गोवा खबर

आय मॅटर’ : ओळख, आपलेपणा आणि दुसऱ्या संधीची प्रभावी कथा इफ्फी  2026 मध्ये मिड-फेस्ट चित्रपट म्हणून दाखवली जाणार

Published

on

Spread the love

गोवा खबर:प्रख्यात चित्रपट निर्मात्या अलिना सेरबान यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला ‘आय मॅटर’ (Eu Contez) हा बहुभाषिक चित्रपट  57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) मिड-फेस्ट चित्रपट म्हणून प्रदर्शित होणार असून, या चित्रपटाचा हा भारतीय प्रीमियर असेल. रोमानिया, जर्मनी आणि बेल्जियम यांची संयुक्त निर्मिती असलेल्या या 101 मिनिटांच्या चित्रपटात ओळख, कुटुंब, आपलेपणा आणि भूतकाळातील परिस्थितीच्या पलीकडे जाऊन भविष्याचा शोध घेण्याचा प्रवास उलगडण्यात आला आहे. रोमानियन आणि रोमानी भाषेतील संवाद असलेला हा चित्रपट महोत्सवात एक वेगळा युरोपियन चित्रपटविषयक दृष्टिकोन घेऊन येत आहे.

या चित्रपटाची कथा रिबेका या तरुण रोमा महिलेभोवती फिरते, जी आजवर जिथे वाढली त्या अनाथाश्रमाचा निरोप घेण्याची तयारी करत आहे. तिच्या वडिलांची तुरुंगातून सुटका होणार असल्याने, तिला ज्या कुटुंबाची नेहमीच ओढ होती ते कुटुंब सापडेल आणि आयुष्याचा एक नवा अध्याय सुरू होईल, अशी तिला आशा आहे. अभिनयाचे शिक्षण घेण्यासाठी विद्यापीठात मिळालेल्या प्रवेशामुळे तिच्या आयुष्यात नवीन आशा निर्माण होते आणि स्वतःचे भविष्य घडवण्याची संधी तिला मिळते. मात्र, या अनोळखी जगात वावरताना तिच्या भूतकाळातील न सुटलेल्या कोड्यांचे अनुभव पुन्हा समोर येतात, ज्यामुळे निवडीच्या अतिशय  कठीण पर्यायांना सामोरे जावे लागते.

रिबेकाच्या प्रवासातून ‘आय मॅटर’ हा चित्रपट, स्थैर्य असलेल्या कौटुंबिक वातावरणाशिवाय मोठे होताना येणारी भावनिक आव्हाने, आपल्याला स्वीकारले जावे, यांची आस आणि समाजात स्वतःचे स्थान निर्माण करण्याचा दृढनिश्चय यांचा वेध घेतो. एका तरुण रोमा महिलेच्या अनुभवांच्या पार्श्वभूमीवर आधारलेला हा चित्रपट सामाजिक समावेश, प्रतिष्ठा आणि वैयक्तिक स्वातंत्र्य या प्रश्नांनाही हात घालतो.

प्रसिद्ध अभिनेत्री आणि नाटककार असलेल्या अलिना सेरबान यांचा हा दिग्दर्शक म्हणून पहिलाच पूर्ण लांबीचा चित्रपट आहे.

इफ्फी 2026 मधील मिड-फेस्ट सादरीकरण म्हणून, ‘आय मॅटर’ हा चित्रपट 24 नोव्हेंबर 2026 रोजी सायंकाळी 4:30 वाजता पीव्हीआर आयनॉक्स पणजी (ऑडी 1) आणि पीव्हीआर आयनॉक्स पर्वरी (ऑडी 1) येथे एकाच वेळी प्रदर्शित केला जाईल. दिग्दर्शिका अलिना सेरबान आणि मुख्य अभिनेत्री डेनिसा फारकास विशेष अतिथी म्हणून या महोत्सवाला उपस्थित राहणार आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या दिवशी पीव्हीआर आयनॉक्स पणजी येथे या पाहुण्यांच्या उपस्थितीत रेड-कार्पेट सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले आहे.

Trending

Exit mobile version