गोवा खबर

57 व्या इफ्फीमध्ये गायिका के.एस. चित्रा यांनी लता मंगेशकर, आशा भोसले आणि एस.जानकी या महान गायिकांचे केले स्मरण

Published

on

Spread the love


सुप्रसिध्द गायिका चित्रा यांनी अनेक पिढ्या घडवणारे आवाज आणि गीते यांचे पुनरावलोकन केले आणि जतन केलेल्या आठवणी तसेच हृदयस्पर्शी किश्श्यांमधून स्वतःचा सांगीतिक प्रवास उलगडला

गोवा खबर:काही आवाज फक्त जागा व्यापून टाकत नाहीत तर त्यापलीकडेही बरेच काही देऊन जातात. हे आवाज आपल्या बालपणाचा भाग होतात, जीवनाच्या महत्त्वाच्या टप्प्यांवर आपली सोबत करतात आणि गाणे संपल्यानंतर देखील दीर्घकाळ आपल्या आजूबाजूला रेंगाळतात. प्रख्यात गायिका के.एस.चित्रा यांच्यासाठी आशा भोसले, एस.जानकी आणि लता मंगेशकर या सुप्रसिध्द गायिकांचे आवाज असेच आहेत.

57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) आज आयोजित करण्यात आलेल्या “लता मंगेशकर टॉक: आशा भोसले आणि एस.जानकी यांचा स्मृतींमध्ये सदैव घुमणारा आवाज” या विषयावरील मास्टरक्लासमध्ये चित्रा यांनी प्रेक्षकांना या महान गायिकांशी संबंधित संगीत आणि आठवणी यांच्या माध्यमातून एका अत्यंत वैयक्तिक प्रवासाचे दर्शन घडवले. चित्रपट निर्मात्या सुहासिनी मणिरत्नम यांनी या सत्राचे सूत्रसंचालन केले.

या संवादाची सुरुवात अत्यंत जिव्हाळ्याच्या आणि ओळखीच्या वातावरणात झाली; यावेळी चित्रा यांनी कबुल केले की सुरुवातीला त्या थोड्या तणावाखाली होत्या, मात्र सुहासिनी त्यांना आश्वस्त करतील याचा त्यांना विश्वास होता. त्या दोघींच्या सामायिक पार्श्वभूमीने संवादाला सहजतेचा स्पर्श दिला. अनेक चित्रपटांमध्ये चित्रा यांनी गायलेली गाणी आपल्या स्वतःच्या प्रवासाचा अविभाज्य भाग कशी बनली याची आठवण सुहासिनी यांनी सांगितली. त्यानंतर झालेला संवाद ही औपचारिक चर्चा न राहता आठवणींची देवाणघेवाण आणि किस्से सांगताना अनेकदा उमटलेल्या सुरावटी यांची मैफल झाली.

कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळाकडे वळून बघताना, चित्रा यांनी सशक्त सांगीतिक पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात मोठे होणे, विविध स्पर्धांमध्ये घेतलेला सहभाग आणि शास्त्रीय संगीत शिकण्याबद्दलची माहिती दिली. त्या म्हणाल्या की गाणे ही एक अशी गोष्ट होती जी त्या उत्तम पद्धतीने करू शकत होत्या, मात्र या क्षेत्रात आपण इतक्या पुढे जाऊ अशी कल्पना केली नव्हती, असे त्यांनी सांगितले. चित्रपट संगीत क्षेत्रात त्यांचा प्रवेश केवळ अपघाताने झाला. मनोरंजन क्लब्समध्ये चित्रपटांची गाणी गाण्याची आणि बहुतेकदा या गाण्यांची सुरुवात पी.सुशीला यांच्या गाण्यांनी करत असल्याची आठवण त्यांनी सांगितली.

त्यांना कोणाचे आवाज सर्वाधिक आवडतात हे विचारले असता चित्रा यांनी, पी.सुशीला, एस.जानकी आणि लता मंगेशकर या गायिकांची नावे सांगितली. लहानपणी आपण नेहमी एस. जानकी यांची नक्कल करायचो असे हसून सांगत चित्रा यांनी कबुल केले की एस. जानकी यांची वैशिष्ट्यपूर्ण शैली पुन्हा निर्माण करणे अशक्य आहे. गानकोकिळा लता मंगेशकर यांच्याविषयी बोलताना चित्रा यांनी त्यांच्या गाण्यातील, विशेषतः भक्तीगीतांमधील भावनिक खोलीवर प्रकाश टाकला आणि त्यांनी प्रेक्षकांसमोर लता मंगेशकर यांचे चित्रा यांना आवडत असलेले एक गाणे सादर केले.

