खाणकामात स्थानिक कामगार आणि वाहनांना प्राधान्य देणार; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती
गोवा खबर : गोव्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला असून गोमंतकीय चित्रपट निर्मात्यांची प्रलंबित अनुदानाची रक्कम पुढील ८ ते १० दिवसांत वितरित केली जाणार आहे. तसेच राज्यातील बंद असलेले खाणकाम पुन्हा सुरू करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून डिसेंबरपर्यंत आणखी ८ ते ९ खाण ब्लॉक्सचा लिलाव पूर्ण केला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवाच्या (ईएसजी) बैठकीत इफ्फीच्या तयारीचा आणि खर्चाचा आढावा घेण्यात आला. गोमंतकीय चित्रपट निर्मात्यांची प्रलंबित अनुदानाची रक्कम इफ्फीपूर्वी दिली जाईल. तसेच चित्रपट वित्त योजना सर्व संबंधित घटकांना विश्वासात घेऊन नव्याने सुरू करण्यात येणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते गोमंतकीय चित्रपट दिग्दर्शक आदित्य सुहास जांभळे यांचा यंदाच्या इफ्फीमध्ये विशेष सत्कार करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
राज्यातील खाणकामाबाबत माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले की, आतापर्यंत १७ खनिज ब्लॉक्सचा लिलाव झाला असून त्यापैकी ६ ब्लॉक्समध्ये कामकाज सुरू झाले आहे. दक्षिण गोव्यातील कुर्पे खाणीचे कामही लवकरच सुरू होणार आहे. उर्वरित ८ ते ९ खाण ब्लॉक्सचा लिलाव डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.
खाण लिजाधारकांनी आवश्यक कागदपत्रे आणि परवानग्या मिळवण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करावी. या प्रक्रियेत विनाकारण विलंब करणाऱ्या लिजाधारकांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात येतील, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.
राज्यातील खाणकाम पर्यावरणाचे संरक्षण करून शाश्वत पद्धतीनेच सुरू केले जाईल. खाणकामामुळे राज्याच्या महसुलात वाढ होण्याबरोबरच स्थानिक नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि पंचायतींनी खाणकामाला विनाकारण विरोध न करता सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
खाणकामासाठी स्थानिक कामगार आणि स्थानिक वाहनांना प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच खनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकमालकांच्या दरातही सुधारणा केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, गोव्यात लवकरच राष्ट्रीय खाण परिषद आयोजित केली जाणार असून या परिषदेला केंद्रीय खाणमंत्री उपस्थित राहणार असल्याची माहितीही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.