या परिषदेतून रसायने क्षेत्राच्या दीर्घकालीन विकासात योगदान देतील अशा भागीदाऱ्या स्थापित होतील असा विश्वास इंडिया केम 2026 ला पाठवलेल्या संदेशातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला व्यक्त
भारतीय रसायन उद्योग 2030 पर्यंत 300 अब्ज अमेरिकी डॉलर आणि 2040 पर्यंत 1 ट्रिलियन अमेरिकी डॉलरवर पोहोचण्याचा अंदाज
गोवा खबर:केंद्रीय रसायने आणि खते तसेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांच्या हस्ते आज मुंबईत इंडिया केम 2026 या परिषदेच्या 14व्या पर्वाचे उद्घाटन झाले.
यावेळी जे. पी. नड्डा यांनी या सोहळ्याला उपस्थित उद्योगपती तसेच धोरणकर्त्यांना संबोधित केले. देशात सरकारकडून रसायन क्षेत्रासाठी अत्यंत अनुकूल वातावरण उपलब्ध करून दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. रसायन क्षेत्रासाठीची भव्य (BHAVYA) रसायन योजना, परिस्थितीत आमूलाग्र बदल घडवून आणणारी ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जागतिक स्तरावर स्पर्धात्मक रासायनिक उत्पादन केंद्रे विकसित करण्यासाठी, बंदरे, रेल्वे, विमानतळ आणि रस्त्यांच्या माध्यमातून दळणवळणीय जोडणी तसेच एकात्मिक मूल्य साखळी या मुख्य घटकांचा भव्य रसायन योजनेअंतर्गत अंतर्भाव केला असल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्ट केले.
2047 पर्यंत विकसित भारतचे ध्येय साध्य करण्यासाठी हे क्षेत्र अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास जे. पी. नड्डा यांनी व्यक्त केला. देशांतर्गत उद्योग आणि बहुराष्ट्रीय कंपन्या या दोन्हीसाठी ही एक मोठी संधी आहे, या परिषदेच्या निमित्ताने आज मोठ्या संख्येने या कंपन्या उपस्थित राहिल्या आहेत ही बाब त्यांनी नमूद केली. विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी प्रगत आणि जागतिक दर्जाचे रसायन आणि पेट्रोकेमिकल उद्योग क्षेत्र आवश्यक आहे, ही बाबही त्यांनी अधोरेखित केली.
यावेळी जे. पी. नड्डा यांनी इंडिया केम 2026साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठवलेला संदेश वाचून दाखवला.
देशात व्यापार सुलभतेची विस्तारलेली व्याप्ती तसेच भारताच्या मुक्त व्यापार करारांचे विस्तारलेले जाळे यामुळे गुंतवणुक आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये पाऊल टाकण्याचे नवे मार्ग खुले होत असल्याचे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. भारतीय रसायन उत्पादक जागतिक पुरवठा साखळीत आपले स्थान भक्कम करण्यासाठी या संधींचा पूर्ण लाभ घेतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
इंडिया केम 2026 च्या आयोजनातून अर्थपूर्ण चर्चांना चालना मिळणार आहे, त्यासोबतच या क्षेत्राच्या दीर्घकालीन विकासात योगदान देऊ शकतील अशा भागीदारी स्थापित होणार असल्याचा विश्वासही पंतप्रधानांनी आपल्या संदेशातून व्यक्त केला.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव आणि ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांनीही या सोहळ्याला संबोधित केले. आपापल्या राज्यांमधील रसायने आणि पेट्रोकेमिकल्स क्षेत्रातील गुंतवणुकीच्या संधींचा उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की रसायन उद्योगामुळे सुमारे तीन लाख लोकांना रोजगार उपलब्ध होत असल्यामुळे हा उद्योग महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्र राज्य भविष्यवेधी तसेच व्यापार करण्यातील सुलभतेवर आधारित गुंतवणूकस्नेही धोरण तयार करत आहे.
मध्य प्रदेश आणि ओदिशा या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या राज्यातील व्यापार स्नेही गुंतवणूक धोरणे तसेच रसायन उद्योगासाठी उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या पायाभूत सुविधा यांचा लाभ घेण्याचे आमंत्रण उद्योगांना दिले.
याप्रसंगी, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण तसेच रसायने आणि खते विभागाच्या राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी सांगितले की, मुलभूत गरजा पूर्ण करण्यात तसेच जीवनमानाचा दर्जा सुधारण्यात रसायने आणि पेट्रोकेमिकल्स उद्योगाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे.
सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या प्रोत्साहन योजना तसेच संधींचा वापर करून घेण्याचे आवाहन अनुप्रिया पटेल यांनी उद्योग क्षेत्रातील नेत्यांना केले. केंद्रीय राज्यमंत्री म्हणाल्या की, सरकारने तीन नव्या समर्पित केमिकल पार्क्सच्या उभारणीसाठी भारत औद्योगिक विकास योजना (बीएचएव्हीवायए- भव्य) रसायन योजना सुरु केली आहे. सदर योजना प्रत्यक्षात अमलात आणण्यात आणि ती राबवण्यात राज्य सरकारे अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावणार असल्यामुळे उद्योग क्षेत्रातील प्रमुख व्यक्ती आणि संबंधित राज्य सरकारे यांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
केंद्रीय रसायने आणि पेट्रोकेमिकल्स विभाग सचिव तेजवीर सिंग यांनी उद्घाटन समारंभात कार्यक्रमाच्या आवाक्याची तपशीलवार माहिती दिली. ते म्हणाले की हा कार्यक्रम भारताच्या रसायने आणि पेट्रोकेमिकल्स क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीने केंद्रित गट-चर्चांच्या माध्यमातून विविध उप-क्षेत्रांच्या पुढील वाटचालीबाबत विचारमंथन करण्यासाठीचा मंच उपलब्ध करून देईल.
