गोवा खबर

खऱ्या विरोधकाची भूमिका पत्रकारच बजावतात : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

Published

on

Spread the love

राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त ज्येष्ठ पत्रकार गुरुदास सावळ यांना जीवनगौरव पुरस्कार; पत्रकारांच्या कार्याचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक


गोवा खबर : लोकशाहीमध्ये सरकार किंवा इतर कोणीही चुकत असेल तर त्यांना योग्य मार्गावर आणण्याचे काम पत्रकार करतात. समाजातील महत्त्वाचे प्रश्न सातत्याने मांडून पत्रकार खऱ्या विरोधकाची भूमिका बजावतात, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार गुरुदास सावळ यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच पत्रकार राजेंद्र केरकर (कुबेला), जोसेफ पिंटो, गुलमिरा अल्मेडा आणि सिडनी नोरोन्हा यांचाही गौरव करण्यात आला.

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, सरकारवर कितीही टीका झाली तरी पत्रकार वस्तुस्थिती लोकांसमोर मांडण्याचे काम करतात. अनेकदा राजकारणी आणि विरोधी पक्षांचे नेतेही महत्त्वाचे विषय विसरतात. मात्र पत्रकार हे विषय सातत्याने मांडत असतात. लोकशाही मजबूत ठेवण्यासाठी पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.

सध्याच्या डिजिटल युगात पत्रकारितेचे स्वरूप बदलत आहे. तरुण पिढीने पत्रकारितेकडे वळण्याची गरज आहे. तरुणांनी आवड म्हणून किंवा अर्धवेळ का होईना, पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करावे. डिजिटल माध्यमांसाठी चांगला आशय तयार करण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

पत्रकारांच्या कल्याणासाठी राज्य सरकार विविध योजना राबवत असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकारांना पेन्शनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच लॅपटॉप, कॅमेरा आणि ई-बाईक खरेदीसाठी ५० टक्के अनुदान दिले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. केवळ मोबाईल घेऊन पत्रकार असल्याचे भासवणाऱ्या अनधिकृत व्यक्तींना आळा घालण्यासाठी पत्रकार संघटनांनी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

राज्य सरकारच्या विविध कामांची माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले की, १९७२ पूर्वीच्या घरांना कायदेशीर कागदपत्रे देण्याचे काम सरकारने केले आहे. अनेक वर्षांपासून आपल्या फ्लॅटच्या मालकी हक्कासाठी प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी ‘म्हजे घर, म्हजो फ्लॅट’ योजना राबवली जात आहे.

गोव्यातील खाण व्यवसाय पुन्हा कायदेशीररीत्या सुरू करण्यासाठी सरकारने सुरुवातीपासून प्रयत्न केले आहेत. राज्याच्या विकासासाठी सरकार विविध पातळ्यांवर काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत २०४७ चे स्वप्न पाहिले आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. नक्षलमुक्त, दहशतवादमुक्त, टीबीमुक्त आणि नशामुक्त भारत घडवण्यासाठी पत्रकारांचे सहकार्य महत्त्वाचे ठरणार आहे, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात योगदान देणाऱ्या सर्व पत्रकारांचे अभिनंदन केले आणि राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Trending

Exit mobile version