गोवा खबर:“एक दिवस प्रत्येकालाच हे जग सोडून जायचे आहे, पण जाण्याआधी आपण समाजासाठी काही भरीव करू शकलो का, याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. केवळ स्वतःचे कुटुंब, मुलं आणि घरापुरते मर्यादित आयुष्य जगणे व्यर्थ आहे,” अशा स्पष्ट आणि परखड शब्दांत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी जीवनाचे वास्तव मांडले.
गोव्यात पणजी येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना नाना पाटेकर यांनी उपस्थितांना जीवन जगण्याचा खरा अर्थ समजावून सांगितला. जीवनाच्या क्षणभंगुरतेवर भाष्य करताना ते म्हणाले, “उद्या मी असेन की नसेन, किंवा तुम्ही असाल की नसाल, हे कोणालाच ठाऊक नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात तो शेवटचा काळ येणारच आहे. पण त्या अंतिम क्षणापूर्वी, आपल्याला जे समाजकार्य करायचे आहे ते आपण पूर्ण करू शकलो का? त्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न केले का? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे.”
केवळ स्वतःपुरते जगणाऱ्या वृत्तीवर ताशेरे ओढताना नाना म्हणाले की, “माझी मुले, माझी पत्नी, माझे घर… फक्त एवढ्यापुरताच मर्यादित विचार करून जगायचे असेल, तर मग जगून काय उपयोग? जीवनाचा वसा घेऊन जगले पाहिजे.”
या प्रसंगी त्यांनी गोव्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांच्या जीवननिष्ठा आणि ध्यासाचे उदाहरण दिले. आजारपणातही ऑक्सिजन सिलिंडर सोबत घेऊन त्यांनी पुलाच्या कामाची पाहणी केली आणि काम पूर्ण करून घेतले, या आठवणीचा उल्लेख करत नाना म्हणाले की, कामाचा आणि समाजसेवेचा असा ध्यास प्रत्येकाकडे असायला हवा. नाना पाटेकर यांच्या या भावनिक आणि विचारप्रवर्तक भाषणाने उपस्थितांची मने जिंकली.