गोवा खबर

सांगेत घाणेरड्या राजकारणातून मला चिथावणी देण्याचा विरोधकांचा डाव; समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांचा घणाघात

Published

on

Spread the love

गोवा खबर:सांगे नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात कुजलेले मृत कुत्रे आणून टाकणे, सरकारी अधिकाऱ्यांना धमकावणे आणि कार्यालयांना टाळे ठोकणे हा केवळ आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून मला लक्ष्य करण्याचा आणि चिथावणी देण्याचा प्रकार असल्याचा जोरदार हल्लाबोल समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी केला आहे. अशा गढूळ वातावरणात विनाकारण घाणीत दगड मारून अंगावर घाण उडवून घेण्याची माझी अजिबात इच्छा नसून, विरोधकांच्या या वैफल्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून आपण सांगेच्या विकासावरच लक्ष केंद्रित ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पत्रकारांशी सविस्तर बोलताना मंत्री फळदेसाई म्हणाले की, गेल्या १० ते १५ वर्षांपासून सांगेत विरोधकांकडून हेच घाणेरडे राजकारण सुरू आहे. तालुक्यात पाऊस जास्त पडला तरी सुभाष जबाबदार आणि नाही पडला तरी सुभाषच जबाबदार, अशी परिस्थिती विरोधकांनी निर्माण करून ठेवली आहे. २०० किलोमीटर रस्त्यावर एखादा खड्डा चुकून पडला, तरी थेट पीडब्लूडीच्या कार्यालयात जाऊन टाळे ठोकले जाते, कर्मचाऱ्यांना कोंडले जाते आणि कार्यालयात उशा-ब्लँकेट घेऊन झोपण्याचे प्रकार केले जातात. तरीही सरकारी यंत्रणा किंवा मी स्वतः यामध्ये थेट हस्तक्षेप करत नाही, कारण तसे केले तर माझ्यावर दादागिरी आणि गुंडगिरीचा आरोप केला जातो.

मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयातील घटनेवर तीव्र आक्षेप घेत त्यांनी सांगितले की, कुजलेले मृत कुत्रे पहिल्या मजल्यावरील प्रशासकीय इमारतीत नेऊन अधिकाऱ्यांच्या दालनात फेकून देणे, कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून जाणे, त्यांची जात विचारून व्हिडिओ व्हायरल करणे आणि पुन्हा अशाच प्रकारच्या धमक्या देणे ही सरळसरळ अराजकता आहे. सरकारी कर्मचाऱ्यांवर किंवा व्यवस्थेवर काही आक्षेप असल्यास तक्रार करण्यासाठी पोलीस आणि दक्षता (व्हिजिलन्स) विभाग, उपजिल्हाधिकारी अशी संपूर्ण कायदेशीर यंत्रणा अस्तित्वात आहे. असे असताना स्वतःच्या वैयक्तिक विरोधासाठी सरकारी कार्यालयांना आणि अधिकाऱ्यांना टार्गेट करणे अत्यंत चुकीचे आहे.

विरोधकांच्या मानसिकतेवर ताशेरे ओढताना ते म्हणाले की, हे लोक इतक्या थराला गेले आहेत की पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस उपनिरीक्षकाची (पीएसआय) कॉलर धरण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. हे सगळे केवळ नैराश्यातून आणि वैफल्यातून सुरू असून, मला उत्तेजित करून माझ्याकडून काही प्रतिक्रिया मिळवण्यासाठी ते जाणीवपूर्वक असे निमित्त शोधत आहेत. मात्र, मी पूर्णपणे शांत असून त्यांच्या या सापळ्यात अजिबात अडकणार नाही. घाणीवर काठी मारून काही निष्पन्न होत नाही, पावसाचे पाणी आले की घाण आपोआप वाहून जाते; त्याचप्रमाणे येणाऱ्या निवडणुकीत जनताच अशा प्रवृत्तींना त्यांची खरी जागा दाखवून देईल.

कुत्र्यांच्या विषयावरून विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केले की, मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयात घडलेल्या प्रकारावर कायदेशीर कारवाई करणे ही त्या अधिकाऱ्यांची आणि संबंधित यंत्रणेची जबाबदारी आहे, मंत्र्यांची नाही. शेवटी भुंकणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देऊन वेळ वाया घालवण्याची गरज नाही. विरोधक मला विकासकामांवरून विचलित करण्याचा प्रयत्न करत असले, तरी मी माझ्या उद्दिष्टांवर पूर्ण ठाम आहे आणि सांगेच्या सर्वांगीण विकासासाठी जनतेसोबत राहून काम करत राहणार असल्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी ठामपणे नमूद केले.

Trending

Exit mobile version