गोवा खबर

इफ्फी 2026 मध्ये सरस्वती नदीवरील लघुपट या प्राचीन नदीबद्दलचे रहस्य विज्ञानाच्या नजरेतून शोधतो

Published

on

Spread the love

गोवा खबर:पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली लपलेली आणि प्राचीन धर्मग्रंथांच्या पानांमधून वाहणारी , भारताच्या नागरीसंस्कृतीच्या रम्य आठवणींमध्ये एकरुप झालेली सरस्वती नदी ही देशातील एक कधीही न उलगडलेले रहस्य बनून राहिली आहे. प्राचीन परंपरा आणि आधुनिक वैज्ञानिक संशोधन यांमधील दरी भरुन काढण्याचा प्रयत्न : द एनशंट होली रिव्हर – सरस्वती हा  हिंदी लघुपट करतो.  57 व्या  इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात इंडियन पॅनोरमा श्रेणीमध्ये आज त्याचे प्रदर्शन झाले. या नदीबाबतच्या चमत्कारिक कथा आणि डॉ सुभाष सी सिंग यांनी नदीच्या अस्तित्वाबद्दल घेतलेला वैज्ञानिक संशोधनाचा यांचा वेध यात घेतला आहे. हा चित्रपट आपल्यासमोर प्राचीन भौगोलिक संदर्भ, पर्यावरणीय निरीक्षण आणि वैज्ञानिक संशोधन यांची सांगड घालून घेतलेला भारताच्या नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारशाचा अविस्मरणीय शोध सादर करतो.

पत्र सूचना कार्यालयाने आज आयोजित केलेल्या वार्ताहर परिषदेत दिग्दर्शक भास्कर विश्वनाथन यांनी त्यांच्या या पहिल्या लघुपटाच्या निर्मितीची कथा सांगितली. सरस्वती नदी संदर्भातील रहस्य आपल्याला देखील तितकेच आकर्षित करत होते आणि या विषयावर हाती घेतलेले संशोधन चित्रपटनिर्मिती मागील मोठी प्रेरणा ठरले, असे त्यांनी सांगितले. त्यांनी सरस्वती नदीचे ऐतिहासिक आणि सामाजिक महत्त्व विशद केले विशेषतः सारस्वत संस्कृतीशी निगडित नदीचा संदर्भ आणि प्राचीन वैदिक परंपरांशी असलेले दुवे याबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की वेदांची रचना ही सरस्वती नदीच्या काठी झाली असे मानले जाते. या विषयावर केलेल्या प्रदीर्घ संशोधनाला केवळ सारांश रुपात सादर करणे त्याचसोबत कथा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी आणि मनोरंजक असणे हे आपल्यापुढील मोठे आव्हान होते आणि या संशोधनाचा पाया कायम राखत त्याचवेळी हा लघुपट प्रेक्षकांना व्यापक प्रमाणावर आपलासा वाटेल, हे आपले ध्येय होते, असे ते म्हणाले. 

भारतातील नद्या आणि त्यांचे ऐतिहासिक संदर्भ याबाबत असलेल्या जिज्ञासेमुळे या चित्रपटाची निर्मिती करायला प्रेरणा मिळाल्याचे चित्रपटाचे निर्माते अभिनव एम जैन यांनी सांगितले. कुंभमेळ्यासाठी प्रयागराज येथे गेले असताना त्रिवेणी संगमाच्या ठिकाणी आपल्याला केवळ गंगा आणि यमुना या दोन नद्याच दिसल्याने वेदांमध्ये आणि हिंदू धर्मग्रंथांमध्ये जिचा उल्लेख वारंवार केला जातो त्या तिसऱ्या सरस्वती नदीचा शोध घेण्याची इच्छा उत्पन्न झाली, असे ते म्हणाले.  या संशोधनाचे वैज्ञानिक पैलू अधोरेखित करताना जैन यांनी रुरकी येथील राष्ट्रीय जलविज्ञान संस्थेने केलेल्या समस्थानिक अभ्यासाचा संदर्भ दिला, या अभ्यासात पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून, भूगर्भातील जलप्रवाहाच्या जाळ्याविषयी संशोधन करण्यास त्याचा महत्त्वपूर्ण हातभार लागला.

भौगोलिक संशोधन, प्राचीन परंपरा आणि समकालीन चित्रपटनिर्मिती या सर्वांचा मेळ घालून द एनशंट होली रिव्हर – सरस्वती हा चित्रपट प्रेक्षकांना भारताच्या सांस्कृतिक वारशाला वैज्ञानिक दृष्टिकोनातून पुन्हा एकदा अनुभवण्याची संधी प्रदान करतो.

पत्रकार परिषदेचे सूत्रसंचालन  स्वाधीन शक्ती प्रसाद यांनी केले.

संपूर्ण पत्रकार परिषद येथे पहा:

Trending

Exit mobile version