गोवा खबर : गोव्यात इतर राज्यांतून आयात करण्यात आलेले सुमारे ६ हजार किलो अस्वच्छ चिकन गेल्या दोन महिन्यांत जप्त करण्यात आल्याची माहिती मंत्री विश्वजित राणे यांनी दिली आहे. स्वच्छतेच्या नियमांचे पालन न करता राज्यात चिकनचा पुरवठा होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
गोव्यातील नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी अशा प्रकारच्या पुरवठ्याविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात येणार असून, जप्त करण्यात आलेल्या चिकनचा पुरवठा नेमका कुठून करण्यात आला, याचाही शोध घेतला जाणार आहे. इतर राज्यांतून गोव्यात येणाऱ्या चिकनच्या पुरवठा साखळीची चौकशी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही. गोव्यातील जनतेला स्वच्छ आणि सुरक्षित अन्न उपलब्ध व्हावे, यासाठी आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असे मंत्री विश्वजित राणे यांनी स्पष्ट केले.