गोवा खबर

मराठीप्रेमी मतदार भाजप सरकारला कायमचे घरी पाठवतील : सुभाष वेलिंगकर यांचा इशारा

Published

on

Spread the love

फातर्पा येथे मराठी राजभाषा निर्धार समितीचा धडक कृती मेळावा; १५ संस्थांचा मराठी राजभाषेच्या मागणीला लेखी पाठिंबा

गोवा खबर : मराठीप्रेमी मतदारांच्या पाठिंब्यावर निवडून येऊन सत्ता उपभोगणाऱ्या भाजप सरकारने २०१७ प्रमाणेच २०२७ च्या विधानसभा निवडणुकीतही मराठीप्रेमी मतदारांशी बेईमानी केली, तर हेच मतदार भाजप सरकारला कायमचे घरी पाठवतील, असा इशारा मराठी राजभाषा निर्धार समितीचे निमंत्रक प्राचार्य सुभाष भास्कर वेलिंगकर यांनी दिला.

मराठी राजभाषा निर्धार समितीच्या कुंकळ्ळी प्रखंडातर्फे फातर्पा येथील श्री शांतादुर्गा फातर्पेकरीण संस्थानच्या भूमिपुरुष सभागृहात रविवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘धडक कृती मेळाव्यात’ ते बोलत होते.

गोव्यात मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळावा, या मागणीसाठी समितीने सुरू केलेल्या आंदोलनाला विविध संस्थांकडून पाठिंबा मिळत आहे. या मेळाव्यात १५ वेगवेगळ्या संस्थांच्या प्रतिनिधींनी मराठीला राजभाषेचा दर्जा देण्याच्या मागणीला पाठिंबा दर्शविणारे लेखी ठराव वेलिंगकर यांच्याकडे सुपूर्द केले.

तसेच बाळ्ळी-अडणे ग्रामपंचायतीने मराठी राजभाषेच्या मागणीला पाठिंबा देणारा मंजूर केलेला ठरावही यावेळी समितीकडे सुपूर्द करण्यात आला.

यावेळी वेलिंगकर यांनी मराठी भाषेचा इतिहास, गोव्यातील मराठी भाषेचे स्थान आणि मराठीला राजभाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच आंदोलनाच्या पुढील टप्प्यात कोणत्या कृती हाती घेतल्या जाणार आहेत, याची दिशाही त्यांनी स्पष्ट केली.

मराठीप्रेमी मतदारांच्या भावनांकडे सरकारने दुर्लक्ष करू नये. मराठीला राजभाषेचा दर्जा देण्याच्या मागणीबाबत सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी भूमिका या मेळाव्यातून मांडण्यात आली.

कार्यक्रमात रेणुका वा. फळदेसाई यांनी उपस्थितांना प्रतिज्ञा दिली. कुंकळ्ळी प्रखंडाचे अध्यक्ष पुतू म. नाईक देसाई यांनी आभार मानले.

सामूहिक पसायदानाने या धडक कृती मेळाव्याची सांगता झाली.

Trending

Exit mobile version