‘स्टोरीज विदाऊट बॉर्डर्स’ संकल्पनेवर यंदाचा इफ्फी; स्पेन सन्माननीय देश, रशिया भागीदार देश; चित्रपट प्रदर्शनांसह चित्ररथ मिरवणूक, रोमटामेळ आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
गोवा खबर: गोव्यात २० ते २८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ५७ वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) आयोजित करण्यात येणार आहे. ‘स्टोरीज विदाऊट बॉर्डर्स’ (Stories Without Borders) अर्थात ‘सीमांच्या पलीकडील कथा’ या संकल्पनेवर आधारित यंदाच्या महोत्सवात ८६ देशांतील १५० हून अधिक आंतरराष्ट्रीय चित्रपटांसह एकूण २३० पेक्षा अधिक चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत. चित्रपट प्रदर्शनांबरोबरच विविध सांस्कृतिक कार्यक्रम, चित्ररथ मिरवणूक, रोमटामेळ, कार्यशाळा आणि चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद अशा कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय तसेच गोवा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या या महोत्सवाची अंमलबजावणी गोवा मनोरंजन संस्थेमार्फत (ईएसजी) केली जाणार आहे. यंदा स्पेनला सन्माननीय देशाचा, तर रशियाला भागीदार देशाचा दर्जा देण्यात आला आहे.
सहा ठिकाणी १३ पडद्यांवर चित्रपटांचे प्रदर्शन
यंदाच्या इफ्फीमध्ये सहा प्रमुख ठिकाणांवरील १३ पडद्यांवर चित्रपटांचे प्रदर्शन होणार आहे. यामध्ये पणजीतील आयनॉक्स येथे चार पडदे, मॅकनिझ पॅलेस येथे एक, पर्वरीतील आयनॉक्स येथे चार, झेड स्क्वेअर सम्राट-अशोक येथे दोन, फोंड्यातील मॅजिक मूव्हीज येथे एक आणि मडगावच्या रवींद्र भवनात एका पडद्यावर चित्रपट दाखविण्यात येणार आहेत.
या सर्व ठिकाणी मिळून चार हजारांहून अधिक प्रतिनिधींसाठी आसनव्यवस्था उपलब्ध असेल. दिव्यांग व्यक्तींसाठीही आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
महोत्सवाचा उद्घाटन सोहळा २० नोव्हेंबर रोजी, तर समारोप सोहळा २८ नोव्हेंबर रोजी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये होणार आहे.
‘धुरंधर’ आणि ‘बिकमिंग’ उद्घाटनाचे चित्रपट
यंदाच्या महोत्सवात ‘धुरंधर’ आणि ‘बिकमिंग’ हे उद्घाटनाचे चित्रपट असतील. भारतीय पॅनोरमा विभागात २५ कथापट आणि २० अकथापट प्रदर्शित केले जाणार आहेत.
ब्रिक्स देशांच्या चित्रपटांवरही विशेष भर देण्यात येणार असून या विभागाचे उद्घाटन ‘रामायण’ चित्रपटाने होणार आहे.
महोत्सवात ५२ महिला चित्रपट निर्मात्या आणि ६२ पदार्पण करणारे चित्रपट निर्माते सहभागी होणार आहेत. ‘क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो’ या उपक्रमाच्या सहाव्या आवृत्तीत चित्रपट निर्मितीच्या १३ विविध क्षेत्रांतील निवडलेल्या १०० तरुणांना संधी मिळणार आहे.
चित्रपट निर्माते, वितरक, खरेदीदार आणि गुंतवणूकदार यांना एकत्र आणण्यासाठी ‘वेव्ह्ज फिल्म बाजार’चे आयोजन करण्यात येणार आहे.
२१ ते २७ नोव्हेंबरदरम्यान १४ विशेष सत्रे
कला अकादमीमध्ये २१ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत एकूण १४ विशेष सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मास्टरक्लास, कार्यशाळा, चर्चासत्रे, चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती आणि संवाद कार्यक्रमांचा समावेश असेल.
चित्रपट निर्मितीतील नवीन तंत्रज्ञान, अनुभव आणि विविध पैलूंवर या सत्रांमध्ये चर्चा होणार आहे.
