कासारवर्णे येथे १९ महिला स्वयंसहायता गटांच्या अध्यक्षांशी संवाद; मराठी राजभाषा निर्धार समितीच्या आरती गावस यांचे मार्गदर्शन
गोवा खबर: गोव्यात मराठी भाषेला कोकणी भाषेबरोबर राजभाषेचा दर्जा मिळावा, या मागणीसाठी मराठी राजभाषा निर्धार समितीने सुरू केलेल्या जनजागृती मोहिमेला महिला स्वयंसहायता गटांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. पेडणे तालुक्यातील कासारवर्णे येथे एम. एस. भूमी महिला ग्राम सेवा संघाच्या मासिक सभेत मराठी राजभाषेच्या मागणीसंदर्भात विशेष संवाद आयोजित करण्यात आला.
या सभेला विविध १९ महिला स्वयंसहायता गटांच्या अध्यक्षा उपस्थित होत्या. मराठी राजभाषा निर्धार समितीच्या पेडणे प्रखंडाच्या कार्यकर्त्या कु. आरती गावस यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधून गोव्यात मराठी भाषेला कोकणीबरोबर राजभाषेचा दर्जा मिळावा, या मागणीमागील भूमिका स्पष्ट केली.
गोव्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक जीवनात मराठी भाषेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मराठी भाषेला समृद्ध साहित्यिक आणि सांस्कृतिक परंपरा लाभली असून गोव्याच्या सांस्कृतिक जडणघडणीत या भाषेचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. त्यामुळे मराठीला राजभाषेचा दर्जा मिळणे आवश्यक असल्याचे आरती गावस यांनी उपस्थित महिलांना सांगितले.
यावेळी त्यांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सुरू असलेल्या चळवळीची माहिती दिली. तसेच मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळावा, या मागणीला महिला स्वयंसहायता गटांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले.
या विषयावर चर्चा करण्यासाठी मासिक सभेत वेळ उपलब्ध करून देण्याकरिता शिवानी शिवाजी नाईक आणि जानकी जयराम परब यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या सहकार्यामुळे एकाच व्यासपीठावर १९ महिला स्वयंसहायता गटांच्या अध्यक्षांपर्यंत मराठी राजभाषेच्या मागणीची माहिती पोहोचविण्याची संधी मिळाली.
या संवादादरम्यान उपस्थित महिलांना मराठी भाषेचा सांस्कृतिक वारसा, गोव्यातील तिचे स्थान आणि राजभाषेचा दर्जा मिळण्याची आवश्यकता याबाबत माहिती देण्यात आली. महिलांनी या विषयाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे समितीने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
मराठी भाषेच्या सन्मानासाठी, अस्मितेसाठी आणि हक्कांसाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले. महिला स्वयंसहायता गटांचा सहभाग मराठी राजभाषेच्या मागणीसाठी सुरू असलेल्या चळवळीला बळ देणारा ठरेल, असा विश्वास समितीने व्यक्त केला.
मराठी राजभाषा निर्धार समितीचे निमंत्रक सुभाष भास्कर वेलिंगकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून ही माहिती दिली.