पेडणे, डिचोली आणि फोंडा मतदारसंघांत मगोचे सर्वेक्षण पूर्ण; भाजपसोबतची युती कायम राहणार असल्याचे ढवळीकरांचे स्पष्टीकरण
गोवा खबर: आगामी गोवा विधानसभा निवडणुकीत भाजप आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची (मगो) युती कायम राहणार असल्याचे मगोचे नेते तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, जागावाटपाबाबत भाजप पक्षश्रेष्ठी आणि मगोची केंद्रीय कार्यकारिणी समिती अंतिम निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मगो पक्षाने आतापर्यंत गोव्यातील तीन मतदारसंघांमध्ये सर्वेक्षण पूर्ण केले आहे. पेडणे, डिचोली आणि फोंडा या मतदारसंघांमध्ये पक्षाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा ढवळीकर यांनी केला. या मतदारसंघांतील सर्वेक्षणाचे निष्कर्ष पक्षासाठी सकारात्मक असल्याचेही त्यांनी सांगितले.
भाजपसोबत मगोची युती कायम राहणार असली, तरी जागावाटपाबाबत आताच काही सांगता येणार नाही, असे ढवळीकर यांनी स्पष्ट केले. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मगोची केंद्रीय कार्यकारिणी समिती स्थापन केली जाणार असून जागावाटपाचा विषय भाजपकडे मांडण्यात येणार आहे. त्यानंतर भाजपचे पक्षश्रेष्ठी यासंदर्भात निर्णय घेतील.
भाजपचे राष्ट्रीय संघटनमंत्री बी. एल. संतोष यांनी गोवा दौऱ्यादरम्यान भाजप-मगो युती कायम राहणार असल्याचे स्पष्ट केल्याचेही ढवळीकर यांनी सांगितले.
दरम्यान, मगो पक्षाने विविध मतदारसंघांमध्ये संघटनात्मक कामाला सुरुवात केली आहे. सात मतदारसंघांचे सर्वेक्षण करण्यात आले असून त्यापैकी तीन मतदारसंघांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. पेडणे, डिचोली आणि फोंडा या मतदारसंघांत पक्षाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे ढवळीकर म्हणाले. उर्वरित मतदारसंघांचे सर्वेक्षणही लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे.
विश्ववास कसा ठेवायचा? आमदार आरोलकर यांच्याबाबत ढवळीकरांची नाराजी
मगोचे मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांच्या पक्षांतराच्या चर्चेवरही सुदिन ढवळीकर यांनी प्रतिक्रिया दिली. भाजप नेते दयानंद सोपटे यांनी मांद्रे मतदारसंघात आपण मगोचे आमदार आरोलकर यांना पाठिंबा देणार नसल्याचे म्हटले आहे. तसेच फोंडा तालुक्यात एका आमदाराने यापूर्वीही अशाच प्रकारचे विधान केल्याचा उल्लेख ढवळीकर यांनी केला.
“पक्ष बदलणाऱ्यांवर आम्ही विश्वास कसा ठेवायचा? मी एकाच मगो पक्षात राहिलो असून त्याच पक्षावर प्रेम करणार आहे. हा पक्ष कसा वाढेल, यासाठी कसे काम करावे, ते मला पाहिले आहे,” असे ढवळीकर म्हणाले.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-मगो युती कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले असले, तरी जागावाटपाचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. त्यामुळे पेडणे, डिचोली आणि फोंडा या मतदारसंघांबाबत दोन्ही पक्षांच्या नेतृत्वाकडून कोणती भूमिका घेतली जाते, याकडे लक्ष लागले आहे.