गोवा खबर: गोवा मराठी पत्रकार संघाच्या २०२६-२८ या दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी नवीन कार्यकारिणीची बिनविरोध निवड झाली आहे. अध्यक्षांसह उपाध्यक्ष आणि कार्यकारिणीच्या सर्व पदांवरील उमेदवार बिनविरोध निवडून आले असून, ज्येष्ठ पत्रकार सुरेश स. नाईक हे संघाचे नवे अध्यक्ष असतील.
निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणारे सुरेश काणकोणकर यांनी आज उमेदवारी अर्जांची छाननी आणि अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर निवडणुकीचा निकाल जाहीर केला. कार्यकारिणी सदस्यपदासाठी अर्ज दाखल केलेले गुरुदास सावळ यांनी आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे एकूण बारापैकी अकरा जागांवरील निवड बिनविरोध झाली.
नवीन कार्यकारिणीत सुरेश स. नाईक अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळतील, तर गंगाराम म्हांबरे आणि विठ्ठल गावडे पारवडकर यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. सुभाष कृ. नाईक हे सचिवपदी कायम राहणार असून, नितीन कोरगावकर यांची सं. सचिवपदी निवड झाली आहे.
कार्यकारिणी सदस्य म्हणून अरविंद धुरी, निलेश नाईक, दत्ता शिरोडकर, अनुया शिरोडकर, अनुराधा मोघे आणि वामन प्रभू यांची निवड झाली आहे.
गोवा मराठी पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा येत्या ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता पणजी येथील गुज हॉलमध्ये होणार आहे. याच सभेत नवनिर्वाचित कार्यकारिणीकडे संघाचा कार्यभार सोपविण्यात येणार आहे.