गोवा खबर

‘स्टोरीज विदाऊट बॉर्डर्स’ या संकल्पनेअंतर्गत आयोजित भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 चित्रपटसृष्टीला गोव्यात एकत्र आणण्यासाठी सज्ज

Published

on

Spread the love


86 देशांतील 150 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या माध्यमातून अवघे जग गोव्यात एकवटणार

57व्या ‘इफ्फी’साठी जागतिक चित्रपट समुदायाचे स्वागत करण्यासाठी गोवा सज्ज : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

देशोदेशींच्या संस्कृतींना जोडण्याची ताकद चित्रपटांमध्ये असल्याची बाब महोत्सवाचे संचालक आशुतोष गोवारीकर यांनी केली अधोरेखित

‘फादरलँड’ हा 57व्या ‘इफ्फी’चा उद्घाटनीय चित्रपट, ‘आय मॅटर’ मध्य महोत्सवी चित्रपट तर ‘वी आर ऑल स्ट्रेंजर्स’ समारोपाचा चित्रपट

‘इफ्फी 2026’ मध्ये ब्रिक्स चित्रपटसृष्टीवर विशेष भार; भारताचा ‘रामायण’ या विभागाचा उद्घाटनीय चित्रपट

76 चित्रपट, 18 भाषा : ‘इंडियन पॅनोरमा’च्या माध्यमातून भारतीय चित्रपटसृष्टीच्या विविधांगी अभिव्यक्तिचा गौरव; ‘धुरंधर’ आणि ‘बिकमिंग’ या चित्रपटांनी होणार या विभागाचे उद्घाटन

57व्या ‘इफ्फी’मध्ये ‘सन्माननीय देश’ म्हणून स्पेनची चित्रपटसृष्टीचे रंग भरणार, तर रशिया ‘भागीदार देश’ म्हणून होणार सहभागी

भारतातील सर्जनशील प्रतिभेला बळ देण्यासाठी आणि जागतिक कथात्मक मांडणीला बळकटी देण्यासाठी ‘वेव्हज फिल्म बाजार’ आणि ‘नेटफ्लिक्स’ची भागिदारी

नवी अभिव्यक्ती, ताजा दृष्टिकोन : सर्वोत्कृष्ट पदार्पणीय कथात्मक चित्रपट विभागात सात आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये स्पर्धा

गोवा खबर:57वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) गोव्यात 20 ते 28 नोव्हेंबर 2026 दरम्यान होणार आहे. ‘स्टोरीज विदाऊट बॉर्डर्स’ ही यंदाच्या महोत्सवाची संकल्पना आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने जगभरातील चित्रपटकर्मी, चित्रपट रसिक आणि सर्जनशील कलाकार एकत्र येणार आहेत. यंदा या महोत्सवासाठी 137 देशांमधून 1,900 हून अधिक चित्रपटांच्या प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत. यंदाच्या महोत्सवात 86 देशांतील 150 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय चित्रपट दाखवले जाणार आहेत. यातून या महोत्सवाची वाढती जागतिक व्याप्ती दिसून येते. यासोबतच या महोत्सवाच्या माध्यमातून आंतरसांस्कृतिक देवाणघेवाण, कथात्मक मांडणीतली वैविध्यपूर्णता आणि चित्रपटसृष्टीतील उत्कृष्टतेसाठी एक बहुआयामी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.

