गोवा खबर

महाराष्ट्रात कोकणी अकादमी सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहिणार : डॉ. प्रमोद सावंत

Published

on

Spread the love

गोवा खबर : महाराष्ट्रातील कोकणी भाषिक आणि साहित्यिकांसाठी स्वतंत्र कोकणी अकादमी सुरू करण्याची गरज आहे. यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिणार असल्याचे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

पुण्यातील औद्योगिक तंत्र शिक्षण संस्थेत आयोजित ३४ व्या अखिल भारतीय कोकणी परिषदेच्या अधिवेशनात ते बोलत होते. दोन दिवसांच्या या अधिवेशनाला गोव्यासह देशभरातील कोकणी साहित्यिक आणि कोकणी भाषाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाला विधानपरिषद सदस्य अमित गोरखे, ज्येष्ठ साहित्यिका डॉ. अरुणा ढेरे, अखिल भारतीय कोकणी परिषदेचे अध्यक्ष नंदगोपाल शेणै, स्वागत समितीच्या अध्यक्षा अश्विनी कुलकर्णी, कार्यकारी अध्यक्ष अल्फियो मोंतेरो, चेतन आचार्य आणि स्नेहा सबनीस उपस्थित होते.

मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, कोकणी भाषेचा विकास आणि संवर्धन करण्यासाठी गोवा सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कोकणी भाषा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. डिजिटल इंडिया भाषिणी आणि केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सहकार्याने कोकणी भाषेसाठी लार्ज लँग्वेज मॉडेल तयार करण्यात आले आहे. तसेच गुगल ट्रान्सलेशनमध्ये कोकणी भाषेचा समावेश होण्यासाठीही प्रयत्न करण्यात आले आहेत.

गोव्यात कोकणी माध्यमाच्या शाळांना प्रोत्साहन दिले जात आहे. पूर्वी कोकणी शाळा उपलब्ध नसल्यामुळे आपल्यालाही प्राथमिक शिक्षण मराठीतून घ्यावे लागले होते. मात्र आता ग्रामीण भागासह राज्यातील ज्या परिसरातून कोकणी शाळांची मागणी होत आहे, त्या ठिकाणी सरकार परवानगी देत असल्याचे त्यांनी सांगितले.

पुण्यातील अश्विनी कुलकर्णी यांनीही गोव्यात कोकणी शाळा सुरू करण्यासाठी परवानगी मागितली आहे. त्यांच्या संस्थेचे गोव्यात स्वागत असून अशा उपक्रमांना सरकार सहकार्य करेल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

कोकणी साहित्याच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या साहित्यिकांचा गोवा सरकारकडून दरवर्षी सन्मान केला जातो. अधिकृत भाषा संचालनालयामार्फत गोव्यातील तसेच गोव्याबाहेर राहून कोकणी साहित्याची सेवा करणाऱ्या साहित्यिकांना पुरस्कार दिले जातात. कोकणी भाषा आणि संस्कृतीचे जतन करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

गोव्याच्या तियात्र या लोककलेचा प्रसार जगातील २६ देशांमध्ये झाला आहे. या लोककलेची ऐतिहासिक नोंद केंद्र सरकारच्या कला आणि संस्कृती मंत्रालयाकडे करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

जगभरातील कोकणी भाषिकांना एकत्र आणण्यासाठी गोव्यात ग्लोबल कोकणी कन्व्हेन्शन आयोजित करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला. कोकणी ही गोव्याची राजभाषा असल्यामुळे अशा आंतरराष्ट्रीय संमेलनासाठी गोवा सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासन त्यांनी दिले.

गोवा आणि महाराष्ट्र यांच्यातील सांस्कृतिक संबंधांचा उल्लेख करताना मुख्यमंत्री सावंत यांनी गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्यात पुणे आणि मुंबईतील नागरिकांनी दिलेल्या योगदानाची आठवण करून दिली. शणै गोंयबाब, बाकीबाब बोरकर, रवींद्र केळकर आणि पुरुषोत्तम काकोडकर यांसारख्या साहित्यिकांनी गोव्याच्या भाषा, संस्कृती आणि स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावल्याचे त्यांनी सांगितले.

गोव्यात महाराष्ट्र परिचय केंद्राच्या माध्यमातून मराठी कला आणि संस्कृतीचा प्रसार झाला. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात स्वतंत्र कोकणी अकादमी सुरू झाल्यास तेथील कोकणी भाषिक आणि साहित्यिकांना मोठे प्रोत्साहन मिळेल. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिणार असून विधानपरिषद सदस्य अमित गोरखे यांनीही या मागणीचा पाठपुरावा करावा, असे आवाहन त्यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये मातृभाषा आणि स्थानिक भाषांमधून प्राथमिक शिक्षण देण्यावर भर देण्यात आला आहे. नवीन पिढीने आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगला पाहिजे. तरुणांनी कोकणी साहित्याचे वाचन करावे आणि घरामध्ये कोकणी भाषेत संवाद साधावा, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

आजच्या तरुण पिढीने केवळ रोजगार आणि उपजीविकेपुरते मर्यादित न राहता साहित्य, भाषा आणि संस्कृतीकडेही लक्ष दिले पाहिजे. साहित्याच्या वाचनातून मानसिक शांतता मिळते आणि आपल्या सांस्कृतिक वारशाची ओळख कायम राहते. त्यामुळे कोकणी भाषा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

Trending

Exit mobile version