गोवा खबर

मतदार याद्यांच्या शुद्धीकरणासाठी SIR आवश्यक; विरोधकांनी जनतेची दिशाभूल थांबवावी : सिद्धेश नाईक

Published

on

Spread the love

‘व्होट चोरी’चे आरोप करण्याऐवजी विरोधकांनी पुरावे सादर करावेत; प्रत्येक पात्र मतदाराचा मतदानाचा अधिकार सुरक्षित राहिला पाहिजे

गोवा खबर : मतदार याद्या अचूक, पारदर्शक आणि विश्वासार्ह ठेवण्यासाठी विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रिया आवश्यक आहे. ही प्रक्रिया कोणत्याही व्यक्ती किंवा राजकीय पक्षाविरोधात नसून लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी राबविण्यात येत आहे. विरोधी पक्षांनी जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणे आणि पुराव्यांशिवाय ‘व्होट चोरी’चे आरोप करणे थांबवावे, असे आवाहन भाजप गोवा प्रदेशचे मीडिया संयोजक आणि प्रवक्ते सिद्धेश श्रीपाद नाईक यांनी केले आहे.

शनिवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नाईक यांनी काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि इतर विरोधी पक्षांच्या SIR विरोधातील भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

विरोधक सातत्याने मतदार याद्यांच्या अचूकतेवर आणि निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करत आले आहेत. मात्र, आता मतदार याद्यांमधील चुका दुरुस्त करण्यासाठी प्रक्रिया सुरू असताना त्याच प्रक्रियेला विरोध का केला जात आहे, असा सवाल नाईक यांनी केला.

९५ कोटी मतदारांपैकी ८२ कोटींनी अर्ज सादर केल्याचा दावा

SIR संदर्भात सादर करण्यात आलेल्या आकडेवारीचा उल्लेख करत नाईक यांनी देशातील ९५ कोटी मतदारांपैकी सुमारे ८२ कोटी मतदारांनी गणना अर्ज सादर केल्याचे म्हटले आहे. देशभरातील जवळपास नऊ लाख मतदान केंद्रांवरील अधिकारी आणि विविध राजकीय पक्षांच्या बूथ लेव्हल एजंट्सनी या प्रक्रियेत सहभाग घेतल्याचेही त्यांनी सांगितले.

इतक्या मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येणाऱ्या प्रक्रियेबाबत जनतेमध्ये गैरसमज पसरविण्याऐवजी सर्व राजकीय पक्षांनी निवडणूक अधिकाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

मृत आणि दुबार मतदारांच्या नोंदींची पडताळणी आवश्यक

SIR प्रक्रियेत अनुपस्थित, कायमस्वरूपी स्थलांतरित, मृत आणि दुबार नोंदी असलेल्या मतदारांची ओळख पटविणे आवश्यक असल्याचे नाईक यांनी सांगितले.

त्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, मृत मतदारांशी संबंधित सुमारे २.८९ कोटी आणि दुबार नोंदींच्या सुमारे १.०१ कोटी नोंदी ओळखण्यात आल्या आहेत. या आकडेवारीवरून मतदार याद्यांच्या पडताळणीचे महत्त्व स्पष्ट होत असल्याचा दावा त्यांनी केला.

मात्र, कोणत्याही मतदाराचे नाव वगळण्यापूर्वी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे. तसेच संबंधित मतदाराला आपली बाजू मांडण्याची संधी मिळाली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘व्होट चोरी’चे आरोप करण्याऐवजी पुरावे द्या

मतदार याद्यांमधील चुकीच्या नोंदी दुरुस्त करणे आणि पात्र नागरिकाला मतदानाच्या अधिकारापासून बेकायदेशीरपणे वंचित ठेवणे या दोन वेगळ्या बाबी आहेत. विरोधकांनी यातील फरक समजून घेतला पाहिजे, असे नाईक म्हणाले.

काँग्रेस, आम आदमी पक्ष किंवा इतर विरोधी पक्षांकडे चुकीच्या पद्धतीने मतदारांची नावे वगळल्याचे ठोस पुरावे असतील, तर त्यांनी ते संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर करावेत. केवळ राजकीय आरोप करून निवडणूक व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास कमी करू नये, असे त्यांनी सांगितले.

फॉर्म ६ आणि फॉर्म ७ च्या प्रक्रियेचाही उल्लेख

मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांना फॉर्म ६ द्वारे नोंदणीसाठी अर्ज करता येतो. तसेच मतदार यादीतील नोंदीवर आक्षेप घेण्यासाठी किंवा कायदेशीर कारणांवरून नाव वगळण्याची मागणी करण्यासाठी फॉर्म ७ ची प्रक्रिया उपलब्ध असल्याचे नाईक यांनी नमूद केले.

या सर्व अर्जांची संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांनी नियमानुसार तपासणी करणे आवश्यक आहे. कोणताही पात्र मतदार मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नये, हीच भाजपची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

SIR ला राजकीय संघर्षाचे स्वरूप देऊ नका

मतदार याद्यांचे पुनरीक्षण हा राजकीय संघर्षाचा विषय बनवू नये. अचूक आणि पारदर्शक मतदार याद्या तयार करणे ही सर्व राजकीय पक्षांची सामूहिक जबाबदारी आहे, असे नाईक यांनी स्पष्ट केले.

विरोधकांनी निवडणूक प्रक्रियेबाबत शंका उपस्थित करण्याऐवजी त्यात सक्रिय सहभाग घ्यावा. पात्र मतदारांना आवश्यक कागदपत्रे आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले.

स्वच्छ आणि अचूक मतदार यादी हा कोणत्याही एका राजकीय पक्षाचा विजय नसून लोकशाहीचा विजय आहे. प्रत्येक पात्र मतदाराचा अधिकार सुरक्षित ठेवून निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता कायम राखणे आवश्यक आहे, असे भाजप गोवा प्रदेशचे मीडिया संयोजक आणि प्रवक्ते सिद्धेश श्रीपाद नाईक यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Trending

Exit mobile version