दालनात आकर्षक रचनात्मक सादरीकरणाद्वारे ‘विकास आणि विरासत’चे दर्शन
गोवा खबर:भारत व्यापार प्रोत्साहन संस्थेच्या बहुप्रतीक्षित अशा ४५व्या ‘भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात’ (IITF) “विरासत और विकास” या संकल्पनेवर आधारित गोवा दालनाचे आज नवी दिल्लीत, गोव्यातील माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे संचालक श्री. अभिर हेदे यांच्या हस्ते उदघाटन झाले.
याप्रसंगी माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे (DIP) सहाय्यक माहिती अधिकारी श्री. शांतो नाईक, माहिती सहाय्यक श्री. सिद्धेश सामंत, गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाचे (IPB) प्रशासकीय अधिकारी श्री. सदाशिव पंडित, गोवा पर्यटन विकास महामंडळाचे श्री. गौरीश गावडे, गोवा राज्य विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषदेचे प्रकल्प वैज्ञानिक श्री. दीपक परब, गोवा राज्य जैवविविधता मंडळाचे प्रकल्प सहाय्यक श्री. रुपेश वेळीप आणि श्री. अरविंद नाईक उपस्थित होते. यावेळी “विकास और विरासत, गोवा: व्हेअर हेरिटेज मीट्स द फ्युचर, अ लेगसी प्रिझर्व्हड, अ फ्युचर ट्रान्सफॉर्म्ड” (वारसा आणि भविष्याचा संगम, जपलेला वारसा, घडवलेले भविष्य) या माहितीपुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले.
आयआयटीएफ २०२६ मधील गोवा दालन हे ‘विकास आणि विरासत’ या संकल्पनेअंतर्गत राज्याचा समृद्ध वारसा, विकासात्मक उपक्रम, पारंपरिक हस्तकला आणि सांस्कृतिक ओळख यांचे एक आगळे वेगळे दृश्य आणि अनुभवात्मक दर्शन घडवते. गोव्याच्या माहिती आणि प्रसिद्धी खात्याद्वारे या दालनाचे आयोजन करण्यात आले असून, या व्यासपीठाच्या माध्यमातून राज्याची विविध बलस्थाने आणि यशोगाथा प्रदर्शित केल्या जात आहेत.
गोव्यातील नामांकित संस्था मेसर्स मिर्ची रिपब्लिक मीडिया प्रॉडक्शन (भागीदार श्री. आर्यन खेडेकर आणि श्री. सन्मान केंकरे) यांनी या दालनाची संकल्पना, रचना आणि उभारणी केली असून, ते दालनाचे आणि संबंधित उपक्रमांचे व्यवस्थापनही पाहत आहेत. दालनाच्या रचनेत गोव्याच्या पारंपरिक वास्तुकलेचा वारसा आणि विकासाची दृष्टी यांचा सुंदर संगम साधण्यात आला आहे. उतरत्या कौलारू छतांची आणि बाल्कनी असलेली पारंपरिक गोमंतकीय घरांची प्रतिकृती, मातीच्या भिंती आणि त्यावर गोव्याची पारंपरिक कलाकुसर दर्शवणारी नक्षीदार ‘कावी कला’ हे या दालनाचे मुख्य आकर्षण आहे. याला आधुनिक संकल्पनात्मक प्रदर्शन विभागांची जोड देण्यात आली असून, त्यातून राज्याचा सांस्कृतिक वारसा जपत सुरू असलेला विकासाचा प्रवास एकत्रितपणे मांडण्यात आला आहे.
