गोवा खबर: स्वच्छ सर्वेक्षणात सलग दुसऱ्या वर्षी पणजी महानगरपालिकेने राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार पटकावला असून, या यशाचे श्रेय पणजीतील नागरिक, सर्व नगरसेवक आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे आहे, असे प्रतिपादन पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात यांनी केले आहे. या वर्षी देशात तिसरा क्रमांक मिळाल्यानंतर पुढील वर्षी पहिला क्रमांक पटकावण्यासाठी महापालिका प्रयत्नशील राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी बोलताना महापौर मोन्सेरात यांनी हा अनुभव अत्यंत आनंददायी असल्याचे सांगितले. पूर्वी स्वच्छ सर्वेक्षणात पणजीचा क्रमांक २५० च्या आसपास होता. मात्र, महापालिकेच्या संपूर्ण टीमने घेतलेल्या मेहनतीमुळे आज पणजीने केवळ राज्यातच नव्हे, तर संपूर्ण देशात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे, असे ते म्हणाले.
स्वच्छता राखताना येणारी आव्हाने: राजधानीचे शहर स्वच्छ ठेवताना येणाऱ्या अडचणींबाबत बोलताना मोन्सेरात यांनी सांगितले की, पणजीची लोकसंख्या मर्यादित असली तरी दररोज सुमारे एक लाख लोक पर्यटन, सरकारी कामे आणि खरेदीसाठी शहरात येतात. पणजीतील स्थानिक नागरिकांना कचरा वर्गीकरण आणि स्वच्छतेच्या नियमांची पूर्ण माहिती आहे, त्यामुळे शहरात शंभर टक्के कचरा वर्गीकरण केले जाते. मात्र, बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना या नियमांची माहिती नसल्याने रस्त्यावर कचरा टाकण्याचे प्रकार घडतात, हे महापालिकेसमोर मोठे आव्हान आहे. तसेच छोटे शहर असूनही दररोज कचऱ्याचे प्रमाण वाढत असल्याने यंत्रणेत सुधारणा करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पुढील वर्षी अव्वल क्रमांकाचे लक्ष्य: इंदूरसारख्या शहरांमध्ये नागरिक स्वतःला महापालिकेचा एक भाग मानतात आणि शहर स्वच्छ ठेवण्यात सक्रिय सहभाग घेतात. त्याच धर्तीवर यंदा पणजीतील नागरिकांचा सहभाग अधिक वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. यंदाच्या स्पर्धेत कुठे कमतरता राहिली याचा अभ्यास करून पुढील वर्षी देशात पहिला क्रमांक मिळवण्यासाठी महापालिका काम करेल, असेही महापौर रोहित मोन्सेरात यांनी सांगितले.