गोवा खबर

तुकाराम मुंढे महाराष्ट्रात, गोव्यात आमची टीमही तेवढीच सक्षम : आरोग्यमंत्री विश्वजीत राणे

Published

on

Spread the love

गोवा खबर: महाराष्ट्रातील सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीशी तुलना करण्यापेक्षा गोव्यातील अधिकाऱ्यांच्या कामाचीही दखल घेतली पाहिजे. तुकाराम मुंढे महाराष्ट्रात असतील, मात्र गोव्यातही आमची टीम पूर्णपणे सतर्क आणि सक्रिय असून सातत्याने काम करत आहे, असे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले.

प्रसारमाध्यमांशी बोलताना राणे म्हणाले की, गोव्यात रिचर्ड आणि त्यांची संपूर्ण टीम सातत्याने हॉटेल्स तसेच इतर आस्थापनांची तपासणी करत आहे. विविध ठिकाणी भेटी देऊन नियमांचे पालन केले जाते की नाही, याचा आढावा घेतला जात आहे. अधिकाऱ्यांकडून नियमितपणे तपासणी आणि आवश्यक ती कारवाई सुरू आहे.

एखाद्या आस्थापनात त्रुटी आढळल्यास कायद्याच्या चौकटीत राहून त्या सुधारण्यासाठी संबंधितांना वेळ दिला जातो. त्यानंतरही नियमांचे पालन झाले नाही, तर कायद्यानुसार पुढील कारवाई केली जाते. सर्व प्रक्रिया नियमानुसार पार पाडली जात असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांच्या कामाची चर्चा होते, त्याचप्रमाणे गोव्यातील अधिकाऱ्यांच्या कामालाही प्रसिद्धी मिळाली पाहिजे. गोव्यातील अधिकारी आणि त्यांची टीम सातत्याने काम करत असताना त्यांच्या प्रयत्नांचीही प्रसारमाध्यमांनी दखल घ्यावी, असे राणे म्हणाले.

बाहेरील अधिकाऱ्यांशी तुलना करण्यापेक्षा आपल्या राज्यातील अधिकाऱ्यांचे काम जनतेसमोर आणले पाहिजे. गोव्यातील अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांनाच इथले ‘मुंढे’ बनवा, असेही आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

Trending

Exit mobile version