मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून नगराध्यक्षा अंजना कामत आणि नगरपालिका कर्मचाऱ्यांचे अभिनंदन
स्वच्छ सर्वेक्षणात साखळी नगरपालिकेची सलग दुसऱ्या वर्षी गोव्यात प्रथम क्रमांकावर बाजी
गोवा खबर: स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ मध्ये साखळी नगरपालिकेने सलग दुसऱ्या वर्षी गोव्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. या यशाबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा अंजना अर्जुन कामत आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले.
नगराध्यक्षा अंजना कामत यांच्या नेतृत्वाखाली साखळी नगरपालिकेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वच्छ सर्वेक्षणात सलग दुसऱ्यांदा प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल नगरपालिकेच्या कामगिरीचे कौतुक केले.
साखळी शहर स्वच्छ आणि हरित ठेवण्यासाठी नगरपालिका प्रशासन, स्वच्छता कर्मचारी आणि नागरिकांनी एकत्रितपणे केलेल्या प्रयत्नांमुळे हे यश मिळाले आहे, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.
शहराच्या स्वच्छतेसाठी नगरपालिका कर्मचारी सातत्याने काम करत आहेत. या कामात नागरिकांचेही महत्त्वाचे योगदान आहे. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे साखळी नगरपालिकेला सलग दुसऱ्या वर्षी राज्यात प्रथम क्रमांक मिळवता आला, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
साखळी शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि हरित बनवण्यासाठी नगरपालिकेने आपले प्रयत्न सुरू ठेवावेत. स्वच्छ आणि स्वयंपूर्ण साखळीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी नगराध्यक्षा अंजना कामत, नगरपालिका सदस्य, स्वच्छता कर्मचारी आणि नागरिकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.