उत्पल पर्रीकर यांच्या भाजप प्रवेशाचे स्वागत; पक्षात परतणाऱ्यांमुळे भाजप आणखी मजबूत होणार
गोवा खबर: आपण कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवायची, हे मला कोणीही सांगू शकत नाही. आगामी विधानसभा निवडणूक आपण पणजी मतदारसंघातूनच लढवणार असल्याचे मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी स्पष्ट केले आहे.
पणजी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याबाबत सुरू असलेल्या राजकीय चर्चांच्या पार्श्वभूमीवर मोन्सेरात यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली. आपण कुठून निवडणूक लढवायची, याचा निर्णय स्वतः घेणार असून पणजीतूनच निवडणूक लढवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांच्या संभाव्य भाजप पुनर्प्रवेशाबाबतही मोन्सेरात यांनी प्रतिक्रिया दिली.
यापूर्वी भाजप सोडून गेलेल्या नेत्यांना पुन्हा पक्षात यायचे असेल, तर त्यांचे स्वागतच आहे. अशा नेत्यांच्या पुनर्प्रवेशामुळे भाजपची ताकद आणखी वाढेल, असे मोन्सेरात यांनी सांगितले.
तसेच पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांनाही आता पक्षाशिवाय आपले काहीच अस्तित्व नाही, याची जाणीव झाली असल्याची टिप्पणी त्यांनी केली.
उत्पल पर्रीकर यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर बाबूश मोन्सेरात यांनी पणजी विधानसभा मतदारसंघावरील आपला दावा कायम ठेवला असून, कोणत्याही परिस्थितीत पणजीतूनच निवडणूक लढवण्याची भूमिका स्पष्ट केली आहे.