूर्वी, त्याच्या ‘आबा ऐकताय ना?’ या मराठी लघुपटाला 2017 मध्ये 64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात नॉन-फीचर फिल्म श्रेणीत सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी रजत कमळ पुरस्कार मिळाला होता. तर, ‘खरवस’ या आणखी एका मराठी लघुपटाने 2018 च्या 66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्तम लघुकथेसाठीचा रजत कमळ पुरस्कार जिंकला. हे सन्मान, एक चित्रपट निर्माता म्हणून त्यांचे अष्टपैलुत्व आणि विविध प्रकार आणि शैलीमध्ये प्रभावी सिनेमा निर्माण करण्याची त्यांची क्षमता अधोरेखित करतात.