57व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची पूर्वतयारी आणि महोत्सवाच्या रुपरेषीची झलक मांडणारी अर्थात कर्टन रेझर पत्रकार परिषद आज गोव्यातील ताज सिदाद दे गोवा होरायझन इथे पार पडली. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी भारतीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीचा गौरव करणाऱ्या महोत्सवाच्या विस्तृत कार्यक्रमाचे अनावरण केले. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासोबतच्या गोव्याच्या नात्याबद्दल त्यांनी अभिमान व्यक्त केला. हा महोत्सव राज्याच्या सांस्कृतिक ओळखीचा आणि वार्षिक दिनदर्शिकेचा अविभाज्य भाग असल्याचे त्यांनी नमूद केले. जागतिक चित्रपटसृष्टीतील मान्यवरांच्या स्वागतासाठी राज्य सरकारने केलेल्या तयारीची माहितीही त्यांनी यावेळी दिली. अंतर्गत चित्रपट प्रदर्शनाची ठिकाणे, वाहतूक व्यवस्था, आतिथ्य आणि सार्वजनिक सुविधांशी संबंधित तयारीचा अंतर्भाव असल्याचे त्यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेला गोवा मनोरंजन संस्थेच्या (ESG – Entertainment Society of Goa) उपाध्यक्ष लोबो, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे (NFDC – National Film Development Corporation) अध्यक्ष कृष्ण कुमार आणि महोत्सवाचे संचालक आशुतोष गोवारीकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यासोबतच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव प्रभात, कथात्मक चित्रपट (फीचर) परीक्षक मंडळाचे अध्यक्ष मधुर भांडारकर आणि कथाबाह्य चित्रपट परीक्षक मंडळाचे अध्यक्ष हिमांशू शेखर खटुआ हेदेखील उपस्थित होते. याशिवाय गोवा मनोरंजन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मांडेकर, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक धीरज सिंग आणि पत्र सूचना कार्यालय पश्चिम विभागाच्या महासंचालक स्मिता वत्स शर्मा हे देखील या कार्यक्रमाला उपस्थिती होती.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भारतीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीसाठी एक प्रमुख व्यासपीठ म्हणून या महोत्सवाच्या वाटचालीबद्दलची मांडणी त्यांनी केली. या महोत्सवातून चित्रपटसृष्टीतील उत्कृष्टता, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि विविधांगी अभिव्यक्तिसोबतच्या संवादाला चालना मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. कदाचित कथांना पत्ता असू शकतो, पण भावनांना कोणतीही सीमा नसते, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या विचारांचा संदर्भही त्यांनी दिला. पंतप्रधानांच्या या विचाराच्या व्याप्तीचा विस्तार करत, ‘स्टोरीज विदाऊट बॉर्डर्स’ ही यंदाची महोत्सवाची संकल्पना आखली असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. भौगोलिक, भाषिक आणि सांस्कृतिक अडथळे पार करण्याची ताकद चित्रपटांमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले. भारतातील विविध भाषा, संस्कृती आणि समुदायांमधील समृद्ध कथाकथन परंपरांचाही संदर्भ त्यांनी मांडला केला. यंदाच्या 57व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय चित्रपट जगतात या महोत्सवाचे स्थान अधिक भक्कम होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

महोत्सवाचे संचालक आशुतोष गोवारीकर यांनी ‘स्टोरीज विदाऊट बॉर्डर्स’ या संकल्पनेचा अर्थ उलगडून सांगितला. भौगोलिक, भाषिक आणि सांस्कृतिक सीमा ओलांडण्याची आणि वैश्विक मानवी भावना व गोष्ट सांगण्याच्या माध्यमातून प्रेक्षकांना एकत्र आणण्याची ताकद चित्रपटांमध्ये असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक धीरज सिंह यांनी महोत्सवाची एकूण संकल्पना आणि दृष्टिकोन स्पष्ट केला. महोत्सवाचा जागतिक स्तरावरचा विस्तार, विविध प्रकारच्या चित्रपटांची मेजवानी आणि काळानुसार विकसित होत असलेली त्याची ओळख यावर त्यांनी प्रकाश टाकला.

57व्या इफ्फीची प्रमुख वैशिष्ट्ये

उद्घाटन चित्रपट

पावेल पावलीकोव्स्की दिग्दर्शित ‘फादरलँड’ या चित्रपटाने महोत्सवाचे उद्घाटन होईल. 1949 मध्ये युद्धोत्तर काळातल्या विभागलेल्या जर्मनीतून प्रवास करणारे नोबेल पुरस्कार विजेते थॉमस मान आणि त्यांची मुलगी एरिका यांची कथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे. त्या काळातील राजकीय आणि वैयक्तिक पातळीवरील संघर्षांचा वेध हा चित्रपट घेतो. 2026 च्या ‘कान चित्रपट महोत्सवात’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला असून, 2026 च्या सिडनी चित्रपट पुरस्कारासाठीही त्याला नामांकन मिळाले आहे.

57व्या इफ्फी 2026 चा मध्य-महोत्सवी चित्रपट म्हणून ‘आय मॅटर’ची निवड

57व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात म्हणजेच इफ्फी 2026 मध्ये अलिना शेरबान दिग्दर्शित ‘आय मॅटर’ हा चित्रपट मध्य-महोत्सवी चित्रपट म्हणून दाखवण्यात येणार आहे. रोमानिया, जर्मनी आणि बेल्जियम या तीन देशांनी संयुक्तपणे निर्मिती केलेला हा 101 मिनिटांचा चित्रपट आहे. यात रोमानियन आणि रोमानी भाषांमधील संवाद आहेत. या चित्रपटामुळे महोत्सवात युरोपीय चित्रपटसृष्टीचा वैविध्यपूर्ण दृष्टिकोन अनुभवता येणार आहे.

