भारतीय रेल्वेच्या महिला क्रीडापटूंनी सुवर्णपदक जिंकून तिरंगा ध्वजाचा सन्मान वाढवल्याबद्दल केंद्रीय मंत्र्यांनी केले अभिनंदन
रेल्वे क्रीडा प्रोत्साहन मंडळाच्या माध्यमातून भारतीय रेल्वेचे क्रीडा प्रतिभेला प्रोत्साहन
गोवा खबर:केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीती रेल्वे भवन इथे भारतीय महिला कबड्डी संघाच्या सदस्यांची भेट घेतली. जपानमधील आईची-नागोया येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये या संघाने सुवर्णपदक जिंकले आहे.
26 सप्टेंबर 2026 रोजी झालेल्या अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यात इराणचा 37-34 असा पराभव करून भारताच्या महिला कबड्डी संघाने सुवर्णपदक पटकावले आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील आपले विजेतेपद कायम राखले. सुवर्णपदक जिंकल्याबद्दल भारतीय रेल्वेच्या महिला खेळाडूंचे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अभिनंदन केले. समर्पित वृत्ती, दृढनिश्चय आणि क्रीडा नैपुण्याने तिरंगा ध्वजाचा सन्मान वाढवल्याबद्दल आणि देशाचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल त्यांनी खेळाडूंची प्रशंसा केली. या संघाला नीता मोरेश्वर दाडवे यांनी प्रशिक्षण दिले होते आणि पुष्पा राणा यांनी कर्णधार म्हणून नेतृत्व केले होते.
केंद्रीय मंत्र्यांची भेट घेणाऱ्या रेल्वे खेळाडूंमध्ये दक्षिण मध्य रेल्वेच्या मुख्य प्रशिक्षक नीता मोरेश्वर दाडवे, दक्षिण मध्य रेल्वेच्या रितू नेगी, उत्तर रेल्वेच्या पूजा, दक्षिण मध्य रेल्वेच्या पिंकी रॉय, तसेच पश्चिम रेल्वेच्या सोनाली विष्णू शिंगटे आणि राज राणी यांचा समावेश होता.
रेल्वे क्रीडा प्रोत्साहन मंडळाच्या माध्यमातून भारतीय क्रीडा नैपुण्याला प्रोत्साहन देण्याचा भारतीय रेल्वेचा दीर्घ इतिहास आहे. येथील खेळाडूंनी ऑलिम्पिक खेळ, जागतिक अजिंक्यपद स्पर्धा, आशियाई क्रीडा स्पर्धा आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांसह अनेक प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. संस्थात्मक पाठिंबा आणि रोजगाराबरोबरच क्रीडा क्षेत्रात कारकीर्द घडवण्याच्या संधी उपलब्ध करून देऊन, भारतीय रेल्वे देशातील क्रीडा प्रतिभेच्या विकासात योगदान देत आहे.