गोवा खबर : गोव्यात होणाऱ्या ५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी २०२६) निमित्ताने गोवा मनोरंजन संस्थेतर्फे (ESG) गोवा सरकारच्या सहकार्याने तालुकास्तरीय आकाशकंदील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे हे तिसरे वर्ष असून गोव्याच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेला प्रोत्साहन देणे, कलाकारांच्या सर्जनशीलतेला वाव देणे आणि पारंपरिक तसेच नावीन्यपूर्ण आकाशकंदिलांचे प्रदर्शन घडविणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
या स्पर्धेत गोव्यातील सर्व रहिवाशांना सहभागी होता येणार आहे. स्पर्धकांनी पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून इफ्फीच्या मोर या शुभंकराच्या संकल्पनेवर आधारित आकाशकंदील तयार करणे आवश्यक आहे. थर्माकोलचा वापर करण्यास परवानगी नाही.
स्पर्धेसाठी संपूर्ण गोव्यातून जास्तीत जास्त ६०० प्रवेशिका स्वीकारण्यात येणार असून प्रत्येक तालुक्यातून कमाल ५० स्पर्धकांना संधी दिली जाणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर प्रवेशिका स्वीकारल्या जातील. विशेष म्हणजे स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला त्यांच्या मेहनतीचे आणि कलात्मकतेचे कौतुक म्हणून ५०० रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठी नोंदणी करण्याची अंतिम मुदत १७ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. स्पर्धकांनी तयार केलेले आकाशकंदील २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० या वेळेत गोवा मनोरंजन संस्थेच्या कार्यालयात जमा करावेत.
आकाशकंदिलांच्या प्रदर्शनासाठी आवश्यक असलेले होल्डर, बल्ब आणि वीजजोडणीची व्यवस्था गोवा मनोरंजन संस्थेतर्फे करण्यात येणार आहे.
या स्पर्धेत प्रत्येक तालुक्यातून तीन विजेत्यांची निवड करण्यात येणार आहे. प्रथम क्रमांकासाठी १० हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ८ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी ५ हजार रुपये अशी रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. परीक्षक मंडळाचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक राहणार आहे.
स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ २७ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार आहे.
या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कलाकारांनी आणि नागरिकांनी नोंदणी तसेच अधिक माहितीसाठी निलाई नाईक यांच्याशी ७३५००१९१४९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन गोवा मनोरंजन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.