‘गाला प्रीमियर’

गाला प्रीमियर विभागात 14 चित्रपटांचे प्रदर्शन होणार आहे. यामध्ये 87 देशांचा सहभाग असेल. निवडक चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांना विविध प्रकारच्या चित्रपट कथा आणि नामांकित चित्रपट निर्मितीचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.

सन्माननीय देश : स्पेन (The Country of Honour)

57व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात स्पेनला सन्माननीय देशाचा दर्जा देण्यात आला आहे. यानिमित्त स्पेनमधील चार चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत. त्यात हाईमे लोरेन्ते दिग्दर्शित ‘द बॅड सन’, ‘त्रिनिदाद’, पेद्रो अल्मोदोवार दिग्दर्शित ‘बिटर ख्रिसमस’ आणि हाईमे माचिया दिग्दर्शित ‘पर्सेगुइएन्दो अ मायकेल’ या चित्रपटांचा समावेश आहे. या चित्रपटांच्या निवडीमधून स्पॅनिश चित्रपटसृष्टीचा गौरव करण्यात येणार असून, या चित्रपटांच्या कथाकथनाचे वैविध्य आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सादर होणार आहे. यामुळे स्पॅनिश चित्रपट निर्माते आणि त्यांचे चित्रपटविषयक दृष्टिकोन इफ्फीच्या माध्यमातून जगभरातल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील.

भागीदार देश : रशिया (Partner Country)

57व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात रशियाला भागीदार देश म्हणून स्थान देण्यात आले आहे. रशियन चित्रपटसृष्टीतले वैविध्य आणि सर्जनशील समृद्धी दर्शवणारे चार चित्रपट विशेष विभागात दाखवले जाणार आहेत. यामध्ये ‘फोर’, ‘न्यू होम’, अनास्तासिया कुजिना दिग्दर्शित ‘बो बो’ आणि ‘सिडनी लुमेट्स बर्थडे’ या चित्रपटांचा समावेश आहे. या विशेष प्रदर्शनामुळे भारतीय आणि आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांना समकालीन रशियन चित्रपट निर्मितीचा परिचय करून घेता येणार आहे. रशियन चित्रपटसृष्टीत होत असलेले बदल समजून घेण्याबरोबरच चित्रपटांच्या माध्यमातून भारत आणि रशिया यांच्यातील सांस्कृतिक व कलात्मक देवाणघेवाण अनुभवण्याची संधीही मिळणार आहे.

इफ्फी 2026 मध्ये दोन नव्या विभागांचा समावेश

चित्रपटांची मेजवानी अधिक व्यापक करण्यासाठी आणि कथाकथनाच्या विविध प्रकारांचा गौरव करण्यासाठी 57व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यंदा दोन नव्या विभागांचा समावेश करण्यात आला आहे. पहिल्या विभागात, म्हणजेच अ‍ॅनिमेशन विभागात, अ‍ॅनिमेशन चित्रपटसृष्टीतील सर्जनशीलता आणि नवनवीन प्रयोग दाखवणारे पाच उत्कृष्ट चित्रपट प्रदर्शित केले जातील. दुसऱ्या विभागाचे नाव ‘फिल्म्स अबाऊट फिल्म्स’ असे आहे. या विभागातही पाच चित्रपट दाखवले जाणार आहेत. नामवंत चित्रपटकर्त्यांनी केलेल्या सूचनांना प्रतिसाद म्हणून हा विभाग सुरू करण्यात आला आहे. चित्रपट निर्मितीची कला आणि तंत्र यांना केंद्रस्थानी आणणे हा या विभागाचा उद्देश आहे.

इफ्फी 2026 मध्ये ब्रिक्स देशांच्या चित्रपटसृष्टीवर विशेष भर

57व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ब्रिक्स देशांच्या चित्रपटसृष्टीवर दिला जाणारा विशेष भर. भारताचा ‘रामायण’ हा या विभागाचा उद्घाटनाचा चित्रपट असेल. ब्रिक्सच्या सर्व 11 सदस्य देशांचे चित्रपट या विभागात दाखवले जाणार असून, भागीदार देशांच्या चित्रपटांचाही त्यात समावेश असेल. यामुळे प्रेक्षकांना ब्रिक्स देशांमधील चित्रपट परंपरा आणि कथाकथनाच्या विविध शैलींचा परिचय करून घेण्याची संधी मिळणार आहे.

