१६ ते ३० नोव्हेंबरदरम्यान नागरिकांना ऑनलाइन माहिती भरण्याची सुविधा; सर्व गोमंतकीयांनी जनगणनेत सहभागी होण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन
गोवा खबर :गोव्यात जनगणना २०२७ अंतर्गत स्वगणना प्रक्रियेला सोमवारपासून सुरुवात झाली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी येथील आपल्या निवासस्थानी अधिकृत ऑनलाइन पोर्टलवर स्वतःच्या कुटुंबाची आणि घराची माहिती भरून या प्रक्रियेत सहभाग घेतला. राज्यातील सर्व नागरिकांनी जनगणनेत सहभागी होऊन आपली अचूक माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
जनगणना २०२७ अंतर्गत नागरिकांना १६ ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत स्वतःच्या घराची आणि कुटुंबातील सदस्यांची माहिती ऑनलाइन भरता येणार आहे. यासाठी केंद्र सरकारने https://se.census.gov.in हे अधिकृत पोर्टल उपलब्ध करून दिले आहे.
मुख्यमंत्री सावंत यांनी या पोर्टलवर आपल्या कुटुंबाची माहिती भरल्यानंतर नागरिकांनाही या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. जनगणना ही देशाच्या आणि राज्याच्या विकासासाठी महत्त्वाची प्रक्रिया आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपली माहिती अचूकपणे नोंदवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
जनगणनेतून मिळणाऱ्या माहितीचा उपयोग सरकारला विविध विकास योजना तयार करण्यासाठी होतो. तसेच प्रशासन अधिक प्रभावीपणे चालवणे, नागरिकांच्या गरजा समजून घेणे आणि भविष्यातील विकासकामांचे नियोजन करणे यासाठी ही माहिती महत्त्वाची ठरते, असे मुख्यमंत्री म्हणाले.
जनगणना अधिनियम १९४८ नुसार नागरिकांनी जनगणनेसाठी आवश्यक माहिती देणे बंधनकारक आहे. मात्र नागरिकांनी दिलेली सर्व माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाते. त्यामुळे नागरिकांनी कोणतीही शंका न बाळगता योग्य आणि अचूक माहिती भरावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
गोव्याच्या आणि देशाच्या नियोजनबद्ध विकासासाठी विश्वासार्ह माहिती उपलब्ध होणे आवश्यक आहे. नागरिकांच्या सक्रिय सहभागातून ही प्रक्रिया यशस्वी होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक गोमंतकीयाने ३० नोव्हेंबरपूर्वी स्वगणना प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
‘आमची जनगणना, आमचो विकास’ हा संदेश देत मुख्यमंत्र्यांनी जनगणना २०२७ मध्ये सर्व नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.