अभ्यागतांना गोव्याच्या विविध पैलूंची ओळख करून देण्यासाठी या दालनाची विचारपूर्वक वेगवेगळ्या संकल्पनात्मक विभागांत, विभागणी करण्यात आली आहे. ‘टाईमलेस गोवा’ (चिरंतन गोवा) या विभागात पारंपरिक वास्तुकला, कला प्रकार आणि सांस्कृतिक परंपरांवर आधारित कलात्मक सादरीकरणाद्वारे राज्याचा समृद्ध वारसा साजरा केला जात आहे. ‘स्वयंपूर्ण गोवा’ या विभागात विविध सरकारी उपक्रमांचे प्रदर्शन करून राज्याची आत्मनिर्भरता, विकास आणि सर्वसमावेशक प्रगती अधोरेखित केली आहे. सहभागी विभाग, स्थानिक कारागीर, उद्योजक आणि स्वदेशी उत्पादनांसाठी येथे स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या दालनात गोव्याची वैशिष्ट्यपूर्ण स्थानिक आणि जीआय (GI) मानांकन प्राप्त उत्पादनेही प्रदर्शित करण्यात आली आहेत. यामध्ये गोव्याचे काजू, मयंडोळी केळी, गोव्याचे खाजे, दोदोल/बिबिंका, कोरगुट तांदूळ, आगशीची वांगी, सात शिरांची भेंडी, खोला मिरची आणि हरमल मिरची आदींचा समावेश आहे.
अभ्यागतांना येथे नारळाच्या करवंटीपासून बनवलेल्या वस्तू, शिंपल्यांच्या कलाकृती, टेराकोटा आणि दगडी दागिने, क्रोशे काम, हातमाग उत्पादने आणि पारंपरिक कुणबी साडी यांसारख्या गोमंतकीय हस्तकला आणि पारंपरिक उत्पादनांची विविधता पाहता येईल. गोवा राज्य जैवविविधता मंडळाचा उपक्रम असलेल्या ‘गोवन’ (GoVan) द्वारे गोव्याची जैवविविधता आणि कोकम, काजू व मसाले यांसारखी स्वदेशी उत्पादने प्रदर्शित केली आहेत.
या दालनात गोवा गुंतवणूक प्रोत्साहन आणि सुविधा मंडळ, विज्ञान, तंत्रज्ञान आणि कचरा व्यवस्थापन विभाग, हस्तकला, वस्त्रोद्योग आणि काथ्या विभाग, गोवा राज्य जैवविविधता मंडळ आणि गोवा पर्यटन विकास महामंडळ (GTDC) यांसारखे विविध सरकारी विभाग आणि संस्था सहभागी झाल्या आहेत. त्यांच्या प्रदर्शनातून सरकारी उपक्रम, प्रमुख योजना, स्वदेशी उत्पादने आणि विविध क्षेत्रांतील गुंतवणुकीच्या संधी अधोरेखित केल्या आहेत.
गोव्यातील कलाकारांचे दररोज होणारे सांस्कृतिक कार्यक्रम या दालनाचे आकर्षण वाढवत आहेत, ज्यातून राज्याची समृद्ध लोकपरंपरा, संगीत आणि नृत्य यांचे दर्शन घडते. अभ्यागतांना “चितारी कला निर्मिती” आणि “अझुलेजोस (Azulejos) टाइल पेंटिंग” यांसारख्या परस्परसंवादी उपक्रमांमध्येही सहभागी होता येईल.
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री श्री. पियुष गोयल यांच्या हस्ते भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचे उद्घाटन झाले. त्यानंतर सहभागी राज्ये, केंद्रशासित प्रदेशांनी आपापल्या दालनांचे उद्घाटन केले.
यापूर्वीच्या पर्वांमध्येही गोवा दालनाने उत्कृष्ट सादरीकरण आणि प्रदर्शनासाठी प्रशंसा मिळवली असून, लहान राज्यांच्या श्रेणीत सर्वोत्कृष्ट दालनांमध्ये स्थान पटकावले आहे.
आपल्या वैशिष्ट्यपूर्ण वास्तुकलेचे सादरीकरण, संकल्पनात्मक विभाग, स्वदेशी उत्पादनांचे प्रदर्शन, परस्परसंवादी अनुभव आणि सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे आयआयटीएफ २०२६ मधील गोवा दालन ‘विकास आणि विरासत’चे सार जिवंत करते — जिथे गोव्याच्या चिरंतन परंपरा प्रेरणा देतात आणि येथील समृद्ध वारसा राज्यासाठी अधिक उज्ज्वल आणि आत्मनिर्भर भविष्याकडील प्रवास दर्शवितो.
गोवा दालनाचे स्टॉल क्र. ३एफ-०४ए (3F-04A), हॉल क्र. ३, पहिला मजला, भारत मंडपम, प्रगती मैदान, नवी दिल्ली येथे आहे.
अधिक माहितीसाठी भेट द्या: www.iitfgoapavilion.com