इंडियन पॅनोरमा

इंडियन पॅनोरमा विभागात 18 विविध भाषांमधील एकूण 76 चित्रपटांचे प्रदर्शन केले जाणार आहे. हे चित्रपट देशातील वैविध्यपूर्ण कथाकथन परंपरा आणि सर्जनशील उत्कृष्टतेचे प्रतिबिंब आहेत.

निवड प्रक्रियेदरम्यान फीचर फिल्म श्रेणीसाठी 404, तर नॉन-फीचर फिल्म (लघुपट/वृत्तपट इ.) श्रेणीसाठी 358 चित्रपटांचे प्रस्ताव प्राप्त झाले होते. सर्वोत्कृष्ट वेब सीरिज, ओटीटी श्रेणीसाठी 46 पात्र प्रवेशिका मिळाल्या होत्या.

‘धुरंधर’ आणि ‘बिकमिंग’ चित्रपटांनी होणार इफ्फी 2026 इंडियन पॅनोरमाची सुरुवात

57व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील इंडियन पॅनोरमा विभागाची सुरुवात हिंदी फीचर फिल्म ‘धुरंधर’ आणि लडाखी भाषेतील नॉन-फीचर फिल्म ‘बिकमिंग’ या चित्रपटांनी होईल. दोन भिन्न भाषिक आणि सिनेमॅटिक पार्श्वभूमी असलेल्या चित्रपटांची निवड, भारताच्या वैविध्यपूर्ण कथाकथन परंपरांचा उत्सव साजरा करण्याच्या आणि सीमा नसलेल्या चित्रपटसृष्टीला व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या इफ्फी च्या धोरणाचे दर्शन घडवत आहे.

सर्वोत्कृष्ट पदार्पण फीचर फिल्म स्पर्धा

57व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट पदार्पण फीचर फिल्म स्पर्धा आयोजित केली जात आहे. यात विविध देशांतील सात चित्रपटांचा समावेश असून, हे चित्रपट उदयोन्मुख चित्रपट निर्माते आणि जागतिक स्तरावरील नवीन दृष्टिकोनांना प्रोत्साहन देतात. या स्पर्धेत जर्मनीचा ‘फेडिंग मॅन’, भारताचा ‘द स्लेज’, बेल्जियमचा ‘पॅरिस’, इजिप्तचा ‘द ब्लॅक सी’, फ्रान्स आणि इटलीचा ‘लाज द ओर’ ( द गोल्डन एज), भारताचा ‘बर्ड्स ऑन आइस’ आणि चीनचा ‘अटलांटिक’ हे चित्रपट समाविष्ट आहेत. ही स्पर्धा पहिल्यांदाच फीचर फिल्म दिग्दर्शित करणाऱ्या कलाकारांना आपली प्रतिभा दाखवण्यासाठी, व्यापक ओळख मिळवण्यासाठी आणि जागतिक प्रेक्षकांशी जोडले जाण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देते. त्याचबरोबर, नवीन अभिव्यक्तीला प्रोत्साहन देण्याच्या आणि चित्रपट निर्मात्यांच्या पुढच्या पिढीला घडवण्याची इफ्फीची वचनबद्धता अधोरेखित करते.

महिला चित्रपट निर्मात्या, पदार्पण करणारे कलाकार आणि उदयोन्मुख प्रतिभा

नवीन दृष्टिकोन आणि वैविध्यपूर्ण कथाकथनाचा उत्सव साजरा करणारा 57वा इफ्फी, 52 महिला चित्रपट निर्मात्यांना आणि 62 पदार्पण करणाऱ्या चित्रपट निर्मात्यांना एका व्यासपीठावर आणत आहे. हे भारतीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीच्या विस्तारत जाणाऱ्या सर्जनशील क्षेत्राचे प्रतिबिंब आहे. स्पर्धात्मक विभाग 10 महिला चित्रपट निर्मात्या आणि 12 नवोदित चित्रपट निर्मात्यांना अधिक प्रसिद्धी देतील, जे महिलांचा आवाज बुलंद करणे, नवीन प्रतिभेचे संगोपन करणे आणि चित्रपट कथाकारांच्या पुढील पिढीला जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या महोत्सवाच्या वचनबद्धतेवर भर देते.

