गोवा खबर: काँग्रेसच्या ‘गोवा राखण यात्रे’ला कुंकळ्ळीत अखेर दक्षिण गोवा जिल्हा प्रशासनाने सशर्त परवानगी दिली आहे. मात्र, राष्ट्रीय महामार्ग ६६ वरून यात्रा काढण्यास स्पष्ट मनाई करण्यात आली आहे. सुधारित मार्गानुसार आज, रविवारी दुपारी १ वाजल्यापासून यात्रा काढण्यास तसेच जाहीर सभा आणि ध्वनिक्षेपकांच्या वापरास प्रशासनाने परवानगी दिली आहे.
दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस यांनी १० ऑक्टोबर रोजी यासंदर्भातील आदेश जारी केला. गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सादर केलेल्या सुधारित अर्जाचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला.
सुधारित मार्गानुसार कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीपासून (IDC) यात्रेला सुरुवात होईल. त्यानंतर चिफ्टन्स स्मारकमार्गे कुंकळ्ळी बसस्थानकापर्यंत सुमारे २.४ किलोमीटर अंतराची यात्रा काढण्यात येणार आहे. तसेच कुंकळ्ळी फुटबॉल मैदान अथवा मोकळ्या जागेत जाहीर सभा घेण्यासही परवानगी देण्यात आली आहे.
यापूर्वी काँग्रेसने राष्ट्रीय महामार्ग ६६ वरून यात्रा काढण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक आणि वाहतूक पोलिसांनी या मार्गाला तीव्र आक्षेप घेतला होता. कुंकळ्ळी बाजारातून जाणाऱ्या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. बाळ्ळी जंक्शन ते कुंकळ्ळी बसस्थानकादरम्यान रस्ता अरुंद असल्याने मोठी गर्दी झाल्यास वाहतूक पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली होती.
याशिवाय, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची उपस्थिती आणि मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवांच्या वाहतुकीत अडथळे निर्माण होण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली होती.
या पार्श्वभूमीवर काँग्रेसने १० ऑक्टोबर रोजी सुधारित मार्गाचा अर्ज सादर केला. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी नव्या मार्गाला हरकत नसल्याचे कळवले. दक्षिण गोवा पोलीस अधीक्षकांनीही काही अटींच्या अधीन राहून परवानगी देण्यास हरकत नसल्याचे स्पष्ट केले.
राष्ट्रीय महामार्गावर प्रवेश केल्यास कारवाई
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार यात्रेतील आयोजक, कार्यकर्ते आणि सहभागी व्यक्तींना कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रीय महामार्ग ६६ वरून मोर्चा काढता येणार नाही. महामार्गावर गर्दी करणे, वाहतूक रोखणे किंवा मंजूर मार्ग बदलणे यालाही मनाई करण्यात आली आहे.
या अटींचे उल्लंघन झाल्यास पोलिसांना यात्रा थांबवण्याचा किंवा परवानगी मागे घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
ध्वनिक्षेपकांवरही निर्बंध
यात्रेदरम्यान वापरण्यात येणाऱ्या बँडच्या ध्वनिवर्धकांसाठी आवाजाची मर्यादा ५५ डेसिबल ठेवण्याची अट घालण्यात आली आहे. तसेच रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत कायद्याने विशेष परवानगी नसल्यास ध्वनिक्षेपक वापरता येणार नाहीत.
यात्रेदरम्यान वाहतूक सुरळीत ठेवणे, स्वयंसेवकांची नियुक्ती करणे, सुरक्षेची व्यवस्था करणे आणि रुग्णवाहिकांसह अत्यावश्यक वाहनांना विनाअडथळा मार्ग उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आयोजकांवर सोपवण्यात आली आहे.
दरम्यान, कुंकळ्ळीतील यात्रेच्या परवानगीवरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सुधारित मार्गाला मंजुरी दिल्याने काँग्रेसच्या कार्यक्रमाचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील बंदी कायम ठेवण्यात आली आहे.