गोवा खबर

गोव्यातील ९ हजार ग्रामीण युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट : मुख्यमंत्री

Published

on

Spread the love

लोकभवन येथे युवा कौशल्य महोत्सवाचे उद्घाटन; युवकांनी कौशल्य विकासावर भर देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

गोवा खबर: गोव्यातील ग्रामीण भागातील युवकांना कौशल्य विकासाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेच्या (DDU-GKY 2.0) माध्यमातून २०२६-२७ या वर्षात राज्यातील ९ हजार ग्रामीण युवकांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

दोनापावला येथील लोकभवनमध्ये गोवा सरकारच्या ग्रामीण विकास विभागातर्फे आयोजित युवा कौशल्य महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी युवकांना मार्गदर्शन केले.

मुख्यमंत्री म्हणाले की, आजच्या काळात रोजगाराच्या संधी मिळवण्यासाठी केवळ पारंपरिक शिक्षणावर अवलंबून राहणे पुरेसे नाही. युवकांनी पारंपरिक करिअरच्या पर्यायांबरोबरच विविध क्षेत्रांतील नवीन संधींचाही विचार करावा. उद्योग क्षेत्राच्या गरजेनुसार आवश्यक कौशल्ये आत्मसात केल्यास युवकांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होऊ शकतात.

ग्रामीण भागातील युवकांना कौशल्य विकास, करिअरच्या विविध संधी आणि रोजगाराबाबत माहिती देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना २.० अंतर्गत युवकांना रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षणाच्या संधींबाबत जागरूक केले जाणार आहे.

राज्यातील ग्रामीण युवकांनी कौशल्य विकासाच्या संधींचा लाभ घेऊन स्वतःच्या करिअरला दिशा द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी केले.

Trending

Exit mobile version