गोवा खबर

गोव्याच्या किनारपट्टीवर राष्ट्रीय महामार्ग 66 घडवतोय संपर्क,विकास आणि नैसर्गिक सौंदर्याचा सुरेख संगम

Published

on

Spread the love


दक्षिण गोव्यातील 7.74 किलोमीटर लांबीचा काणकोण बाह्यवळण मार्ग, कोकण किनारपट्टीच्या निसर्गरम्य परिसरातून जात, महामार्ग पायाभूत सुविधा समाजाला कशा प्रकारे जोडतात, याचे ठरतोय उत्तम उदाहरण

गोवा खबर: दक्षिण गोव्यातील राष्ट्रीय महामार्ग 66 (एनएच-66) वरील प्रवास हा केवळ दोन ठिकाणांना जोडणारा दळणवळणाचा मार्ग नसून एक समृद्ध अनुभव देणारा आहे. नद्या, हिरवीगार वनराई आणि अरबी समुद्राच्या सान्निध्यातून जाणारा हा महामार्ग, वाहनचालकांना कोकण किनारपट्टीवरील निसर्गरम्य प्रदेशांचे दर्शन घडवतो. विशेषतः काणकोण बाह्यवळण मार्ग (Canacona Bypass) हा आधुनिक रस्ते पायाभूत सुविधा आणि किनारी गोव्याचे नैसर्गिक सौंदर्य यांचा सुरेख संगम घडवतो.

काणकोण बाह्यवळण मार्ग: प्रादेशिक संपर्क व्यवस्थेला बळकटी

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत विकसित करण्यात आलेला 7.74 किलोमीटर लांबीचा चार पदरी काणकोण बाह्यवळण मार्ग 2019 पासून वाहतुकीसाठी खुला आहे. हा मार्ग दक्षिण गोव्यातील चार रस्ता  ते माशेम  यांना जोडतो. राष्ट्रीय महामार्ग 66 चा महत्त्वाचा भाग असलेल्या या बाह्यवळण मार्गामुळे काणकोण परिसरातील दळणवळण अधिक सुलभ झाले आहे. दैनंदिन प्रवासी, स्थानिक रहिवासी आणि पर्यटकांसाठी हा मार्ग सोयीस्कर ठरत आहे.

प्रवासी आणि मालवाहतूक अधिक सुलभ करून हा बाह्यवळण मार्ग स्थानिक व्यवसाय, रोजगार आणि उपजीविकेला चालना देतो. तसेच महत्त्वाच्या ठिकाणी पोहोचणेही सोपे करतो. या मार्गावरील तीन नदीपूल हे या पायाभूत सुविधांचे महत्त्वाचे घटक आहेत. या पुलांमुळे नद्यांवरून वाहतूक विनाअडथळा सुरू राहते. त्याचबरोबर प्रवाशांना आजूबाजूच्या निसर्गसौंदर्याचे विहंगम दर्शनही घडते.

राष्ट्रीय महामार्ग 66 (एनएच-66): भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील एक प्रमुख महामार्ग

काणकोण बाह्यवळण मार्ग हा भारतातील प्रमुख किनारी महामार्गांपैकी एक असलेल्या राष्ट्रीय महामार्ग 66 चाच भाग आहे. महाराष्ट्रातील पनवेलपासून तामिळनाडूतील कन्याकुमारीपर्यंत सुमारे 1,600 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग पाच राज्यांतून जातो. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांतील पश्चिम किनारपट्टीवरील महत्त्वाची शहरे, व्यापारी केंद्रे, बंदरे आणि पर्यटन स्थळांना तो जोडतो.

मोठ्या प्रमाणात अरबी समुद्र व पश्चिम घाटाला समांतर असलेला एनएच-66 महामार्ग प्रवासी व माल वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. कृषी माल, मासे व औद्योगिक उत्पादने यांची वाहतूक करणे सुलभ झाल्यामुळे हा महामार्ग स्थानिक व्यावसायिकांना व उत्पादकांना मोठ्या बाजारपेठांशी जोडेल.

वैविध्यपूर्ण नैसर्गिक सौंदर्य लाभलेला महामार्ग

पनवेलपासून सुरू होणारा एनएच-66 महामार्ग महाराष्ट्रातील कोकण प्रदेशातून म्हणजेच पेण, महाड, चिपळूण आणि रत्नागिरीमधून जाऊन गोव्यात प्रवेश करेल. कर्नाटकातील कारवार, उडुपी व मंगळुरू येथून जाण्याआधी तो पणजी व मडगांव यासारख्या प्रमुख शहरांना जोडला जाईल.

त्यानंतर दक्षिणेकडे हा महामार्ग केरळमधील कन्नूर, कोझीकोड, कोची, अलप्पुझा, कोल्लम व थिरुअनंतपुरम या शहरांना जोडेल आणि शेवटी तमिळनाडूमधील कन्याकुमारी येथे तो एनएच-44 या महामार्गाशी जोडला जाईल.

नागरिक व शहरांना जोडणाऱ्या पायाभूत सुविधा

महामार्गांचा विकास केवळ रस्ते जोडणी सुधारण्याचेच काम करत नाही हे काणकोण बायपास मार्गातून दिसून येते. सुरळीत वाहतुकीला मदत करतानाच हा महामार्ग आर्थिक घडामोडींना  व सामाजिक आदानप्रदानाला सहाय्य करतो. हे महामार्ग वाहतुकीसाठी रस्त्याचा पर्याय  वापरणाऱ्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करतानाच क्षेत्रिय विकासातही योगदान देतात.  

गोव्यातील एनएच-66 महामार्गावरील नद्यांवरचे पूल, नैसर्गिक सौंदर्य व अरबी समुद्राचे दृश्य या प्रवासाला अनोखे वैशिष्ट्य प्राप्त करुन देतात. महामार्ग दळणवळण साधने मजबूत करतातच शिवाय प्रवाशांना भारताच्या पश्चिम किनारपट्टीला लाभलेल्या अप्रतिम निसर्ग सौंदर्याचा अनुभव देतात याचे काणकोण बायपास हे उत्तम उदाहरण आहे. 


Trending

Exit mobile version