तीन चित्रपटांच्या मालिकेचा पहिला भाग प्रेम, भक्ती आणि श्रीकृष्णाच्या जीवनातील काही अपरिचित अध्यायांचा शोध घेणारा
गोवा खबर:इफ्फी अर्थात आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव – 2026 मध्ये ‘इंडियन पॅनोरमा’ विभागात प्रदर्शित ‘कृष्णावतारम्’ (कृष्णावतारम् भाग 1: द हार्ट) या हिंदी चित्रपटाच्या निर्मात्यांनी आज पत्र सूचना कार्यालयाद्वारे (पीआयबी) आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित केले. चित्रपटाचे दिग्दर्शक हार्दिक गज्जर आणि निर्माते साजन राज कुरुप यांनी भगवान कृष्णाचे जीवन जागतिक प्रेक्षकांसमोर एक दृश्यात्मकतेने समृद्ध, समकालीन चित्रपटशैलीतून मांडण्याच्या अनुभवाविषयी माहिती दिली.
चित्रपटामागील मूळ कल्पनेबद्दल बोलताना, निर्माते साजन राज कुरुप म्हणाले की, “भारतात श्रीकृष्णाला हे पौराणिक कथांच्या चौकटीत बांधून ठेवता येणार नाही. ती एक श्रद्धा, एक भावना आणि आपल्या इतिहासाचा एक जिवंत भाग आहे,” असे ते म्हणाले. आदिकेशवाभोवती केंद्रित असलेल्या सांस्कृतिक परंपरेत आपण वाढल्याचे त्यांनी सांगितले. “सर्व काही श्रीकृष्णापासूनच निर्माण झाले आहे” या श्रद्धेचा उल्लेख त्यांनी केला. श्रीकृष्णाचे जीवन प्रामाणिकपणे आणि आदरपूर्वक चित्रित करण्यासाठी चित्रपटाच्या संपूर्ण चमूने जाणीवपूर्वक प्रयत्न केले, असेही त्यांनी सांगितले.
‘कृष्णावतारम्’ हा ‘हृदय, मन आणि आत्मा’ या संकल्पनांवर आधारित असलेल्या तीन भागांच्या चित्रपट मालिकेतला पहिला अध्याय आहे. राम मोरी यांच्या ‘सत्यभामा’ या कादंबरीवर आधारित या चित्रपटाची पटकथा प्रकाश कपाडिया, राम मोरी आणि हार्दिक गज्जर यांनी लिहिली आहे. चित्रपटमालिकेचा पहिला भाग श्रीमद् भागवतम् आणि हरिवंश या ग्रंथांवर आधारित आहे. या भागात सत्यभामेच्या नजरेतून श्रीकृष्णाचा वृंदावन आणि मथुरेपासून द्वारकेवरील राज्यापर्यंतचा प्रवास दर्शवण्यात आला आहे.
पहिल्या भागात प्रेम, त्याग, विरह आणि भक्ती या भावनांवर केंद्रित कथानक मांडण्यात आले आहे; तर पुढील दोन भागांमध्ये श्रीकृष्णाचे राज्यकारभार आणि रणनीती (मन) तसेच भगवद्गीतेतील शिकवण (आत्मा) यांचा वेध घेतला जाईल. श्रीकृष्णाच्या जीवनातील फारशा परिचित नसलेल्या घटनांचाही या चित्रपटात समावेश करण्यात आला आहे. सिद्धार्थ गुप्ता, संस्कृती जयना, सुष्मिता भट आणि निवाशियनी कृष्णन् हे कलाकार या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारत आहेत.
पारंपरिक कथांची आधुनिक प्रेक्षकांना ओळख करून देण्याच्या गरजेविषयी बोलताना दिग्दर्शक हार्दिक गज्जर यांनी स्पष्ट केले की, आजच्या युवा पिढीला आपला इतिहास जाणून घेता यावा आणि त्याच्याशी आपले नाते जोडता यावे, या उद्देशाने चित्रपटाच्या आकर्षक भाषेत ही निर्मिती केली आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी सांगितले की, “कथाकथनाची पद्धत काळानुसार बदलत राहू शकते आणि दृश्यात्मकदृष्ट्या समृद्ध अनुभव निर्माण करण्याची संधी आपल्याला मिळत आहे, हे आपले भाग्य आहे.”
गज्जर यांचा वीएफएक्स क्षेत्रातील अनुभव आणि या क्षेत्रातील काही सर्वोत्तम प्रतिभावंतांच्या सहकार्याने तब्बल 7.5 एकर क्षेत्रावर उभारलेल्या भव्य सेटवर या चित्रपटाची निर्मिती केली आहे. जगभरातील तरुण प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने इंग्रजीसह इतर अनेक भाषांमध्ये तो तयार केला आहे.
चित्रपटातील भावनिक आशय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात पार्श्वसंगीताची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करताना गज्जर यांनी संगीत दिग्दर्शक प्रसाद एस. यांच्या सहकार्याविषयी सांगितले. शास्त्रीय संगीताचे प्रसिद्ध जाणकार डॉ. भारत बळवल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली, चित्रपटाच्या संगीतात अधिकाधिक शास्त्रीय संगीत वापरले आहे. पारंपरिक संगीताची शुद्धता आणि आधुनिक संगीताचा साज यांचा सुरेख मेळ साधून आजच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या संगीताच्या माध्यमातून करण्यात आला आहे.