गोवा खबर: राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालय आणि दिव्यांगजन सशक्तीकरण संचालनालय, गोवा शासन यांच्या संयुक्त विद्यमाने द हान्स फाउंडेशन (टीएचएफ) यांच्या सहकार्याने आज पर्वरी, गोवा येथील राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालयात कॉक्लिअर इम्प्लांट उपक्रमांतर्गत श्रवण उपकरण वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत उत्तर गोव्यातील दोन मुलांना प्रत्येकी रु. ४,६७,७५०/- किमतीचे N7SE साउंड प्रोसेसर प्रदान करण्यात आले. या दोन उपकरणांची एकूण किंमत रु. ९,३५,५००/- इतकी आहे. या उपकरणांमुळे मुलांना आवाज अधिक स्पष्टपणे ऐकण्यास, त्यांची श्रवणक्षमता व संवाद कौशल्ये सुधारण्यास तसेच शालेय शिक्षण आणि दैनंदिन उपक्रमांमध्ये अधिक सक्रियपणे सहभागी होण्यास मदत होणार आहे.
या उपकरणांचा लाभ मिळालेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे आहेत :
१. आयुष कल्पेश बिचोलकर – रेवोडा, बार्देश, उत्तर गोवा.२. स्वप्निल सुबोध परब – विर्मोडा, पेडणे, उत्तर गोवा.लाभार्थ्यांना यापूर्वी देण्यात आलेली श्रवण उपकरणे योग्य प्रकारे कार्यरत नसल्यामुळे त्यांच्या जागी ही नवीन साउंड प्रोसेसर उपकरणे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. श्रवण सहाय्याची सुविधा अखंडितपणे उपलब्ध असणे किती महत्त्वाचे आहे, हे लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला आहे. त्यामुळे या मुलांना त्यांची श्रवणक्षमता आणि संवाद कौशल्ये विकसित करण्यासाठी आवश्यक असलेली मदत सातत्याने मिळत राहणार आहे.
राज्य दिव्यांगजन आयुक्त श्री. गुरुप्रसाद पावसकर; दिव्यांगजन सशक्तीकरण संचालनालयाच्या संचालक श्रीमती वर्षा नाईक; राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालयाचे सचिव श्री. ताहा हाजिक; आणि दिव्यांगजन सशक्तीकरण संचालनालयाचे उपसंचालक श्री. श्रीकांत पेडणेकर यांच्या हस्ते या उपकरणांचे औपचारिक वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला द हान्स फाउंडेशन (टीएचएफ) चे वरिष्ठ प्रकल्प समन्वयक श्री. बिजेंद्र खत्री हे देखील उपस्थित होते.
यावेळी बोलताना राज्य दिव्यांगजन आयुक्त श्री. गुरुप्रसाद पावसकर म्हणाले, “श्रवणदोष असलेल्या दिव्यांग मुलांना प्रभावीपणे संवाद साधता यावा तसेच शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांमध्ये समानतेने सहभागी होता यावे, यासाठी योग्य सहाय्यक तंत्रज्ञान उपलब्ध असणे अत्यंत आवश्यक आहे. पूर्वीच्या उपकरणांच्या बदल्यात नवीन उपकरणे उपलब्ध करून देणे हे श्रवण सहाय्याची सुविधा सातत्याने सुरू ठेवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे. दिव्यांग व्यक्तींना स्वतंत्र आणि सन्मानपूर्वक जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेली साधने व संधी उपलब्ध करून देणे, हा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे.”
दिव्यांगजन सशक्तीकरण संचालनालयाच्या संचालक श्रीमती वर्षा नाईक यांनी सहाय्यक उपकरणे वेळेवर उपलब्ध करून देण्याचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले, “श्रवणदोष असलेल्या मुलांच्या शिक्षण, संवाद कौशल्ये आणि सर्वांगीण विकासामध्ये योग्य श्रवण सहाय्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. अशा उपक्रमांच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना योग्य सहाय्यक तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या विशिष्ट गरजांची पूर्तता करणे, हे आमचे उद्दिष्ट आहे. दिव्यांग मुलांना शिक्षण घेता यावे आणि दैनंदिन जीवनात आत्मविश्वासाने सहभागी होता यावे, यासाठी आवश्यक सहाय्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.”
या वितरण कार्यक्रमातून दिव्यांग व्यक्तींना सहाय्यक तंत्रज्ञान सहज उपलब्ध करून देणे तसेच त्यांचे कल्याण व सशक्तीकरण सुनिश्चित करण्यासाठी गोवा शासन करत असलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे दर्शन घडते. द हान्स फाउंडेशनसोबतची भागीदारी लाभार्थ्यांच्या वैयक्तिक गरजा पूर्ण करण्याच्या आणि प्रत्येक मुलाला शिकण्याची, संवाद साधण्याची व आपल्या क्षमतेचा पूर्ण विकास करण्याची समान संधी मिळेल असे सर्वसमावेशक वातावरण निर्माण करण्याच्या बांधिलकीला अधिक बळकटी देते.
दिव्यांग व्यक्तींचे हक्क, सन्मान आणि सामाजिक समावेशन यांना प्रोत्साहन देण्यासाठीचे गोवा राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालय आणि दिव्यांगजन सशक्तीकरण संचालनालयाची कटिबद्धथा अशा उपक्रमांच्या माध्यमातून पुन्हा अधोरेखित होते.