गोवा खबर

मी मगो पक्षावर खुश, भाजप प्रवेशाच्या केवळ अफवाच: आमदार जीत आरोलकर

Published

on

Spread the love

गोवा खबर:मी आजही महाराष्ट्रवादी गोमंतक (मगो) पक्षातच आहे आणि पक्षाच्या कामावर पूर्णपणे समाधानी आहे. प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियावर माझ्या भाजप प्रवेशाबाबत ज्या चर्चा सुरू आहेत, त्या केवळ अफवा आहेत, असे स्पष्टीकरण मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी दिले आहे.

एका कार्यक्रमाच्या निमित्ताने पत्रकारांशी संवाद साधताना आमदार आरोलकर यांनी राजकीय चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.

टीकांकडे दुर्लक्ष, मांद्रेच्या विकासावर भर

विरोधकांच्या किंवा इतर नेत्यांच्या विधानांवर प्रतिक्रिया देताना आरोलकर म्हणाले की, “प्रत्येकाचे स्वतःचे मत आणि विचार असतात. त्यावर मी भाष्य करणे किंवा प्रतिक्रिया देणे योग्य नाही. माझे संपूर्ण लक्ष मांद्रे मतदारसंघात काम करण्यावर आहे. मतदारसंघात किती विकासकामे झाली आहेत हे येथील जनतेला चांगलेच ठाऊक आहे आणि पुढे काय करायचे याचा निर्णयही मांद्रेच्या जनतेने आधीच घेतला आहे.”

जागावाटपाचा निर्णय वरिष्ठ नेतेच घेतील

भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याच्या चर्चेवर बोलताना ते म्हणाले की, सध्या मगो आणि भाजप यांची युती आहे आणि आम्ही एकत्रच पुढे जाणार आहोत. आगामी निवडणुकीत मगो पक्षाला किती आणि कोणत्या जागा मिळणार, हे अद्याप निश्चित झालेले नाही. योग्य वेळ आल्यावर दोन्ही पक्षांचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते आणि मुख्यमंत्री एकत्र बसून जागावाटपाचा निर्णय घेतील. मी मगोचा आमदार असताना दुसऱ्या पक्षाचे तिकीट घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. विधानसभेतील काम आणि मुख्यमंत्र्यांकडे सातत्याने केलेला पाठपुरावा यामुळे केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने मांद्रेचा विकास होत असल्याचे पाहूनच मंत्र्यांनी माझ्या कामाचे कौतुक केले असावे, असेही त्यांनी नमूद केले.

पेडणे तालुक्यात मगोचे अस्तित्व टिकवणे गरजेचे

मगोचे नेते सुदिन ढवळीकर यांनी केलेल्या विधानावर बोलताना आरोलकर यांनी सांगितले की, ढवळीकर हे पेडणे तालुक्याबद्दल बोलले आहेत. पेडणे तालुक्यात पूर्वी मगोचा आमदार होता आणि आजही तिथे पक्षाचे अस्तित्व आहे, ते टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने त्यांनी केलेले विधान योग्यच आहे.

२० वर्षांत न झालेला विकास ५ वर्षांत करून दाखवला; आमदार प्रवीण आर्लेकर यांचा दावा

याच वेळी पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनीही पत्रकारांशी संवाद साधला. ‘सरकार तुमच्या दारी’ या उपक्रमाचे महत्त्व सांगताना ते म्हणाले की, यापूर्वी मंत्री सुभाष शिरोडकर यांनी येथे येऊन लोकांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या आणि त्या सोडवण्यासाठी निधीही दिला होता. आता स्वतः डायनॅमिक मुख्यमंत्री पेडण्यात येत असून जनतेच्या उर्वरीत समस्या लवकरात लवकर सोडवण्यावर आमचा भर आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांची संख्या वाढत असल्याबद्दल विचारले असता आर्लेकर म्हणाले, “निवडणुकीच्या काळात अनेकजण येतात, त्यांनी आपले काम दाखवावे. पक्ष सर्वेक्षण करून आणि कामाचे मूल्यमापन करूनच तिकिटाचा निर्णय घेतो. प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, सदानंद तानावडे आणि मुख्यमंत्री याबाबत योग्य तो निर्णय घेतील.”

जीत आरोलकरांना दिले यशाचे श्रेय

आमदार जीत आरोलकर यांच्याबद्दल बोलताना आर्लेकर यांनी कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, “जेव्हा मी पेडण्यात आलो, तेव्हा जीत आरोलकर यांनी मला खूप मोठा पाठिंबा दिला. त्यांच्या पाठिंब्यामुळेच मी आज पेडण्याचा आमदार होऊ शकलो, याचे पूर्ण श्रेय मी त्यांना देतो. आमचे विचार एकमेकांबद्दल नेहमीच सकारात्मक आहेत.”

तसेच माजी आमदार बाबू आजगावकर यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना आर्लेकर म्हणाले की, ज्यांना २० वर्षे संधी मिळाली त्यांनी तेव्हा विकास का केला नाही, असा प्रश्न लोकांनी त्यांना विचारावा. मुख्यमंत्र्यांच्या पाठिंब्यामुळे गेल्या २० वर्षांत जी कामे झाली नाहीत, ती आम्ही अवघ्या ५ वर्षांत करून दाखवली आहेत.

Trending

Exit mobile version