स्वतःच्या गृहजिल्ह्यात कार्यरत किंवा एकाच जिल्ह्यात दीर्घकाळ सेवा बजावणाऱ्या निवडणूक कामाशी संबंधित अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार
गोवा खबर : आगामी २०२७ मधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने गोव्यासह पाच राज्यांना निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे निर्देश दिले आहेत. स्वतःच्या गृहजिल्ह्यात कार्यरत असलेल्या तसेच एकाच जिल्ह्यात दीर्घकाळ सेवा बजावणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यास आयोगाने सांगितले आहे.
निवडणूक आयोगाचे हे निर्देश गोवा, मणिपूर, पंजाब, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या पाच राज्यांना लागू होणार आहेत.
निवडणूक प्रक्रियेत थेट सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांचा या आदेशात समावेश करण्यात आला आहे. यामध्ये जिल्हा प्रशासनातील अधिकारी, पोलीस कर्मचारी तसेच उत्पादन शुल्क आणि वाहतूक विभागातील काही अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
गृहजिल्ह्यात कार्यरत अधिकाऱ्यांच्या बदल्या
निवडणुकीच्या कामकाजाशी थेट संबंध असलेले अधिकारी स्वतःच्या गृहजिल्ह्यात कार्यरत असल्यास त्यांची अन्य जिल्ह्यांत बदली करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
त्याचप्रमाणे एकाच जिल्ह्यात दीर्घकाळ कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात येणार आहेत.
गोव्यातील प्रशासनावरही परिणाम
निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे गोव्यातील निवडणूक कामकाजाशी संबंधित प्रशासकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या तयारीचा भाग म्हणून राज्य प्रशासनाला आयोगाच्या निर्देशांनुसार संबंधित अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांचा आढावा घ्यावा लागणार आहे.
निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पडावी तसेच निवडणूक कामकाजावर स्थानिक प्रभाव पडू नये, या उद्देशाने अशा प्रकारच्या बदल्यांचे निर्देश दिले जातात.