२५ नोव्हेंबरला भव्य इफ्फी चित्ररथ मिरवणूक
‘सेलिब्रेटिंग द जॉय ऑफ सिनेमा’ या संकल्पनेवर आधारित इफ्फी चित्ररथ मिरवणूक २५ नोव्हेंबर रोजी गोवा मनोरंजन संस्थेच्या परिसरातून कला अकादमीपर्यंत काढण्यात येणार आहे.
या मिरवणुकीत आकर्षक चित्ररथ, सांस्कृतिक कार्यक्रम आणि नागरिकांचा सहभाग असणार आहे. चित्ररथ स्पर्धेत पाच गट सहभागी होणार असून विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिके दिली जाणार आहेत.
प्रथम क्रमांकासाठी ३ लाख ५० हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ३ लाख रुपये, तृतीय क्रमांकासाठी २ लाख ५० हजार रुपये, चौथ्या क्रमांकासाठी २ लाख रुपये आणि पाचव्या क्रमांकासाठी १ लाख ५० हजार रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. याशिवाय पाच उत्तेजनार्थ पारितोषिके प्रत्येकी एक लाख रुपयांची असतील.
गोव्याच्या पारंपरिक रोमटामेळाचे विशेष आकर्षण
गोव्याच्या पारंपरिक लोकसंस्कृतीचे दर्शन घडविण्यासाठी २३, २४, २६ आणि २७ नोव्हेंबर रोजी मांडवी नदीकिनारी रोमटामेळ कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमात सात पथके सहभागी होणार आहेत. रोमटामेळ स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी तीन लाख रुपये, द्वितीय क्रमांकासाठी अडीच लाख रुपये, तृतीय क्रमांकासाठी दोन लाख रुपये, चौथ्या क्रमांकासाठी एक लाख ७५ हजार रुपये आणि पाचव्या क्रमांकासाठी दीड लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे.
आकाशकंदील स्पर्धेचे आयोजन
२५ नोव्हेंबर रोजी मोराच्या संकल्पनेवर आधारित आकाशकंदील स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. राज्यातील १२ तालुक्यांतील सहभागींसाठी स्वतंत्र पारितोषिकांची व्यवस्था करण्यात आली आहे.
प्रत्येक तालुक्यातील प्रथम विजेत्याला दहा हजार रुपये, द्वितीय विजेत्याला आठ हजार रुपये आणि तृतीय विजेत्याला पाच हजार रुपये दिले जाणार आहेत. इतर सहभागींसाठी प्रत्येकी ५०० रुपयांचे प्रोत्साहनपर पारितोषिक ठेवण्यात आले आहे.
गोमंतकीय विभागासाठी १२ चित्रपटांची निवड
यंदाच्या इफ्फीमध्ये गोमंतकीय चित्रपटांना विशेष स्थान देण्यात आले आहे. गोवा मनोरंजन संस्थेकडे कथापट आणि अकथापट विभागांत एकूण ३५ प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी परीक्षक मंडळाने १२ चित्रपटांची निवड केली आहे.
या निवड समितीचे अध्यक्ष दिग्दर्शक ओम राऊत असून जदुमोनी दत्ता आणि अभिनेत्री अमृता खानविलकर हे सदस्य आहेत.
निवड झालेल्या चित्रपटांमध्ये ‘Ancessao’, ‘Purnata’, ‘Umesh’, ‘Shakuntala’, ‘Medium Piece’, ‘Woodworm (Roto)’, ‘Noise’, ‘Daryaa’, ‘Cheers!’, ‘Perfect Shot’, ‘Bapo Kale’ आणि ‘Health Centre’ यांचा समावेश आहे.
गोमंतकीय विभागाचे उद्घाटन ‘Ancessao’ या चित्रपटाने होणार आहे.
मिरामार, मडगाव आणि वागातोर येथे खुल्या जागेत चित्रपट प्रदर्शन
चित्रपटगृहांबाहेरही चित्रपटांचा आनंद घेता यावा, यासाठी मिरामार, मडगाव येथील रवींद्र भवन आणि वागातोर हेलिपॅड येथे खुल्या जागेत चित्रपट प्रदर्शनांचे आयोजन करण्यात येणार आहे.