क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो (सीएमओटी)

‘क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो’ची सहावी आवृत्ती चित्रपट निर्मितीच्या 13 कला प्रकारांमधील 100 निवडक सहभागींना एकत्र आणेल.

या कार्यक्रमात विशेषतः आयोजित मास्टरक्लासेस, कार्यशाळा, संवादात्मक सत्रे, 48-तासांचे चित्रपट निर्मिती आव्हान आणि सीएमओटी टॅलेंट कॅम्प यांचा समावेश असेल. यातील सहभागी, आघाडीचे चित्रपट निर्माते आणि उद्योग व्यावसायिकांशी संवाद साधतील, सर्जनशील संकल्पना सादर करतील आणि माध्यम व मनोरंजन उद्योगातील संधी शोधतील.

वेव्ह्स फिल्म बाजार

वेव्ह्स फिल्म बाजार चित्रपट निर्माते, निर्माते, खरेदीदार, वितरक आणि उद्योग क्षेत्रातील हितधारकांना सहकार्य, सह-निर्मिती आणि व्यावसायिक संधी सुलभ करण्यासाठी एकत्र आणेल.

या बाजारात खरेदीदार आणि निर्मिती संस्थांसह 150 आमंत्रित पाहुण्यांचे स्वागत केले जाईल. त्याच्या प्रमुख उपक्रमांमध्ये स्क्रीनरायटर्स लॅब, को-प्रॉडक्शन मार्केट, व्ह्यूइंग रूम आणि वर्क-इन-प्रोग्रेस लॅब यांचा समावेश असेल.

नेटफ्लिक्स, वेव्ह्स बाजारमधील नॉलेज सिरीज पार्टनर, उद्योग क्षमता-बांधणीला पाठिंबा देईल आणि भारताची व्हीएफएक्स क्षमता मजबूत करण्यासाठी व भविष्यासाठी सज्ज प्रतिभावंतांची फळी तयार करण्यासाठी सरकारसोबतचे आपले सहकार्य प्रदर्शित करेल. त्यांच्या सहभागामध्ये ‘पुष्पक विमान’चा भव्य प्रीमियर, ‘रे गन’चे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि उदयोन्मुख सर्जनशील प्रतिभेला पाठिंबा देण्यासाठी व उद्योगातील संधींना चालना देण्यासाठी पिचिंग सत्रांमध्ये सहभाग यांचाही समावेश असेल.

मास्टरक्लासेस, पॅनेल्स आणि संवादात्मक कार्यक्रम

इफ्फी 2026 अंतर्गत 21 ते 27 नोव्हेंबर 2026 दरम्यान कला अकादमीमध्ये 14 सत्रांचे आयोजन केले जाईल, ज्यामध्ये मास्टरक्लासेस, कार्यशाळा, पॅनेल चर्चा, रेट्रोस्पेक्टिव्ह्ज, इन-कन्व्हर्सेशन आणि मुलाखत सत्रांचा समावेश असेल.

ही सत्रे चित्रपट निर्माते, कलाकार आणि उद्योग व्यावसायिकांना एकत्र आणतील, ज्यात माहितीपट सिनेमा आणि सीमापार चित्रपट निर्मितीपासून ते जागतिक सिनेमाला आकार देणाऱ्या महिला, कथाकथन, कास्टिंग, सबटायटलिंग आणि उदयोन्मुख सिनेमॅटिक पद्धतींपर्यंतच्या विविध विषयांवर चर्चा केली जाईल.

जन्मशताब्दी अभिवादन आणि पुनर्स्थापित चित्रपट

या महोत्सवात जन्मशताब्दीनिमित्त आदरांजली, चित्रपटांचा सिंहावलोकनात्मक आढावा (Retrospectives) आणि पुनर्स्थापित अभिजात चित्रपटांच्या (Restored Classics) माध्यमातून दिग्गज चित्रपट निर्माते आणि कलाकारांच्या कलात्मक योगदानाचा आणि वारशाचा गौरव केला जाईल.

चित्रपट निर्माते आंद्रेज वायडा (Andrzej Wajda) यांना विशेष जन्मशताब्दीनिमित्त आदरांजली म्हणून त्यांचे 5 चित्रपट प्रदर्शित केले जातील. ‘पुनर्स्थापित अभिजात चित्रपट’ या विभागातही 5 चित्रपट दाखवले जातील. त्यामुळे प्रेक्षकांना चित्रपट इतिहासातील महत्त्वपूर्ण कलाकृती पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर अनुभवण्याची संधी मिळेल.

