मयेतील नागरिकांकडून उत्स्फूर्त स्वागत; देवीचा आशीर्वाद आणि जनतेच्या पाठिंब्यामुळे पुन्हा जनसेवेची संधी मिळेल, झांट्ये यांचा विश्वास
गोवा खबर : मयेचे माजी आमदार प्रवीण झांट्ये यांनी मये येथील श्री केळबाई देवीचे दर्शन घेऊन आणि देवीचा आशीर्वाद घेऊन आजपासून घरोघरी जनसंपर्क मोहिमेला सुरुवात केली. या मोहिमेअंतर्गत झांट्ये यांनी नागरिकांच्या घरी भेटी देऊन त्यांच्याशी थेट संवाद साधला. यावेळी स्थानिक नागरिकांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले.
मये मतदारसंघातील जनतेशी असलेले आपले नाते अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने झांट्ये यांनी या संपर्क मोहिमेला सुरुवात केली आहे. मोहिमेच्या प्रारंभी त्यांनी श्री केळबाई देवीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. त्यानंतर त्यांनी घरोघरी जाऊन नागरिकांची भेट घेतली आणि त्यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधला.
देवीचा आशीर्वाद आणि मयेतील जनतेचा पाठिंबा आपल्या पाठीशी असल्याने पुन्हा जनसेवेची संधी निश्चित मिळेल, असा विश्वास प्रवीण झांट्ये यांनी व्यक्त केला. जनतेशी थेट संपर्क ठेवून त्यांच्या सुखदुःखात सहभागी होण्याला आपण नेहमीच महत्त्व दिल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, संपर्क मोहिमेदरम्यान विविध घरांमध्ये झांट्ये यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. नागरिकांनी त्यांच्याशी संवाद साधत आपला पाठिंबा व्यक्त केला. तसेच आगामी काळातही भक्कम साथ देण्याचे आश्वासन दिल्याचे झांट्ये समर्थकांकडून सांगण्यात आले.
या प्रतिसादामुळे झांट्ये यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. घरोघरी भेटी देत नागरिकांशी थेट संवाद साधण्याच्या या मोहिमेमुळे मये मतदारसंघातील राजकीय हालचालींनाही वेग येण्याची शक्यता आहे.
मये मतदारसंघात पुन्हा सक्रिय झालेल्या प्रवीण झांट्ये यांच्या या जनसंपर्क मोहिमेकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.