गोवा खबर

माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची भाजपमध्ये घरवापसी

Published

on

Spread the love

मांद्रे मतदारसंघातील शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

गोवा खबर: गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी आज भारतीय जनता पक्षात अधिकृतपणे पुनर्प्रवेश केला. त्यांच्यासोबत मांद्रे मतदारसंघातील सुमारे ४०० ते ५०० प्रमुख कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. पणजी येथील भाजपच्या ‘अटल भवन’ या कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

या कार्यक्रमाला गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, दक्षिण गोवा सहप्रभारी अनिल अँटनी, प्रदेश सरचिटणीस दयानंद सोपटे आणि सदानंद भगत आदी नेते उपस्थित होते.

यावेळी बोलताना लक्ष्मीकांत पार्सेकर म्हणाले की, २०२२ च्या विधानसभा निवडणुकीवेळी काही कारणांमुळे आपण पक्षापासून दूर गेलो होतो आणि आपल्यामुळे अनेक कार्यकर्तेही दूर राहिले, याची आपल्याला खंत होती. मात्र, या काळात आपण किंवा आपल्या कार्यकर्त्यांनी इतर कोणत्याही पक्षात प्रवेश केला नाही. आता सर्व गैरसमज दूर झाले असून, नवीन जोमाने आणि उत्साहाने पक्षबांधणीसाठी काम करण्यास आपण सज्ज आहोत. मांद्रे मतदारसंघातून सुरू झालेली ही पक्षवाढीची लाट उत्तर गोव्यापासून दक्षिण गोव्यापर्यंत नेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पार्सेकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. पक्षात परतल्यानंतर कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर खरा आनंद दिसत असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत २०४७’ आणि ‘विकसित गोवा २०३७’ या स्वप्नासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच, आगामी २०२७ च्या गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपच्या ३० जागा निवडून आणण्याचा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी यावेळी बोलताना सांगितले की, लोकसभा निवडणुकीत भाजपला गोव्यात ५२ टक्के मते मिळतात, परंतु विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांमधील फुटीमुळे काही जागा गमवाव्या लागतात. सर्व जुन्या आणि नवीन कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काम केल्यास २०२७ च्या विधानसभा निवडणुकीतही ५२ टक्के मतांसह ३० जागा जिंकण्याचे उद्दिष्ट नक्कीच पूर्ण होईल.

Trending

Exit mobile version