गोवा खबर : ‘सरकार तुमच्या दारी’ उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नावेली येथे नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या आणि तक्रारी जाणून घेतल्या. यावेळी नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर तसेच विविध सरकारी खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.
या उपक्रमादरम्यान नागरिकांनी आपल्या विविध समस्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांनी त्यावर वेळेत कार्यवाही करावी, असे निर्देश मुख्यमंत्री सावंत यांनी दिले.
नावेली परिसरातील महत्त्वाच्या विकासकामांना प्राधान्य देऊन ती गतीने पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी संबंधित खात्यांचे क्षेत्रीय अधिकारी आणि अभियंत्यांना दिल्या. विकासकामांच्या अंमलबजावणीत होणारा विलंब टाळून नागरिकांना आवश्यक सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यावर भर देण्यास सांगितले.
तसेच नागरिकांना आवश्यक असलेले रहिवासी दाखले आणि उत्पन्नाचे दाखले देण्याची प्रक्रिया जलद करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. या दाखल्यांसाठी नागरिकांना अनावश्यक प्रतीक्षा करावी लागू नये, याची काळजी घेण्यास संबंधित अधिकाऱ्यांना सांगण्यात आले.
पंच सदस्य आणि सरपंचांकडून मांडण्यात आलेल्या स्थानिक समस्यांवरही वेळेत कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. ग्रामपातळीवरील प्रश्न सोडवण्यासाठी संबंधित सरकारी खात्यांनी आवश्यक ती पावले उचलावीत, असे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला आमदार उल्हास तुयेकर यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. नागरिकांच्या समस्या थेट प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यावर कार्यवाही करण्याच्या उद्देशाने ‘सरकार तुमच्या दारी’ उपक्रम राबविण्यात येत आहे.