या उपक्रमामुळे स्थानिक नागरिक, पर्यटक आणि चित्रपटप्रेमींना खुल्या वातावरणात चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे.
‘इफ्फीमाइल्स’मध्ये कला, संस्कृती आणि खाद्यसंस्कृती
यंदाच्या महोत्सवातील आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे ‘इफ्फीमाइल्स’ हा उपक्रम होय.
मांडवी नदीकिनारी गोवा मनोरंजन संस्थेच्या कार्यालयासमोरील परिसरात हा उपक्रम आयोजित केला जाणार आहे. येथे चित्रपट, कला, हस्तकला, संस्कृती आणि खाद्यपदार्थांशी संबंधित विविध कार्यक्रम असतील.
या उपक्रमात नोंदणीकृत प्रतिनिधींबरोबरच स्थानिक नागरिक आणि पर्यटकांनाही सहभागी होता येणार आहे.
मुलांसाठी २१ ते २८ नोव्हेंबरदरम्यान विशेष चित्रपट प्रदर्शन
लहान मुलांमध्ये चित्रपटांविषयी आवड निर्माण करण्यासाठी गोवा मनोरंजन संस्था आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पिक्चर टाइम’च्या सहकार्याने विशेष चित्रपट प्रदर्शनांचे आयोजन करण्यात येणार आहे.
२१ ते २८ नोव्हेंबरदरम्यान पणजीतील कला अकादमी परिसरात मुलांसाठी प्रेरणादायी, शैक्षणिक आणि मनोरंजनात्मक चित्रपट दाखविण्यात येतील.
प्रत्येक प्रदर्शनासाठी १५० आसनांची व्यवस्था असेल. शाळांनी विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मोठ्या गटांच्या नोंदणीसाठी प्रदीप भट्ट (८२७९८७३१६२) आणि अनुपम बघेल (९१३१३६२१२१) यांच्याशी संपर्क साधता येईल.
प्रतिनिधींसाठी मोफत वाहतूक सुविधा
इफ्फीमध्ये सहभागी होणाऱ्या नोंदणीकृत प्रतिनिधींसाठी मोफत रिक्षा आणि कदंब महामंडळाच्या इलेक्ट्रिक बसची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
ही सुविधा सकाळी ८.३० वाजल्यापासून दररोजच्या शेवटच्या चित्रपट प्रदर्शनापर्यंत सुरू राहणार आहे.
मिरामार येथून पर्वरीतील आयनॉक्स, फोंड्यातील मॅजिक मूव्हीज आणि मडगावच्या रवींद्र भवनापर्यंत बससेवा उपलब्ध असेल. तसेच पणजीतील आयनॉक्स ते वेव्ह्ज फिल्म बाजारचे आयोजनस्थळ असलेल्या हॉटेल ताज सिदाद दे गोवा होरायझनपर्यंतही वाहतूक सुविधा देण्यात येणार आहे.
इफ्फीसाठी सात हजारांहून अधिक नोंदणी
यंदाच्या महोत्सवासाठी आतापर्यंत सात हजारांहून अधिक प्रतिनिधींनी नोंदणी केली आहे. यामध्ये चित्रपटप्रेमी, चित्रपट क्षेत्रातील व्यावसायिक, विद्यार्थी आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे.
आंतरराष्ट्रीय आणि भारतीय चित्रपटांचे प्रदर्शन, विविध देशांतील चित्रपट निर्मात्यांचा सहभाग, गोमंतकीय संस्कृतीचे दर्शन घडविणारे कार्यक्रम आणि सर्व वयोगटांसाठी आयोजित उपक्रमांमुळे यंदाचा ५७ वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव विशेष आकर्षण ठरणार आहे.
‘सीमांच्या पलीकडील कथा’ या संकल्पनेतून जगभरातील चित्रपट संस्कृतीला एकत्र आणण्यासाठी गोवा पुन्हा एकदा सज्ज झाला आहे.