पुढील 2 दिवसांत होणाऱ्या चर्चा तसेच संवादांद्वारे व्यापार-ते-व्यापार चर्चांसाठी संरचित व्यासपीठ उपलब्ध होईल अशी आशा सचिव तेजवीर सिंग यांनी व्यक्त केली.
या प्रसंगी, भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ (फिक्की) आणि अर्नेस्ट अँड यंग ही संस्था यांनी संयुक्तपणे तयार केलेल्या एका ज्ञान-विषयक दस्तावेजाचे अनावरण इंडिया केम 2026 च्या उद्घाटनपर सत्रादरम्यान करण्यात आले.
नेस्को येथील बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये भरवण्यात आलेल्या इंटरनॅशनल इंडिया केम 2026 या प्रदर्शनाचे उद्घाटन देखील केंद्रीय मंत्री नड्डा यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनात रसायने, पेट्रोकेमिकल्स आणि प्रक्रिया कारखान्यांची यंत्रसामग्री तसेच उपकरणे यांच्याशी संबंधित विविध उत्पादने, तंत्रज्ञाने, उपकरणे आणि सेवांची विस्तृत श्रेणी प्रदर्शित करण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्री नड्डा यांनी विविध मान्यवरांसह इंटरनॅशनल इंडिया केम 2026 प्रदर्शनातील स्टॉल्सना देखील भेट दिली आणि उद्योग क्षेत्रातील प्रमुख नेत्यांशी संवाद साधला.
रसायन आणि खते मंत्रालयाच्या रसायने आणि पेट्रोकेमिकल्स विभागातर्फे , फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री फिक्की बरोबर भागीदारीत आयोजित केला जाणारा हा तीन दिवसीय कार्यक्रम, एक आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि परिषद आहे. यानिमित्ताने रसायन आणि पेट्रोकेमिकल्स क्षेत्रातील प्रमुख भागधारक, जसे की उद्योग क्षेत्रातील दिग्गज, धोरणकर्ते, गुंतवणूकदार, संशोधक आणि आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी एकत्र येतात.
ॲडव्हांटेज भारत: एक उदयोन्मुख जागतिक रसायन केंद्र या संकल्पनेवर आधारित इंडिया केम 2026 हा कार्यक्रम, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय भागधारकांसाठी ज्ञान व माहितीची देवाणघेवाण, धोरणात्मक भागीदारी, गुंतवणुकीच्या संधी शोधणे आणि परस्पर हिताच्या व्यावसायिक संधी ओळखण्यासाठी एक सामायिक व्यासपीठ उपलब्ध करून देतो.
भारतासोबत आर्थिक सहकार्य अधिक दृढ करत जपान इंडिया केम 2026 मध्ये भागीदार देश म्हणून सहभागी झाला आहे, ज्यामुळे रसायन आणि पेट्रोकेमिकल्स क्षेत्रात सहकार्याच्या नवीन संधी खुल्या झाल्या आहेत.
महाराष्ट्र, गुजरात, ओडिशा, मध्य प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेश ही भागीदार राज्ये म्हणून सहभागी झाली आहेत. हे या क्षेत्रातील विकास, गुंतवणूक आणि औद्योगिक प्रगतीला चालना देण्यात भारतीय राज्यांची वाढती भूमिका दर्शवते.
या 14 व्या आवृत्तीचे एक महत्त्वाचे नवीन वैशिष्ट्य म्हणजे इंडिया केम युथ इनोव्हेशन चॅलेंज. हा उपक्रम तरुण नवोन्मेषक, विद्यार्थी आणि उदयोन्मुख उद्योजकांना रसायन आणि पेट्रोकेमिकल्स क्षेत्राच्या बदलत्या गरजांशी जोडण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आला आहे. याद्वारे उद्योगासमोरील आव्हानांवर नाविन्यपूर्ण, संशोधनावर आधारित आणि व्यावहारिक उपाय शोधण्यास प्रोत्साहन दिले जाते.
भारतीय रसायन उद्योगाची बाजारपेठ 2030 पर्यंत 300 अब्ज अमेरिकन डॉलर्स आणि 2040 पर्यंत 1 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. या क्षेत्राच्या वाढीस देशांतर्गत मागणीत होणारी वाढ, निर्यातीच्या विस्तारणाऱ्या संधी, भारताचा लोकसंख्याशास्त्रीय लाभांश, दरडोई उपभोग कमी असणे आणि सरकारद्वारे राबवले जाणारे पोषक उपक्रम यांचा आधार मिळत आहे.
या कार्यक्रमात जपान, अमेरिका, कॅनडा, युनायटेड किंगडम, युरोपियन युनियनमधील देश, लॅटिन अमेरिका, कोरिया प्रजासत्ताक आणि आसियान राष्ट्रांसह अनेक देशांचे प्रतिनिधी सहभागी होत आहेत.
या कार्यक्रमात 200 हून अधिक भारतीय आणि आंतरराष्ट्रीय प्रदर्शक, भारत व परदेशातील 8,000 हून अधिक व्यावसायिक अभ्यागत आणि 50 प्रमुख भारतीय व आंतरराष्ट्रीय मुख्य कार्यकारी अधिकारी सहभागी होत आहेत. इंडिया केम 2026 हे जागतिक कौशल्य आणि भारताची उत्पादन क्षमता, गुंतवणुकीची क्षमता व शाश्वत औद्योगिक विकासाप्रती असलेली वचनबद्धता यांना जोडून, ॲडव्हांटेज भारत: एक उदयोन्मुख जागतिक रसायन केंद्र या संकल्पनेला पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल अशी अपेक्षा आहे.