गोवा खबर

आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी सात विमानतळांवर डिजी यात्रा अंतर्गत चाचण्या सुरू

Published

on

Spread the love


2027 मध्ये व्यापक अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने प्रवाशांकडून अभिप्राय घेण्यासाठी चाचण्यांचे आयोजन

गोवा खबर:भारताच्या विमान वाहतूक क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत, डिजी यात्रा उपक्रमांतर्गत देशातील सात विमानतळांवर आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी चाचण्या सुरू करण्यात आल्या आहेत. नोव्हेंबर ते डिसेंबर 2026 या कालावधीत होणाऱ्या या चाचण्यांमध्ये, ई-पासपोर्टधारक पात्र भारतीय नागरिक एअर इंडिया आणि इंडिगो द्वारे संचालित निवडक आंतरराष्ट्रीय विमान प्रवासादरम्यान, विमानतळावरील निर्धारित ठिकाणी डिजी यात्रा सुविधेचा वापर करू शकतील.

या चाचण्या दिल्ली, बेंगळुरू, हैदराबाद, कोचीन, मुंबई, चेन्नई आणि अमृतसर विमानतळांवर घेतल्या जात आहेत. पात्र प्रवासी टर्मिनल प्रवेशद्वार, सुरक्षा तपासणी क्षेत्र आणि बोर्डिंग गेट्स – जिथे आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत – अशा ठिकाणी या सुविधेचा लाभ घेऊ शकतील. या चाचणी कालावधीत मिळणारा प्रवाशांचा अभिप्राय, 2027 मध्ये या सुविधेची अधिक व्यापक स्तरावर अंमलबजावणी करण्यासाठी उपयुक्त ठरेल.

या सुविधेचा वापर करण्यासाठी, पात्र भारतीय नागरिकांना डिजी यात्रा मोबाइल ॲप्लिकेशनद्वारे ई-पासपोर्टवर आधारित पडताळणीयोग्य ओळख पटवणारे दस्तावेज( क्रेडेंशियल) तयार करावे लागतील. या प्रक्रियेत ई-पासपोर्टवरील मशीन रीडेबल झोन  स्कॅन करणे, स्मार्टफोनच्या निअर फील्ड कम्युनिकेशन तंत्रज्ञानाचा वापर करून ई-पासपोर्टमधील चिप वाचणे, स्वतःचा सेल्फी घेणे आणि तपशीलांची पडताळणी करणे यांचा समावेश आहे. एकदा हे क्रेडेंशियल तयार झाले की, ते वापरकर्त्याच्या डिव्हाइसवरील डिजी यात्रा वॉलेटमध्ये साठवले जाते आणि विमानतळावरील चाचणीसाठी सज्ज असलेल्या विविध ठिकाणी वापरता येते.

ही सुविधा सध्याच्या प्रवास प्रक्रियांना पूरक म्हणून दिली जात आहे, ती विद्यमान प्रक्रियांची जागा घेणार नाही. प्रवाशांनी आपले मूळ प्रवास दस्तऐवज सोबत ठेवणे अनिवार्य आहे. तसेच, विमान कंपनीद्वारे आवश्यक असलेली कागदपत्रांची तपासणी, इमिग्रेशन प्रक्रिया आणि इतर सर्व कायदेशीर प्रवास औपचारिकता पूर्ण करणे आवश्यक आहे.

भारताच्या विमान वाहतूक क्षेत्रात डिजी यात्राचा विस्तार सातत्याने होत आहे. या प्लॅटफॉर्मचे 26.5 दशलक्षाहून अधिक वापरकर्ते आहेत आणि आतापर्यंत 39 देशांतर्गत विमानतळांवर 110 दशलक्षाहून अधिक प्रवासांमध्ये याचा वापर झाला आहे. 2027 पर्यंत आणखी 25 देशांतर्गत विमानतळांचा यात समावेश करण्याचे नियोजन आहे.

भारत सरकारच्या डिजिटल इंडिया आणि ईझ ऑफ फ्लाइंग अर्थात सुलभ हवाईप्रवास या संकल्पनेशी सुसंगत राहून, विमानतळ कामकाजात सुधारणा करण्यासाठी आणि हवाई प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत नागरी विमान वाहतूक मंत्रालय कटिबद्ध आहे.

Trending

Exit mobile version