गोवा खबर

इंडिया आघाडीची १ नोव्हेंबरची सभा पुढे ढकला; १० हजार कोटींच्या व्यवसायावर परिणाम होण्याची व्यापाऱ्यांना भीती

Published

on

Spread the love

गोवा खबर :दिवाळीच्या खरेदीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीची १ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर होणारी सभा पुढे ढकलण्याची मागणी चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्री (CTI) या व्यापारी संघटनेने केली आहे. या सभेमुळे सुमारे १० हजार कोटी रुपयांच्या व्यवसायावर परिणाम होण्याची भीती संघटनेने व्यक्त केली आहे.

सीटीआयचे अध्यक्ष ब्रिजेश गोयल यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पत्र लिहून ही सभा १० नोव्हेंबरनंतर आयोजित करण्याची विनंती केली आहे.

यंदा ६ नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी, ८ नोव्हेंबर रोजी दिवाळी आणि १० नोव्हेंबर रोजी भाऊबीज साजरी होणार आहे. या सणांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री होते.

गोयल यांच्या माहितीनुसार, धनत्रयोदशीच्या काळात दिल्लीत सोने-चांदी, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे, भांडी, सुकामेवा, मिठाई, वाहने, मालमत्ता आणि भेटवस्तू अशा विविध क्षेत्रांत सुमारे २५ हजार कोटी रुपयांचा व्यवसाय होतो.

सणांच्या आठवडाभर आधीपासून बाजारपेठांमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी असते. अशा वेळी रामलीला मैदानावर मोठी राजकीय सभा झाल्यास वाहतुकीवर निर्बंध येण्याची आणि ग्राहकांना बाजारपेठांपर्यंत पोहोचण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

ऑक्टोबरमध्ये तीन हजार कोटींचे नुकसान झाल्याचा दावा

सीटीआयच्या दाव्यानुसार, ऑक्टोबर महिन्यात कॅनॉट प्लेस, इंडिया गेट आणि मध्य दिल्लीतील विविध भागांत झालेल्या सभा, मोर्चे आणि रस्ते बंदमुळे व्यापाऱ्यांचे सुमारे तीन हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

या घटनांमुळे घाऊक बाजारपेठांमध्ये मालाची वाहतूक प्रभावित झाली. तसेच किरकोळ दुकानांमध्ये ग्राहकांची संख्याही घटल्याचे संघटनेने म्हटले आहे.

रामलीला मैदानाच्या परिसरात २० प्रमुख बाजारपेठा

रामलीला मैदानापासून पाच किलोमीटरच्या परिसरात सुमारे २० प्रमुख घाऊक आणि किरकोळ बाजारपेठा आहेत. यामध्ये चांदणी चौक, सदर बाजार, चावडी बाजार, भागीरथ पॅलेस, खारी बावली, काश्मिरी गेट, नई सडक, मोरी गेट, किनारी बाजार, दरिबा, दरियागंज, अजमेरी गेट, जामा मशीद, करोल बाग आणि आझाद मार्केट यांचा समावेश आहे.

या बाजारपेठांमधून देशाच्या विविध भागांत मालाचा पुरवठा केला जातो. सभेमुळे वाहतूक वळवणे, बॅरिकेडिंग आणि सार्वजनिक वाहतुकीवरील संभाव्य निर्बंध यांचा व्यवसायावर परिणाम होऊ शकतो, असे संघटनेने स्पष्ट केले आहे.

जुनी दिल्ली आणि नवी दिल्ली रेल्वे स्थानकांमार्गे इतर राज्यांतून खरेदीसाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांना आणि ग्राहकांनाही अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

त्यामुळे व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आणि दिवाळीच्या खरेदीवर परिणाम होऊ नये यासाठी इंडिया आघाडीची १ नोव्हेंबरची सभा १० नोव्हेंबरनंतर घेण्यात यावी, अशी मागणी सीटीआयने राहुल गांधी यांच्याकडे केली आहे.

Trending

Exit mobile version