आशा भोसले यांच्याविषयीच्या आठवणी सांगताना चित्रा यांनी त्यांच्याबद्दलचा विशेष आदर व्यक्त केला. आशा भोसले यांचे असामान्य अष्टपैलुत्व आणि गझलसह विविध संगीत प्रकार हाताळण्याची त्यांची तयारी याविषयी त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी स्वतः एक गझल गुणगुणूनही दाखवली. आपली बहीण लता मंगेशकर यांच्याशी सतत तुलना होण्याऐवजी स्वतःची स्वतंत्र सांगीतिक ओळख निर्माण करण्याची आशा भोसले यांची नेहमीच इच्छा होती, अशी आठवण त्यांनी सांगितली. चित्रा यांनी आशा भोसले यांच्याशी झालेल्या पहिल्या अविस्मरणीय भेटीचा किस्साही सांगितला. त्या वेळी आशा भोसले यांनी त्यांना, “तू इतक्या उंच पट्टीत का गात आहेस?” असा प्रश्न विचारला होता. या छोट्याशा संवादातून आशा भोसले यांचा स्पष्टवक्तेपणा आणि त्यांची स्वतंत्र वृत्ती यांची झलक पाहायला मिळाली.

मात्र, एस. जानकी यांच्या आठवणी सांगताना चित्रा यांच्या बोलण्यात विशेष आपुलकी जाणवत होती. एस. जानकी यांच्या संगीत प्रवासाच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण करून देताना त्यांनी सांगितले की, त्या काळात रंगमंचावर मिमिक्री कलाकारांचे कार्यक्रम होत असत. त्यांच्या सादरीकरणातील मोकळ्या वेळेत गाणे सादर करण्यासाठी  एस. जानकी यांना अनेकदा आमंत्रित केले जात असे. या संधींमुळे प्रेक्षकांना त्यांचा आवाज ऐकायला मिळाला आणि हळूहळू त्यांच्या पार्श्वगायनाच्या प्रवासाला सुरुवात झाली. एस.  जानकी यांचा वैशिष्ट्यपूर्ण आवाज, आवाजातील भावपूर्ण चढ-उतार आणि प्रत्येक गाण्यात जीव ओतण्याची त्यांची क्षमता याविषयीही चित्रा यांनी सांगितले. संगीतापलीकडेही जानकी यांना वाटणारे ममत्व आणि त्यांचा प्रेमळ स्वभाव याची आठवण चित्रा यांनी आवर्जून सांगितली.  एस.जानकी यांच्या घरी दिलेल्या भेटींची आठवण सांगताना त्या म्हणाल्या की, या ज्येष्ठ गायिका त्यांना स्वतःच्या हाताने प्रेमाने घास भरवत असत. त्यांच्या हातून खाल्लेला तिखट पदार्थही आपल्याला गोड लागायचा, असे त्यांनी चित्रा यांनी नमूद केले.

संपूर्ण सत्रात सुहासिनी यांनी संवादाला गाण्यांची जोड दिली. आठवणी सांगताना त्यांनी चित्रपटांमधील भावभावनांशी त्यांचा संबंधही उलगडून दाखवला. प्रेम, विवाह, दुःख किंवा आनंद अशा प्रत्येक प्रसंगी चित्रपट संगीत माणसांची सोबत कसे करते आणि शब्दांतून व्यक्त न होणाऱ्या भावना अनेकदा संगीतातून कशा व्यक्त होतात, याविषयी त्यांनी विचार मांडले. यावर बोलताना चित्रा यांनी सांगितले की, ‘स्वर्णमुकिले’   हे मल्याळम गाणे ऐकले की आजही त्यांच्या डोळ्यांत पाणी येते.

या दुपारच्या सत्रात खेळकर सांगीतिक प्रश्नमंजुषेमुळे आणखी रंगत आली. पार्श्वसंगीताविना दाखवलेल्या चित्रपटांतील दृश्यांवरून चित्रा यांनी पाचही प्रसंगांमधील गाणी अचूक ओळखली आणि ती गाऊनही दाखवली. यामध्ये सुहासिनी यांच्या चित्रपटांतील गाण्यांचाही समावेश होता. या सत्रात ध्वनिमुद्रणाच्या गरजा, कठीण गाणी सादर करताना येणारी आव्हाने आणि वयानुसार आपल्या आवाजाच्या मर्यादा ओळखण्याचे महत्त्व यांवरही चर्चा झाली.

चित्रा यांनी ‘सिंधू भैरवी’  चित्रपटातील ‘पाडरियेन’  हे गाणे गायला सुरुवात केली, तेव्हा या संवादातील एक अविस्मरणीय क्षण अनुभवायला मिळाला. सुहासिनी यांनीही या गाण्यावर ओठांच्या हालचाली जुळवत (लिप-सिंक करत) त्यांना साथ दिली. या दोघींनी मिळून अनुभवलेला हा क्षण त्यांच्या संवादाचा सुंदर समारोप ठरला. संगीत आणि आठवणींचा हा सुंदर संगम होता. गाणी म्हणजे केवळ सुरावटी नसतात, तर ती जीवनाचा, मैत्रीचा आणि प्रवासाचा अविभाज्य भाग असतात. त्यांचा नाद पिढ्यानपिढ्या घुमत राहतो, याची जाणीव या प्रसंगाने करून दिली.

Trending

Exit mobile version