महोत्सवाची ठिकाणे आणि जनसहभाग

57वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव-इफ्फी यंदा गोव्यात मोठ्या उत्साहात रंगणार असून, संपूर्ण गोव्याचे रूपांतर चित्रपटमय वातावरणात होणार आहे. या महोत्सवात 9 दिवसांच्या कालावधीत 4 ठिकाणी असलेल्या 13 बंदिस्त चित्रपटगृहांमध्ये चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत. पणजीतील प्रमुख केंद्र असलेल्या आयनॉक्स (INOX), मॅक्विनेझ (Maquinez), सम्राट आणि अशोका येथील 7 पडद्यांपासून ते पर्वरीतील आयनॉक्स, मडगावमधील प्रसिद्ध रवींद्र भवन आणि फोंडा येथील मॅजिक मूव्हीपर्यंत विविध ठिकाणी चित्रपटांचे प्रदर्शन होईल. विविध ठिकाणी उपलब्ध असलेल्या चित्रपटगृहांमध्ये 4,000 हून अधिक आसनक्षमता असल्याने, ‘इफ्फी’च्या माध्यमातून जागतिक चित्रपटांचा समृद्ध अनुभव गोव्याच्या कानाकोपऱ्यातील प्रेक्षकांना घेता येणार आहे.

जन्मशताब्दी सोहळा

‘इफ्फी 2026’ मध्ये भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज व्यक्तिमत्त्वांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात येणार आहे. यामध्ये ज्येष्ठ चित्रपट निर्माते शक्ती सामंता आणि राज खोसला, अभिनेते उत्तम कुमार, सूर्यकांत मांढरे, प्रेम नझीर आणि राज कुमार, तसेच प्रसिद्ध संगीतकार ओ.पी. नय्यर आणि रवी यांचा समावेश आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांचे अमूल्य योगदान आणि देशाचा चित्रपट तसेच संगीत वारसा समृद्ध करण्यात त्यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाचा या महोत्सवात गौरव करण्यात येणार आहे.

अँथनी चेन यांच्या ‘वी आर ऑल स्ट्रेंजर्स‘ चित्रपटाने होणार 57व्या इफ्फीचा समारोप

अँथनी चेन दिग्दर्शित ‘वी आर ऑल स्ट्रेंजर्स’ हा 57व्या इफ्फीचा समारोप चित्रपट असेल. 157 मिनिटांचा हा चित्रपट सिंगापूरचे प्रतिनिधित्व करणार असून, मंदारिन आणि इंग्रजी या भाषांमध्ये तो सादर केला जाईल. समकालीन सिंगापूरच्या चित्रपटसृष्टीतील एक वेगळी कलाकृती म्हणून या चित्रपटाने महोत्सवाची सांगता होईल.

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) विषयी

1952 मध्ये सुरू झालेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा आशियातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांपैकी एक आहे. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयातर्फे, गोवा सरकार आणि एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा यांच्या सहकार्याने या महोत्सवाचे आयोजन केले जाते. ‘इफ्फी’, जागतिक स्तरावर भारतीय चित्रपट आणि कलागुणांना प्रोत्साहन देण्याबरोबरच जगभरातील उत्कृष्ट चित्रपटांचाही गौरव करतो. गोव्यात दरवर्षी आयोजित होणारा हा महोत्सव सर्जनशील विचारांची देवाणघेवाण, नव्या प्रतिभेचा शोध आणि चित्रपटांच्या माध्यमातून सांस्कृतिक सलोखा वाढवण्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ ठरतो.

राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाविषयी (एनएफडीसी)

राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया-एनएफडीसी) हा माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीतील सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे. 1975 मध्ये स्थापन झालेल्या या महामंडळाची, भारतीय चित्रपटसृष्टीला प्रोत्साहन देणे, स्वतंत्रपणे चित्रपट निर्मिती करणाऱ्यांना पाठबळ देणे आणि आंतरराष्ट्रीय भागीदारांसोबत चित्रपटांच्या सहनिर्मितीला चालना देणे, अशी महत्त्वाची भूमिका आहे. भारतीय चित्रपट निर्मात्यांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी आणि माध्यम तसेच मनोरंजन क्षेत्रात सहकार्याच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘वेव्हज फिल्म बझार’चे (WAVES Film Bazaar) व्यवस्थापनही एनएफडीसी करते.

Trending

Exit mobile version