गोवा खबर

काँग्रेसची ‘गाव राखण यात्रा’ म्हणजे स्वतःचे अस्तित्व टिकवण्याचा खटाटोप : दामू नाईक

Published

on

Spread the love

भाजप प्रदेश कार्यकारिणीची उद्या गोव्यात महत्त्वपूर्ण बैठक

गोवा खबर:भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन हे उद्या गोव्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यकारिणीची (स्टेट एक्झिक्युटिव्ह कमिटी) दिवसभर महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि विरोधकांवर सडकून टीका करत काँग्रेसची ‘गाव राखण यात्रा’ म्हणजे केवळ स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी चाललेले नाटक असल्याचे म्हटले आहे.

नितीन नबीन फुंकणार २०२७ च्या निवडणुकीचे रणशिंग

नितीन नबीन यांच्या दोन दिवसीय गोवा दौऱ्यात संघटनात्मक बांधणीवर विशेष भर दिला जाणार आहे. उद्या सकाळी ९:३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालणाऱ्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत राजकीय आणि सामाजिक ठराव मंजूर केले जातील. या बैठकीला सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, निवडणूक प्रभारी डॉ. भारती पवार आणि सहप्रभारी सुनील अँथनी उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्यात नबीन हे आमदार, मंत्री, कोअर कमिटी सदस्य आणि युवा कार्यकर्त्यांशी संवाद साधून आगामी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांना कानमंत्र देतील. राज्यात भाजपचे साडेचार लाख प्राथमिक सदस्य आणि १,७३१ बूथवर शक्ती केंद्रे कार्यरत असून, केंद्र व राज्य सरकारची विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवली जातील, असे नाईक यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसचे नेते वैफल्यग्रस्त; मल्लिकार्जुन खर्गे यांचा निषेध


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केलेल्या टीकेचा दामू नाईक यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. “संपूर्ण देशात आणि गोव्यात काँग्रेसला जनतेचे पाठबळ उरलेले नाही, त्यामुळे काँग्रेसचे नेते वैफल्यग्रस्त झाले आहेत. दिवसातील १८ ते २० तास काम करणाऱ्या पंतप्रधान मोदींना सत्तेवरून खाली खेचणे शक्य नसल्यानेच सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांसारखे नेते २०१४ पासून सातत्याने खालच्या पातळीची भाषा वापरत आहेत. मात्र, त्यांनी जेवढी टीका केली, तेवढा भाजपला अधिक फायदाच झाला आहे. भाजपचे कार्यकर्ते हा अपमान कधीही सहन करणार नाहीत आणि योग्य वेळी जशास तसे उत्तर देतील,” असा इशारा नाईक यांनी दिला.

‘गाव राखण यात्रा’ नव्हे, ही तर ‘गाव विकण्याची यात्रा’


काँग्रेसच्या नियोजित ‘गाव राखण यात्रे’ची खिल्ली उडवताना दामू नाईक म्हणाले की, काँग्रेसने १९९८, २००७, २००९ आणि २०११ च्या काळात गोव्यातील जमिनी कोणाकोणाला विकल्या, याचे सर्व पुरावे आणि कच्चा चिट्ठा भाजपजवळ आहे. योग्य वेळी या भाटकरांची आणि जागा विकणाऱ्यांची नावे पुराव्यासह जनतेसमोर उघड केली जातील. काँग्रेसची ही यात्रा गाव राखण्यासाठी नसून, गावात अजून कोणत्या जागा शिल्लक आहेत हे पाहण्यासाठी आणि त्या विकण्यासाठी काढलेली यात्रा आहे, असा घणाघात त्यांनी केला.

आमदार विरेश बोरकर यांच्या आरोपांना प्रत्युत्तर


आपल्या पक्षात फूट पाडण्यामागे भाजपचा हात असल्याच्या आमदार विरेश बोरकर यांच्या आरोपाचा समाचार घेताना नाईक म्हणाले, “विरोधकांना स्वतःचे अपयश लपवण्यासाठी आणि रडण्यासाठी फक्त भाजपचेच नाव पुढे करावे लागते. घरात काहीही घडले तरी भाजपला दोष देण्याची त्यांची सवय बनली आहे.”

पक्षात येणाऱ्यांना तिकिटाची हमी नाही; युतीबाबत आताच बोलणे घाईचे


माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आणि उत्पल पर्रीकर यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर बोलताना नाईक यांनी स्पष्ट केले की, पंतप्रधान मोदींच्या अंत्योदय तत्त्वावर आणि पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवून कोणतीही अट न घालता पक्षात काम करू इच्छिणाऱ्यांसाठी भाजपची दारे नेहमीच उघडी आहेत. मात्र, केवळ तिकिटाच्या आशेने किंवा वैयक्तिक स्वार्थासाठी कोणी येत असेल, तर त्यांनी येऊ नये. पक्षात जुन्या-जाणत्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांचा सन्मान राखूनच आणि निवडून येण्याची क्षमता पाहूनच उमेदवारीबाबत निर्णय घेतला जाईल. तसेच, युतीबाबतच्या चर्चा आताच करणे अपरिपक्व ठरेल; भाजप सध्या राज्यातील सर्व ४० मतदारसंघांमध्ये आपली संघटना मजबूत करण्यावर भर देत आहे, असेही दामू नाईक यांनी शेवटी स्पष्ट केले.

Trending

Exit mobile version