गोवा खबर

आयएनएस बेतवाचे सामान्य नूतनीकरण आणि नवीन ऊर्जा प्रणालीद्वारे संचालन करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने सुमारे 500 कोटी रुपयांचा करार केला

Published

on

Spread the love

गोवा खबर:भारतीय नौदलाच्या आयएनएस बेतवा या युद्धनौकेचे सामान्य नूतनीकरण  आणि नवीन ऊर्जा प्रणालीद्वारे संचालन करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने कोचीन शिपयार्ड लिमिटेडसोबत 498.58 कोटी रुपयांचा करार केला आहे. 11 नोव्हेंबर 2026 रोजी नवी दिल्ली येथे संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

या कराराअंतर्गत भारतीय नौदलाच्या ब्रह्मपुत्रा श्रेणीतील फ्रिगेट असलेल्या आयएनएस बेतवाच्या प्रणोदन प्रणालीमध्ये मोठे परिवर्तन करण्यात येणार आहे. यामध्ये सध्याच्या वाफेवर आधारित प्रणोदन प्रणालीऐवजी डिझेल इंजिनवर आधारित प्रणोदन प्रणाली बसवण्यात येईल. या दुरुस्तीमध्ये आधुनिक शस्त्रास्त्र प्रणाली बसवून युद्धनौकेच्या लढाऊ क्षमतांचे अद्ययावतीकरणही करण्यात येणार आहे. त्यामुळे या युद्धनौकेची कार्यात्मक परिणामकारकता वाढेल.

या प्रकल्पामुळे जहाज दुरुस्ती आणि देखभाल क्षेत्रातील देशांतर्गत क्षमता अधिक बळकट होईल. विशेषतः प्रणोदन प्रणालीमध्ये गुंतागुंतीचे परिवर्तन करणे आणि नौदलाच्या प्लॅटफॉर्मचे आधुनिकीकरण करणे या क्षेत्रांतील क्षमता वाढेल. या प्रकल्पात 50 हून अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचा (एमएसएमई) सहभाग अपेक्षित असून, भारतीय जहाजबांधणी आणि पूरक उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

या प्रकल्पामुळे सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक इन इंडिया’ या संकल्पनांना मोठी चालना मिळेल. त्याचबरोबर देशाच्या स्वदेशी नौदल जहाज दुरुस्ती आणि देखभाल क्षमतांना अधिक बळकटी मिळेल.

Trending

Exit mobile version